
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तरुणाईसाठी खास कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मी, पाऊस, तो/ती असा या कविसंमेलनाचा विषय आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या १६ ते २५ वयोगटातील कवींनी आपल्या जास्तीत जास्त दोन कविता masaparishad@gmail.com या इमेलवर पाठवाव्यात. इ मेलमध्ये “मी, पाऊस, तो/ती” असा उल्लेख करावा आणि इमेलमध्ये आपला मोबाईल क्रमांक द्यावा. कविता वाचनासाठी कवीने स्वतः उपस्थित असणे अनिवार्य असून कविता पाठवण्याची अंतिम तारीख २१ जुलै आहे. पन्नास उत्तम कवितांची निवड तज्ज्ञ समिती मार्फत केली जाईल. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष जावडेकर आणि समृद्धी पांडे करणार आहेत. हे कविसंमेलन रविवार २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. पावसाच्या सरी, मैत्रीचा वारा आणि प्रेमाच्या कविता अनुभवण्यासाठी तरुणांनी या कविसंमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी केले आहे.
