२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण

पुणे दि. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक बा. सी. मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण, अभिजात दर्जासाठीची चळवळ उभारणाऱ्या आणि गेली अनेक वर्षे मराठी भाषा पंधरवडा साजरा करणाऱ्या मसापच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेला, राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतीप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार गेली ३५ वर्षे सतत उपक्रमशील राहून ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करणाऱ्या मसापच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेला देण्यात येणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणार्या कार्यकर्त्यास देण्यात येणारे कार्यकर्ता पुरस्कार कोकणात साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार करून वैशिष्ट्यपूर्ण वाड्मयीन उपक्रम घेणारे प्रकाश देशपांडे (चिपळूण) यांना व पुण्यातील वारजे-कोथरूड शाखेच्या माध्यमातून विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या माधुरी वैद्य (पुणे) यांना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात सकाळी १०.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार्या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.



