कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे : भानू काळे

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लेखक वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार मंगला गोडबोले यांना प्रदान

पुणे : असहिष्णू वातावरणात विनोद फुलत नाही, कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने रमेश बोकील यांनी दिलेल्या देणगीतून लेखक वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार विनोदी लेखनासाठी मंगला गोडबोले यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि रमेश बोकील यावेळी उपस्थित होते.

काळे म्हणाले, आजचा समाज अकारण अतिसंवेदनशील झाला आहे. खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे हे वातावरण विनोदासाठी पोषक नाही.

गोडबोले म्हणाल्या, सांस्कृतिक दबावामुळे स्त्रियांनी विनोदाची वाट चोखाळली नाही. विनोदी लेखन करण्यासाठी लेखकाला गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. विनोदी लेखन जगण्याला समर्थपणे सामावून घेते. गंभीर विषय विनोदातून मांडला की तो सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचतो.

प्रा. जोशी म्हणाले, विनोद बुद्धि क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांकृतिक अधोगतीचे लक्षण आहे. चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती कमी होत चालली आहे. ह्या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही पण ते हलके करण्याची ताकद विनोदात आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. रमेश बोकील यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.  

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top