
विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध
पुणे : गणपत विघ्नहरन गजानन ” ही गणेश स्तुतीची बंदिश, शांता शेळके यांचं ‘दाता तू गणपती गजानन’ ही रचना, संत गोरा कुंभार यांचा “निर्गुणाचा संग धरीला जो आवडी” हा अभंग, ” माझे जीवपण फिटावे केशवा ” ही सद्गुरु शिरीष दादा कवडे यांची रचना, “सुनता है गुरु ग्यानी”, “उड जायेगा हंस अकेला” या संत कबीरांच्या रचना, “जोहार मायबाप जोहार” हे संत कान्होपात्रा या संगीत नाटकातील नाट्यपद, “सर्वात्मका सर्वेश्वरा” हे “ययाती देवयानी” या नाटकातील नाट्यपद अशा एकाहून एक सरस रचना सादर करत विदुषी मंजिरी आलेगावकर यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते महाराष्ट्राची साहित्यपंढरी असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अभंग आणि निर्गुणी भजन आलेगावकर यांनी सादर केले. त्यांना तबल्यावर अजित किंबहुने आणि हार्मोनियमवर अमोल मोरे साथ केली. प्राची जोगळेकर, स्वराली आलेगावकर, कीर्ती कुमठेकर आणि डॉ मृणाल वर्णेकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉ वर्षा तोडमल यांनी रसाळ निरुपण केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होते.
वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे : प्रा. मिलिंद जोशी
यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, संत साहित्यात केवळ अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्तीचाच विचार नाही. त्यात प्रखर प्रवृत्तीवाद आहे. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. वारीत सहभागी होताना ‘मी’ विसरावा लागतो. वारी हे एकात्म आणि समूहभावनेचे उत्तम उदाहरण आहे.’ ‘मी’ चे आम्हीत रुपांतर करून वारी माणसांमध्ये समूहभावना निर्माण करते. माणसाला व्यापक आणि प्रसरणशील बनविते. मानव ही जात आणि मानवता हाच धर्म हा विचार घेऊन एकात्म भावनेने वारकरी वारीत सहभागी झालेले असतात. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद वारीत नसतो. वारी हा पाहण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही. अनुभूतीच्या पातळीवर वारीचे जे दर्शन घडते ते माणसांना आदर्श जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करते.