
पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे युवा कवी कवयित्रींचा समावेश असलेले “मी, पाऊस तो/ती” हे कवी संमेलन नुकतेच परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विविध कार्यक्षेत्रात काम करणारे तरुण यांनी त्यांच्या कविता ऐकवून सभागृह तरुण केले. बाहेर पाऊस कोसळत असताना साहित्य परिषदेत तरुणाईच्या कवितेच्या सरी बरसल्या.
प्रतिक्षा ढोकळे, गौरी चित्ते, स्नेहा बोडके, शाश्वती वझे, जागृती भामरे, प्रभाकर व्यवहारे, प्रसाद कुंभार, आयुष सुरडकर, तेजस कुलकर्णी, श्रेया जाधव, विशाल माने, प्रथमेश बोराडे, ऋतुराज देशपांडे, अथर्व अदमाने, साक्षी थोरात, आकांक्षा पटवर्धन, सायली बंडबे, भक्ती लालसरे, श्रेया जगदाळे, प्रतिक्षा जोशी, प्रसन्नकुमार धुमाळ, श्रेयश फापाळे, अमोल रसाळ या कवींनी कवीसंमेलनात सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह वि दा पिंगळे उपस्थित होते. मसापचे पुणे शहर प्रतिनिधी, लेखक, कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केलं.
वेगवेगळे भाव मांडणाऱ्या कविता या संमेलनात कवींनी सादर केल्या. “शेवटी मी राहिलो काय, तू राहिली काय, इतकेच काय पावसाळा देखील आता वेगळा झालाय तुझा आणि माझा” ही श्रेयस फापाळे याची कविता असो किंवा “पुन्हा एकदा अनुभव दे प्रेमाचं ते सत्र, पुन्हा मला लिहू दे अश्रूंनी प्रेमपत्र!” असे सांगणारी आयुष सुरडकर याची कविता असो श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली. “कधी घनगर्द, कधी मल्हार, कधी तुळस.. थेंब थेंब होतो मुरारी!” असं म्हणणारी आकांक्षा पटवर्धन हिची कविता किंवा “मुलींनो, स्वप्नातला किंग कुमार नक्की असावा, ज्यात तुमचा बाप तुम्हाला दिसावा!” अशी थेट मांडणी करणारी आजच्या काळाची साक्षी थोरात हिची कविता सर्वांना भावली. मार्गदर्शन करताना प्रा जोशी म्हणाले, केवळ प्रतिभा आणि शब्द सामर्थ्य आहे म्हणून उत्तम कविता लिहिता येत नाही. कवीला शब्दांच्या पाठीशी प्रतिभेचे, अनुभवाचे आणि साधनेचे संचित उभे करावे लागते. तरुणाईने महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर जगण्याच्या लढाईत कवितेचे बोट सुटणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांच्या आग्रहास्तव डॉ. आशुतोष जावडेकर यांनी त्यांचे वीण हे गाणे सादर केले आणि कार्यक्रम संपला तरीही कवी आणि त्यांच्या कविता सभागृहात रेंगाळत राहिल्या.
