
पुणे : – ज्या काळात स्त्रियांवर खूप बंधने होती त्याकाळात संत कवयित्रींनी सामाजिक बंधने सैल केली. संत कवयित्रींच्या कवितेत त्यांचा अंत:स्वर प्रकटला आहे. त्यांनी स्त्री मुक्तीचा पाया रचला. असे मत गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने डॉ. म.वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. अलका चिडगोपकर यांना ‘मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा’ या ग्रंथासाठी डॉ. दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंदिनी क्षीरसागर उपस्थित होते.
डॉ. दातार म्हणाले – वारीत कोणीही नवस करत नाही. कसलीही अपेक्षा न करता आईच्या ओढीने जावे तसे वारकरी पंढरीला जातात. तिथे साधेपणा जपला जातो. हाथरास मध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अशा कार्पोरेट अध्यात्माला विरोध करायला हवा.
डॉ. चिडगोपकर म्हणाल्या, संत कवयित्रीनी आपले स्त्रीसुलभ भाव अध्यात्म साधनेच्या आड येऊ दिलेले नसले तरी त्यांना त्यांच्या स्त्रीपणाची व त्यासह येणाऱ्या सामाजिक बंधनांचीही असलेली जाणीव त्यांच्या काव्यरचनेत दिसते. अध्यात्मापलीकडील जीवनाकडे पाठ फिरविल्याने मध्यमयुगीन कवितेलाच मर्यादा पडलेल्या आहेत. संत कवयित्रींच्या कवितेतही त्या मर्यादा प्रतिबिंबित होणे अटळ आहे.
प्रा. जोशी म्हणाले, संत कवयित्रींनी त्यांच्या रचनातून मानवी जीवनमूल्यांचे व लोक संस्कृतीचे दर्शन घडविले. अनिष्ट रुढी परंपरांवर प्रहार केले. व्यक्ती आणि समाज, बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ यांचा एकत्रित विचार संत कवयित्रींच्या रचनामध्ये दिसतो. अठरापगड जातीत विभागलेला समाज संतांनी विठ्ठल नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणला. अध्यात्माचे लोकशाहीकरण करत स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेद नष्ट केला. राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे जाऊन वैश्विक एकात्मतेची कल्पना मांडली. सुनिताराजे पवार यांनी प्रस्ताविक केले.
