अक्षरधन:शतकाचा  अनमोल दस्तावेज 

– प्रा. मिलिंद जोशी 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या विसाव्या शतकातील  अंकांमधील निवडक लेखांच्या एक हजार पृष्ठांच्या ‘अक्षरधन’ या ग्रंथाचे प्रकाशन आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने (२७ फेब्रुवारी) ज्येष्ठ समीक्षक  डॉ. मिलिंद मालशे यांच्या हस्ते होत आहे त्या निमित्ताने… 

महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११८ वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका बजावत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लो.टिळकांच्या प्रेरणेने १९०६ साली स्थापन झालेल्या परिषदेची घटना १९१२ साली अस्तित्वात आली. ९ मार्च १९१३ रोजी मुंबईत झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ असे एक मासिक काढावे असा ठराव झाला. त्यानुसार ऑगस्ट १९१३ चा ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चा बारा पृष्ठांचा अंक ‘विविध ज्ञान विस्ताराची पुरवणी’ म्हणून प्रकाशित झाला.  ‘सांप्रत महाराष्ट्र भाषेचा परिपोष निरनिराळ्या तऱ्हेने होत आहे. तरी खास साहित्य या विषयाकडे जावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही… साहित्याकरिता वाहिलेले असे एखादे पत्र निघण्याचा आता काळ आला आहे व त्याची आवश्यकता भासू लागली आहे. असे पहिल्या अंकाच्या संपादकीयात वि. मो. महाजनी यांनी नमूद केले होते. 

१९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरु झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. पत्रिकेतील लेखन खरे तर वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. मात्र यातील निवडक लेखांचे  खंड आजवर प्रकाशित न झाल्याने हे कार्य दुर्लक्षित राहिले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने परिषदेच्या संशोधन विभाग प्रमुख डॉ. अरुणा  ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेतला. व्यासंगी समीक्षक आणि कवयित्री डॉ नीलिमा गुंडी यांनी हा ग्रंथ अभ्यासपूर्वक सिद्ध करताना उत्तम संपादन केले. या प्रकल्पासाठी परिषदेच्या हितचिंतक प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी अर्थसाहाय्य केले त्यामुळे एक हजार पृष्ठांचा बृह्दग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. एक अव्वल दर्जाचा संदर्भग्रंथ म्हणून याचा उपयोग होईलच, शिवाय आजच्या आणि उद्याच्याही भाषाविषयक धोरणासाठी यातून मार्गदर्शन मिळेल. या ग्रंथाची व्याप्ती आणि खोली लक्षात घेता मराठी वाङ्मय व्यवहार याचे स्वागतच करेल. परिषदेच्या अंतर्गत नूतनीकरणाबरोबरच हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण झाला याचे समाधान कार्यकारी  मंडळाला आहे. 

राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक स्थित्यंतरांच्या दृष्टीने विसावे शतक महत्त्वाचे आहे. म्हणून विसाव्या शतकातील निवडक लेखांचा विचार ‘अक्षरधन’ या ग्रंथासाठी केला. १९१३ ते २००१ या कालखंडातील लेखांची निवड डॉ. नीलिमा गुंडी यांनी केली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादकपद या काळात वि. मो. महाजनी, ना. गो. चापेकर, द. वा. पोतदार, माधवराव पटवर्धन, मो. ज्ञा. शहाणे, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. म. माटे, य. दि. पेंढरकर, रा. शं. वाळिंबे, वि. भि. कोलते, वा. रा. ढवळे, दि. के. बेडेकर, श्री. के. क्षीरसागर, स. गं. मालशे, भालचंद्र फडके, हे. वि. इनामदार, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, वसंत जोशी, शंकर सारडा, वि. स. वाळिंबे, ह. ल. निपुणगे या मान्यवरांनी भूषविले आणि पत्रिकेच्या प्रतिष्ठेत भर घातली. म. सा. पत्रिकेने संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा कायम जपला. 

