इंदिरा संतांच्या कवितेत मध्यमवर्गीय स्त्रीचा अंतःस्वर : डॉ नीलिमा गुंडी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत प्रतिपादन

पुणे : कवयित्री इंदिरा संत यांची कविता स्वातंत्र्योत्तर  सुशिक्षित, स्वावलंबी अशा नवीन स्त्री प्रतिमेचे दर्शन घडवीत होती. कवितेतून त्यांनी एका  सांस्कृतिक  अवकाशाची कलात्मक निर्मिती केली. त्यांची कविता केवळ खासगी सुखदुःख व्यक्त करणारी नव्हती. त्यातून तत्कालीन मध्यमवर्गीय स्त्रीचा अंतःस्वर प्रकट झाला. असे मत साहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘कवयित्री इंदिरा संत आणि त्यांच्या वारसदार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते.

डॉ गुंडी म्हणाल्या, स्त्रीकेंद्री कविता आणि स्त्रीवादी कविता हे दोन प्रवाह वेगळे असले, तरी त्यामागे स्त्रीमनाचा  थांग लावण्याची असलेली धडपड ही एकाच कोंबातून निघाली आहे. अशी कविता जाणून घेण्यासाठी वाचकाचीही भाषेवर पकड असावी लागते. कारण चांगली कविता ही रसज्ञतेची  परीक्षा घेणारी असते. इंदिरा संतांच्या काव्यक्षेत्रातील सांस्कृतिक वारसदार म्हणून आजच्या अनेक कवयित्रींचा उल्लेख करता येईल. स्त्रीत्वाचा शोध, अभिव्यक्त होण्याची उत्कट ओढ, संश्लिष्ट प्रतिमा, समकालीन स्त्रीवर्गाशी सहसंवेदन आणि आत्मभान ही त्यांच्या कवितेची घटकद्रव्ये प्रभा गणोरकर, उषा मेहता, रजनी परुळेकर, अरुणा ढेरे, अनुराधा पाटील, मलिका अमरशेख, अश्विनी धोंगडे, कविता महाजन, नीरजा, प्रज्ञा पवार आदी अनेक कवयित्रींमध्ये दिसून येतात.

अध्यक्षीय समारोप करताना प्रा जोशी म्हणाले, विशुद्ध भावकविता लिहिणाऱ्या कवयित्री हीच इंदिरा संत यांची खरी ओळख आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर यांनी मागची वाट पुसून नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवयित्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पत्की यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. शुद्ध कलानिर्मिती हे विशुद्ध भावककवितेचे कार्य इंदिराबाईंच्या प्रेम कवितेने केले आहे. त्यांची कविता समाजविन्मुख असली तरी तिने आपल्या पद्धतीने स्वतःची वाट शोधली. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top