पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
मंगळवार, ७ मे २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
– पं. सत्यशील देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेत कृष्णामुकुंद पुरस्काराचे वितरण
पुणेः- धर्म आणि संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक धर्मातील प्रार्थनांना संगीताचा पाया आहे, असे मत ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखिका डॉ. नलिनी गुजराथी, उद्योजक मोहन गुजराथी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
देशपांडे म्हणाले की, संगीताच्या समग्रतेतील एक षष्टांश भाग या पुस्तकात आलेला आहे. केशवचैतन्य कुंटे हे एक कृतिशील कलाकार असून त्यांचे सांगितीक विचार ते सप्रयोग सादर करीत असतात.
यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, प्रत्येक धर्माचे संगीत वेगळे असले तरी संगीताला कोणताही धर्म नसतो. कोणत्याही संगीतातून मिळणारा आनंद कैवल्यात्मक असतो. धर्म, जात, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे जाऊन कला माणूस जोडण्याचे काम करीत असते. गायक आणि संगीतकाराचे नाव, आडनाव आणि धर्म पाहून त्याच्याविषयी टिपण्णी केली जाते. एखाद्याने आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ही आता समाजच ठरवू लागला आहे.या विकृत मानसिकतेला बळ मिळणे समाज हिताचे नाही. ‘विविधतेत एकता’ हे या देशाचे वैशिष्टय आहे. ते टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वमतांधता, पंथाभिमान आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टी देशासाठी हानिकारक आहेत. एकांगी संशोधन उपयोगाचे नाही.
यावेळी डॉ. नीलिमा गुंडी यांनी परीक्षकांचे मनोगत व्यक्त केले. डॉ. नलिनी गुजराथी यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. केशवचैतन्य कुंटे यांनी पुरस्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.

छायाचित्र ओळ :- महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला दिला जाणारा कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांना यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या ग्रंथासाठी प्रदान करताना पं. सत्यशील देशपांडे. यावेळी (डावीकडून) मोहन गुजराथी, विनोद कुलकर्णी, कुंटे, देशपांडे, प्रा. मिलिंद जोशी डॉ. नलिनी गुजराथी आणि सुनिताराजे पवार.