महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व  अंकांचे होणार डिजिटायझेशन,

राज्य मराठी विकास संस्थेचा पुढाकार 

पुणे दि. ०८ : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाड;मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून हा अनमोल ठेवा आता साहित्य रसिकांसाठी महाजालावर उपलब्ध होणार आहे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.         

प्रा. जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे वाडमयीन नियतकालिक संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे.  १९१३ मध्ये पत्रिकेचा पहिला अंक ‘विविधज्ञानविस्तार’ ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला. १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यतः साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील लेखन वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. परिषदेने  गेल्या १०० वर्षातील निवडक लेखांचे संकलन असलेला आणि डॉ.नीलिमा गुंडी यांनी संपादित केलेला अक्षरधन हा एक हजार पृष्ठांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. आता महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन होणार असल्यामुळे सर्व अंक वाचक, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत.

राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ शामकांत देवरे म्हणाले, राज्य मराठी विकास संस्था ही महाराष्ट्र शासनाद्वारे मराठीच्या विविधांगी विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था असून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अनुसार संस्थेद्वारे दुर्मिळ ग्रंथांचे आणि नियतकालिकांचे संगणकीकरण करून ते महाजालावरून उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत असतो. आजवर अनेक ग्रंथांच्या तसेच  नियतकालिकांच्या उपलब्ध झालेल्या अंकांचे संगणकीकरण करण्यात आले असून ते संस्थेच्या संकेत स्थळावरुन सर्वांना अभ्यासासाठी नि: शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र साहित्य  पत्रिकेचे वाड;मयीन  महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेला या संदर्भात राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परिषदेने त्यास मान्यता दिली असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top