
साहित्य परिषदेविषयी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११९ वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे.
१९६१ साली परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी संमेलनाची योजना करून ती घेण्यास १९६५ पासून प्रारंभ केला. त्यापूर्वीची ४५ साहित्य संमेलने ‘महाराष्ट्र साहित्य संमेलने’ या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली. ही सर्व संमेलने गणनेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिली.
‘साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे’ ही भूमिका समोर ठेवून २०१६ साली प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाने साहित्य परिषदेच्या कार्यशैलीत बदल केला. आज साहित्यिनिर्मितीचा केंद्रबिंदू सरकला आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील लेखक कसदार लेखन करीत आहेत. त्यांचेच साहित्य आज मराठी साहित्य विश्वाची समृद्धी वाढवीत आहे. शहरात आणि महानगरात सांस्कृतिक अजीर्ण व्हावे इतके साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात खरी सांस्कृतिक भूक आहे ती ग्रामीण भागात. हे लक्षात घेऊन साहित्य परिषदेने कार्यक्षेत्रातील छोट्या गावांतही आपल्या शाखांचा विस्तार केला आहे. तिथल्या प्रतिभेच्या नव कवडशांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिवर्षी ऐंशी टक्के नव लेखक कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी दिली. साहित्य परिषदेतर्फे विभागी साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. पूर्वी हे उपक्रम पुणे आणि परिसरातच होत असत. ते तिथे न घेता दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुका पातळीवर आणि छोट्या गावांतही घेतले जात आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात शाखा चालवताना प्रश्न असतो तो निधीचा. त्यावर मार्ग काढण्यासाठी साहित्य परिषदेने तेथील शाखांना त्याच ठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांबरोबर, महाविद्यालयांतील वाङ्मयमंडळांबरोबर साहित्य सहयोग करार करायला सांगितले. त्या करारानुसार महाविद्यालयांनी समारंभासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करायची आणि साहित्य परिषदेच्या शाखांनी साहित्यिक कार्यक्रम ठरवायचे, लेखकांना निमंत्रित करायची जबाबदारी पार पाडायची असे ठरलेले आहे. त्यामुळे शाखांना उपक्रम मिळाले, महाविद्यालयातील वाङ्मयमंडळे परिषदेशी जोडली गेली, तरुणाई परिषदेच्या संपर्कात आली. शाखांमधले साहित्य रसिक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात जाऊ लागले. साहित्यसंस्था साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला, हे या उपक्रमाचे खरे यश.