
पुणे : अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ जोगळेकर यांनी संस्थात्मक काम मनोभावे केले असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ लेखक प्रा सुधाकर भोसले यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पराग जोगळेकर, उज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते.
प्रा भोसले म्हणाले, मी साहित्याचा भक्त आहे, सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी साहित्याची सेवा करत आहे. अभिरुची सध्या हीन दर्जाची होत चालली आहे. डॉ जोगळेकर यांनी उपयोजित आणि व्यावहारिक मराठीसाठी केलेले काम मोलाचे आहे.
प्रा. जोशी म्हणाले, मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता चिंताजनक आहे. त्यामुळे संस्थात्मक कार्याची हानी होत आहे. राजकारणाचे प्रतिबिंब जीवनाच्या सर्व क्षेत्रात दिसत असते. निष्ठावान कार्यकर्ता ते पैसे घेऊन राबणारा सेवक असे मोठे स्थित्यंतर राजकारणात काळाच्या ओघात घडले. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधीनी कार्यकर्त्याचे मोहोळ असे म्हटले होते, तिथे आज ‘कुठे गेले कार्यकर्ते’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पैसा हेच सर्वस्व झाल्यामुळे वेळ आणि पैसा यांची सांगड घालत जगणे हीच जीवनपद्धती झाली आहे. त्यामुळे निस्पृह आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणारे तसेच संस्थात्मक कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहेत.
सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.


