वाचकांचे उदंड प्रेम नोबेल पुरस्कारापेक्षा मोठे – मीना प्रभू मसापच्या वर्धापनादिनानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

पुणे – आजवरच्या लेखनाला वाचकांचे जे उदंड प्रेम लाभले ते एखाद्या नोबेल पुरस्कारापेक्षाही मोठे आहे, अशी भावना प्रख्यात लेखिका डाॅ. मीना प्रभू यांनी व्यक्त केली. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यामध्ये डाॅ. मीना प्रभू यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. रावसाहेब कसबे होते. या प्रसंगी व्यासपीठावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे भोसले, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. 

या सोहळ्यात डाॅ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने फ्रान्सिस वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा म्हणून फिरता करंडक मसापच्या शाहुपुरी शाखेला प्रदान करण्यात आला. बाबूराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसापच्या इस्लामपूरच्या शाखेला देऊन गौरवण्यात आले. प्रकाश देशपांडे आणि माधुरी वैद्य यांना मसाप कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले. 

मीना प्रभू म्हणाल्या, प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार नाहीच असे सांगणारे अनेक लोक होते. मला आज मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराने हे लेखन साहित्यप्रकारात येते हे सिद्ध झाले आहे याचा खूप आनंद आहे. गेली तीस वर्षे सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. या जीवनप्रवासात या अनुभवांनीच मला समृद्ध केले आहे, असे सांगून त्यांनी आपल्या परदेशप्रवासातील काही थक्क करणारे अनुभव उपस्थितांना सांगितले. 

फ्रान्सिस वाघमारे म्हणाले, सामान्य माणसाचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी मुलांसाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यातील एक साधा मुलगा आज अमेरिकेतील दुतावासात काम करतो आहे. आदिवासी मुलींकडेही लक्ष देऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांच्यासाठी या पुढील काळातही मी कार्यरत राहणार आहे. मला मिळालेला पुरस्कार ही माझ्यावरील जबाबदारी आहे असे मी समजतो. 

प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या लेखकांनीच मराठी साहित्याच्या समृद्धीत भर घातली. प्रथम पुलंनी कसदार प्रवास वर्णनातून मराठी वाचकांना जगाचे दर्शन घडविले तेच काम मीना प्रभू यांनी पुढील काळात आपल्या समर्थ लेखणीतून केले. त्यामुळे मराठी वाचकांच्या जाणिवांचा प्रदेश विस्तारला. त्यांच्या प्रवास वर्णनाने केवळ त्या त्या देशाचे भौगोलिक दर्शन घडविले नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय दर्शनही घडविले. लोकप्रिय लेखकांकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता कोत्या मनोप्रवृत्तीची निदर्शक आहे. मीना प्रभू यांचा सन्मान केल्याने एका दुर्लक्षित साहित्य प्रकाराचा सन्मान झाला आहे याचा महाराष्ट्र साहित्य परिषदेला आनंद आहे.

डाॅ. रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्यात राजकारण येऊ लागले की जे खरे साहित्यिक गुणवंत असतात त्यांचे काम बाजूला पडते आणि राजकारण करून साहित्यिक गट बनवतात त्यांच्यात आपसातच पारितोषिके दिली जातात. ते टाळले जावे म्हणून साहित्यिक राजकारणापासून दूर राहून मसापमधील सगळीच ध्येयवादी मंडळी काम करतात हे पाहून आनंद वाटतो. मीना प्रभू यांना मिळालेला पुरस्कार हे त्याचेच द्योतक आहे. आपल्या प्रवास वर्णनातून जगण्याचा एक जिवंत अनुभव मीना प्रभू यांनी वाचकांना दिला आहे. माणसाच्या जाणीवा विकसित करणे हे साहित्याचे खरे प्रयोजन असते ते काम त्यांच्या लेखनाने केलेले आहे. 

अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार विजेत्यांची ओळख सुनिता राजे पवार यांनी करून दिली. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले. 

चौकट

*पुरस्काराची रक्कम अंधांसाठी प्रदान*  डाॅ. मीना प्रभू यांनी आजवर ज्या ज्या पुस्तकांचे लेखन केले ती सर्व प्रवासवर्णनाची पुस्तके लोकप्रिय झाली. त्यांना या पुस्तकाची जी रक्कम राॅयल्टी म्हणून मिळत गेली ती त्यांनी स्वतःकडे न घेता त्यांनी अंध मुलांच्या विकासासाठी देत आल्या आहेत. आतादेखील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळताना त्यांना जी आर्थिक रक्कम पुरस्काराच्या रुपाने मिळाली ती त्यांनी पुणे ब्लाईंड असोसिएशनचे विनोद देसाई यांच्याकडे जाहीर समारंभातच सुपूर्त केली. त्यांच्या या दानशूर वृत्तीला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top