पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. गं. ना जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार वरखेडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार १४ ऑगस्ट रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.
