
पुणे : केवळ स्वतःचा विचार न करता मश्री कायम समाजाचा विचार करत राहिले. त्यांनी आयुष्यभर चांगुलपणाची आणि चांगले काम करणाऱ्या माणसांची पाठराखण केली. सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा मश्रीनी पुढे चालवली असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. निष्ठावंत साहित्यसेवक आणि पुणे शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्ञात असलेले म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि उत्कर्ष प्रकाशनाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मश्रींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने परिषदेतर्फे म. श्री. दीक्षित यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ राजा दीक्षित यांनी परिषदेला दिलेल्या देणगीतून पहिला म. श्री. दीक्षित स्नेहबंध पुरस्कार परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात ४४ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ग्रंथसेविका विमल अहिरे आणि परिषदेच्या कार्यालयात २७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्योस्ना नांदगिरीकर यांना मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तसेच ‘साहित्यिक काका: म. श्री. दीक्षित ‘या डॉ मेधा सिधये आणि रवींद्र ठिपसे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुळकर्णी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ राजा दीक्षित, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशीयावेळी उपस्थित होते.
दीक्षित म्हणाले, वडिलांच्या ‘सार्वजनिक काका’ पणामुळे आमचे कॊटुंबिक जीवन विलक्षण पोळलेले असले, तरी त्या चटक्यांनी आम्हाला वेगळी समृद्धीही दिली. काकांच्या फाटक्या खिशाच्या जाकिटातून मिळालेला सांस्कृतिक ठेवा लाखमोलाचा आहे. अर्थात, त्याला आईच्या अबोल त्यागाचे अस्तर आहे.
प्रा.जोशी म्हणाले, पैसा, पद, प्रतिष्ठा मिळावी यासाठी अनेक माणसे संस्थांवर काम करण्यासाठी उत्सुक असतात, मश्रींना या पैकी कशाचीच अपेक्षा नव्हती. निखळ साहित्य सेवा यातच त्यांना परमानंद मिळत होता. मश्रींनी वैयक्तिक जीवनात गरीबी अनुभवली पण त्यांनी आपल्या कामातून संस्थांना श्रीमंत आणि समृद्ध केले. अशी माणसे महाराष्ट्रात होती म्हणून तर संस्थांचे जाळे मजबूत होत गेले. निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या मश्रींनी साहित्य सेवेसाठी आणि संस्थात्मक कार्यासाठी आपल्या आयुष्याचे मोल दिले. मश्री हे साहित्य परिषदेचे वैभव होते. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. विनोद कुळकर्णी यांनी आभार मानले. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले




