महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्यिकांची आदरांजली
पुणे : डॉ. जयंत नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला बळ दिले. विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. डॉ नारळीकर यांना अचूकतेचा ध्यास होता. त्यांनी कायम आपले साधेपण जपले. शास्त्रज्ञ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची निर्मिती केल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लाभले. त्यांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील एक लखलखते नक्षत्र निमाले आहे. अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना आदरांजली वाहिली महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, ज्येष्ठ संपादक प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखिका चित्रलेखा पुरंदरे, पत्रकार शैलेंद्र परांजपे, गोपिका चितळे-किंजवडेकर, लेखक शाम भुर्के, प्रकाशक स्नेहसुधा कुलकर्णी यांनी डॉ नारळीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
प्रा जोशी म्हणाले, शास्त्रज्ञ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची निर्मिती केल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लाभले. कल्पना आणि वास्तव यांच्या मिश्रणातून विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांची निर्मिती करताना त्यात विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे दोन्ही हेतू साध्य होतील असा त्यांचा प्रयत्न असायचा. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये एखादी वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणे, वाचकांच्या कल्पनाशक्तीला झोके देत देत त्यांना विज्ञानाच्या अंतरंगात घेऊन जाणे, शक्यतांच्या खेळात वाचकांना गुंतवून ठेवणे आणि वैज्ञानिक सत्य त्यांच्यासमोर मांडणे ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. त्यांनी केलेल्या साहित्य निर्मितीमुळे मराठीतील विज्ञान कथांचा आणि कादंबऱ्यांचा प्रवाह अधिक समृद्ध झाला. सध्याच्या कोसळणीच्या काळात अशा उत्तुंग माणसाचे आपल्यात नसणे अधिक दुःखदायक आहे त्यांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील एक लखलखते नक्षत्र निमाले आहे.
भारत सासणे म्हणाले, मराठीत सातत्याने विज्ञान साहित्य निर्माण होतच होते. डॉ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याला नवी दिशा दिली.
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीपाल ललवाणी म्हणाले, डॉ नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला बळ दिले. त्यांचा पाठिंबा असल्याने चळवळ फल ज्योतिषाला आव्हान देऊ शकली.
प्रा. राजा दीक्षित म्हणाले, विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. ते प्रयोगशाळेइतकेच विज्ञानाच्या लोकअंगणात रमले.
दीपक शिकारपूर म्हणाले, जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ असूनही त्यांनी कायम साधेपणा आणि मूल्यनिष्ठा जपली.
प्रशांत दीक्षित म्हणाले, डॉ नारळीकर यांना अचूकतेचा ध्यास होता. राजहंस प्रकाशनाच्या अनेक प्रकल्पांचे ते मार्गदर्शक होते.
राजीव तांबे म्हणाले, डॉ नारळीकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करावे.
