पुणे : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ ८ जूनला ठरणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
प्रा जोशी म्हणाले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे होणार आहे .त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल. स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.
