मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार प्रदान

पुणे : आजवर पुरुषांचा दृष्टिकोन त्यांच्या विनोदी लेखनात येत होता, स्त्रियांचा दृष्टिकोन मी माझ्या लेखनातून मांडला. तरीही बाई म्हणून स्त्रियांना विनोदी लेखन करताना मर्यादा येतात असे मत ज्येष्ठ लेखिका मंगल गोडबोले यांनी व्यक्त केले.
ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ या वर्षीचा उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा कै. रा. द. पुसाळकर पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना आणि उत्कृष्ट रहस्य कथा लेखनासाठीचा कै. इंदुमती पुसाळकर पुरस्कार लेखिका रमा गोळवलकर यांना माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी त्या बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्य्क्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, भारती पांडे, परीक्षक वर्षा गजेंद्रगडकर, कार्यवाह माधव राजगुरू उपस्थित होते
गोडबोले म्हणाल्या, विनोद निर्मितीसाठी दृष्टिकोन आणि भाषिक सौष्ठवाची गरज असते. आजचा काळ विनोदी लेखनासाठी अनुकूल आहे कारण समाजात दांभिकता आहे. पण भाषिक दौर्बल्य आहे. विनोदी लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही.
सासणे म्हणाले, जगभर विनोदी लेखनाला आणि रहस्य कथांना प्रतिष्ठा आहे. मराठी साहित्यात ती नाही.
प्रा. जोशी म्हणाले, उपहासापेक्षा परिहासाला प्राधान्य देणारा विनोद सर्वश्रेष्ठ आहे. विनोद दुर्मिळ असतो तो अट्टाहासाने घडवला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता असते. तसेच आज घडताना दिसते. विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. आजच्या समाजात चांगला विनोद पचविण्याची ताकद नाही. अजूनही मराठी साहित्यविश्व् अव्वल दर्जाच्या विनोदी कादंबरीच्या प्रतीक्षेत आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. माधव राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले.
