
पुणे दि.०६: महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एक दिवसीय समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन बुधवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत आबासाहेब गरवारे महाविद्यालयाच्या दृकश्राव्य सभागृहात होणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा. जोशी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात साहित्याविषयी व विशेषत: समीक्षेविषयी गांभीर्याने चर्चा होत नाही, अशी अनेक नामवंत साहित्यिकांची व समीक्षकांची भावना होती. तिचा आदर करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने २०११ सालापासून संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला .आजवर झालेल्या या समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. रा. ग .जाधव, प्रा के.रं.शिरवाडकर, प्रा.वसंत आबाजी डहाके, सुधीर रसाळ, डॉ हरिश्चंद्र थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. दिलीप धोंडगे , डॉ.रेखा इनामदार साने, डॉ रमेश वरखेडे यांनी भूषविले आहे या संमेलनात उद्घाटनाच्या सत्रात समीक्षा संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अविनाश सप्रे यांचे अध्यक्षीय भाषण होणार आहे. ‘समीक्षेच्या परिभाषेची समीक्षा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. रूपाली शिंदे, डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. सुजाता शेणई सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. ‘समाज माध्यमांवरील कला समीक्षा’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात गणेश मतकरी, डॉ. वर्षा तोडमल, प्रसाद शिरगावकर, हिना खान सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप डॉ. विनय हर्डीकर यांच्या व्याख्यानाने होणार असून नव्या समीक्षेकडे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.