
*मसापच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान*
पुणे – लेखणी स्वतंत्र असेल तेव्हाच ती सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखू शकते. कारण साहित्यिक हा सामान्य माणसांचा प्रवक्ता असतो. वाढत्या संवेदनहिनतेचे निराकरण करण्याचे सामर्थ्य साहित्यिकाच्या लेखणीतच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी केले.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्ताने विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशिक बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवत डाॅ. रावसाहेब कसबे होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.
माधव कौशिक या वेळी म्हणाले, समाजामध्ये संवेदनशीलता वाढावी, माणसामध्ये गुणात्मक परिवर्तन व्हावे हाच साहित्यिकाच्या लेखनाचा उद्देश असतो. लेखनात करुणेचा विस्तार होतो तेव्हाच साहित्याची निर्मिती होते. आजच्या काळात कट्टरता, अनुदारता वाढते आहे. पूर्वीसारखे आपण उदारमतवादी राहिलेलो नाही. त्यामुळे या घटत्या संवेदनहिनतेचे निराकरण करण्याची क्षमता फक्त चांगल्या साहित्यिकांमध्येच आहे. लेखन ही एक दैवी शक्ती आहे. ती निसर्गतः प्राप्त होते. त्याचा जेव्हा लेखकांना विसर पडतो तेव्हा समाजाचा ऱ्हास सुरू होतो.
अध्यक्षस्थानावरून बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, जोवर लेखकाला स्वतःची भूमिका नाही तोवर तो परजीवी असतो. त्यामुळे लेखकांनी जगण्यासंबंधी एक भूमिका घेऊन लिहायला शिकले पाहिजे. तेव्हाच ते लेखन प्रभावी ठरू शकते. हीच भूमिका आज सगळ्या लेखकांनी आपल्या मनाशी जागवायला हवी.
प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कामाचा विस्तार ग्रामीण भागात तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य परिषदेचा कायापालट करण्यापासून ते सन्मानाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यापर्यंतचे अनेक नवे बदल घडवून सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू आहे.
या निमित्ताने विविध देणगीदारांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ऋचा बोंद्रे पवार यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.
चौकट
*सेल्फी पाॅइंटवर साहित्यिकांची गर्दी* विविध ग्रंथपुरस्कारांचे मानकरी ठरलेले मान्यवर साहित्यिक महाराष्ट्रभरातून आलेले होते. त्यांच्यासाठी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने खास सेल्फी पाॅइंट तयार केलेला होता. आपल्या साहित्यकृतीसह स्वतःचा फोटो काढण्यात साहित्यिक तिथे रंगून गेलेले दिसत होते.