या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. नीलिमा गुंडी यांनी पत्रिकेच्या संपादकांचे धोरण, पत्रिकेचे वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक, पत्रिकेतील लेखनाचे सर्वसाधारण स्वरूप, विविध सदरे, वाचकांचा प्रतिसाद तसेच पत्रिकेतील कालोचित बदल यांचा परामर्श घेतला आहे. या ग्रंथात सात विभागात ८१ लेख  

समाविष्ट आहेत. प्रत्येक विभागालाही स्वतंत्र प्रस्तावना आहे. भाषा, व्याकरण, छंद:शास्त्र, व्यक्तिवेधपर लेख, साहित्यविश्वातील विविध चळवळी, प्रवाह यांची चर्चा, वाद, महत्त्वाच्या पुस्तकांची प्रदीर्घ परीक्षणे, मुलाखती, संशोधने, इतकेच नव्हे  तर  परभाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची दखल घेणारे लेख असे विविधांगी लेखन यात समाविष्ट आहे. देशभाषांचा उच्च अभ्यासक्रमात समावेश हा रा. भि. जोशी यांचा लेख, अखिल भारतीय पार्श्वभूमी आणि भारतीय भाषांशी संबंध हा श्री. ना. बनहट्टी यांचा लेख, साहित्यातील आग्रह आणि दुराग्रह हा वि. वा. शिरवाडकरांचा लेख, स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यातील चळवळीचे मूलस्रोत हा चंद्रकांत बांदिवडेकरांचा लेख, साहित्यातील देशीयता हा भालचंद्र नेमाडे यांचा लेख, ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार आणि मराठी साहित्य हा डॉ. गं. ना. जोगळेकरांचा लेख, राजवाड्यांच्या भाषा शास्त्रविषयक कार्याचा आढावा घेणारा शं. गो. तुळपुळेंचा लेख, स्त्रियांची भाषा हा सरोजिनी बाबरांचा लेख, जोतिराव फुले यांच्यावरचा गं. बा. सरदारांचा लेख, पाली वाङ्मयातील तेरा भिक्षुणी रत्ने हा धर्मानंद कोसंबींचा लेख, कवितांवरचा मं. वि. राजाध्यक्षांचा लेख, ‘स्वामी’ कादंबरीची दि. के. बेडेकरांनी केलेली समीक्षा, चार नाटककार: चार शक्ती हा ना. सी. फडके यांचा लेख, मराठी कथेतील कलात्मकतेचा विचार पुनर्विचार आणि तिचे भवितव्य हा कमल देसाईंचा लेख, गो. म. कुलकर्णींनी घेतलेली दया पवारांची मुलाखत, दिलीप चित्रेंच्या संवेदनांचे रा. ग. जाधवांनी उलगडलेले विविध पदर, तेंडुलकरांच्या नाटकांनी उठविलेल्या वादळांविषयीचा चंद्रशेखर बर्वेंचा लेख, ‘झाडाझडती’ च्या निमित्ताने मर्ढेकरांच्या ‘पाणी’ विषयीचा डॉ. सदा कऱ्हाडेंचा लेख, माझे लेखन कलेतील प्रयोग हा पुलंचा लेख, बी. रघुनाथांच्या कादंबरीविषयीचा वसंत आबाजी डहाकेंचा लेख, ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ हा रंगनाथ पठारेंचा लेख, परभाषा व साहित्यविश्वाचे वेध घेणारे ना. ग. जोशी, श्री. के. क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, म. द. हातकणंगलेकर, द. श्री. बापट यांचे लेख या ग्रंथाची श्रीमंती वाढविणारे आहेत. मराठी साहित्यातील वैचारिक ग्रंथाचे दालन समृद्ध करणारा हा ग्रंथ आहे. 

जानेवारी १९३४ च्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंकात द. वा. पोतदारांनी ‘रद्दीतील रत्ने’ हा लेख लिहिला त्या लेखात ते म्हणतात ‘एका अर्थी जशी जुनी वस्त्रे आपण टाकतो, तशीच ही पत्रे, मासिके पुस्तकेसुद्धा आपल्या विचार व्यापाराची वस्त्रेच होत… जुनी, जीर्ण, फाटकी अतएव निरुपयोगी वस्त्रे टाकावी हे ठीक, परंतु पागोटे फाटले म्हणून टाकले तरी कडेचा जर सहजच ‘दीर्घायुषी’ असतो; तो फेकून देणे लाभाचे नाही… मग त्याच हिशेबाने जुन्या वर्तमानपत्री किंवा मासिकी किंवा पुस्तकी लिखाणातील जो सत्वांश आपल्या प्रगतीला कारण होत असतो. तेव्हढा जगवायलाच हवा. ‘अक्षरधन’ हा ग्रंथ सिद्ध करताना द. वा. पोतदारांचाच हा विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेने समोर ठेवला आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत आजवर परिषदेने वाटचाल केली आहे यापुढेही तशीच होत राहिल.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत)

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top