
साहित्य परिषदेविषयी
महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११९ वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. हा मुळीचा झरा अनेक सारस्वतांसाठी अक्षय ऊर्जाकेंद्र आहे.
महाराष्ट्र साहित्य परिषदेची स्थापना.
एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात न्या. रानडे आणि लोकहितवादी यांनी ग्रंथकार संमेलने सुरू केली. चौथे ग्रंथकार संमेलन १९०६ साली प्रसिद्ध कवी गो. वा. कानिटकर यांच्या अध्यक्षतेखाली पुण्यात मळेकर वाड्यात भरले होते. या संमेलनाच्या समारोपात साहित्य सम्राट न. चिं. केळकर यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या स्थापनेची घोषणा केली. लोकमान्य टिळकांनी त्यांना अनुमोदन दिले. तेव्हापासून महाराष्ट्र साहित्य परिषद मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांचे जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका पार पाडत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन या संस्थेच्या कार्याचा विस्तार केला. आज पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर, अहमदनगर, नाशिक, जळगाव, धुळे-नंदुरबार, कल्याण, डोंबिवली, ठाणे, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड या जिल्ह्यांत परिषदेचे कार्य विस्तारलेले आहे.
१९६१ साली परिषदेचे तत्कालीन कार्याध्यक्ष दत्तो वामन पोतदार यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची स्थापना झाली. साहित्य महामंडळाने अखिल भारतीय मराठी संमेलनाची योजना करून ती घेण्यास १९६५ पासून प्रारंभ केला. त्यापूर्वीची ४५ साहित्य संमेलने ‘महाराष्ट्र साहित्य संमेलने’ या नावाने महाराष्ट्र साहित्य परिषदेने घेतली. ही सर्व संमेलने गणनेसाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला दिली.

‘साहित्य संस्थांनी कालानुरूप बदलले पाहिजे’ ही भूमिका समोर ठेवून २०१६ साली प्रचंड बहुमताने निवडून आलेल्या कार्यकारी मंडळाने साहित्य परिषदेच्या कार्यशैलीत बदल केला. आज साहित्यिनिर्मितीचा केंद्रबिंदू सरकला आहे. ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागातील लेखक कसदार लेखन करीत आहेत. त्यांचेच साहित्य आज मराठी साहित्य विश्वाची समृद्धी वाढवीत आहे. शहरात आणि महानगरात सांस्कृतिक अजीर्ण व्हावे इतके साहित्यिक आणि सांस्कृतिक कार्यक्रम होत असतात खरी सांस्कृतिक भूक आहे ती ग्रामीण भागात. हे लक्षात घेऊन साहित्य परिषदेने कार्यक्षेत्रातील छोट्या गावांतही आपल्या शाखांचा विस्तार केला आहे. तिथल्या प्रतिभेच्या नव कवडशांना व्यासपीठ मिळावे यासाठी प्रतिवर्षी ऐंशी टक्के नव लेखक कवींना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात संधी दिली. साहित्य परिषदेतर्फे विभागी साहित्य संमेलन, युवा साहित्य नाट्य संमेलन, समीक्षा संमेलन आणि शाखा मेळावा हे महत्त्वाचे उपक्रम राबविले जातात. पूर्वी हे उपक्रम पुणे आणि परिसरातच होत असत. ते तिथे न घेता दरवर्षी वेगवेगळ्या जिल्ह्यात, तालुका पातळीवर आणि छोट्या गावांतही घेतले जात आहेत. त्याला उत्तम प्रतिसाद मिळत आहे. ग्रामीण भागात शाखा चालवताना प्रश्न असतो तो निधीचा. त्यावर मार्ग काढण्यासाठी साहित्य परिषदेने तेथील शाखांना त्याच ठिकाणी असणाऱ्या शैक्षणिक संस्थांबरोबर, महाविद्यालयांतील वाङ्मयमंडळांबरोबर साहित्य सहयोग करार करायला सांगितले. त्या करारानुसार महाविद्यालयांनी समारंभासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टींची पूर्तता करायची आणि साहित्य परिषदेच्या शाखांनी साहित्यिक कार्यक्रम ठरवायचे, लेखकांना निमंत्रित करायची जबाबदारी पार पाडायची असे ठरलेले आहे. त्यामुळे शाखांना उपक्रम मिळाले, महाविद्यालयातील वाङ्मयमंडळे परिषदेशी जोडली गेली, तरुणाई परिषदेच्या संपर्कात आली. शाखांमधले साहित्य रसिक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाविद्यालयात जाऊ लागले. साहित्यसंस्था साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरला, हे या उपक्रमाचे खरे यश.

ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करण्यासाठी शिवार साहित्य संमेलने –
साहित्यरसिकांना संमेलनांपर्यंत जाणे शक्य नसेल तर संमेलनाने साहित्यरसिकांपर्यंत गेले पाहिजे, या भूमिकेतून साहित्य परिषदेने शिवार साहित्य संमेलनं सुरू केली. ग्रामीण भागांतील शिवारात होणाऱ्या या संमेलनांना अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला. कोणतेही व्यासपीठ नाही, सत्काराचा डामडौल नाही, शिवारातल्या एखाद्या झाडाखाली सतरंजी टाकून बसायचे, त्याच शिवारातल्या फुलांनी आलेल्यांचे स्वागत करायचे. त्या परिसरातल्या लेखक-कवीला अध्यक्ष करायचे, त्यांचे भाषण, कविसंमेलन, कथाकथन असे सुटसुटीत कार्यक्रम ठेवायचे. स्थानिकांनाच सहभागी करून घ्यायचे. शेतात राबणाऱ्या मंडळींना रसिक म्हणून बोलवायचे, प्रत्येकाने आपापल्या घरून जेवणाचा डबा घेऊन यायचा. त्या शिवार मालकाची इच्छा आणि ऐपत असेल, तर त्याने स्वेच्छेने पिठलं- भाकरीचं जेवण द्यायचे अशी या संमेलनाची एकूण रीत आहे. या संमेलनात सहभागी होताना त्या शेतात राबणाऱ्या माउलीला उत्स्फूर्तपणे पन्नास-साठ ओळींचा उखाणा, ओव्या, कविता म्हणण्याची इच्छा होते. ती माउली सर्वांसमोर येऊन त्याचे सादरीकरण करते हा अनुभव या शिवार संमेलनांनी दिला. साहित्याचा पुणे- मुंबईत अडकलेला प्रवाह आज परिषदेच्या पुढाकाराने ग्रामीण भागातल्या पाटांमधून वाहतो आहे .
वैविध्यपूर्ण उपक्रम –
काही वर्षांपूर्वी साहित्य परिषदेत सारस्वतांचे स्मृतिदिन, व्याख्याने आणि पारितोषिकांचे वितरण एवढेच कार्यक्रम होत असत. त्यांनाही कर्मकांडाचेच रूप प्राप्त झाले होते. साहित्य परिषदेने या कार्यक्रमांच्या स्वरूपात बदल केला. समाजाच्या विविध क्षेत्रांतील साहित्यप्रेमी मान्यवरांना निमंत्रित करून त्यांच्याबरोबर संवाद घडविणारा ‘मसाप गप्पा’ सारखा उपक्रम, कथेमागची कथा उलगडणारा ‘कथासुगंध’ कार्यक्रम, शालेय विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची गोडी निर्माण व्हावी यासाठी शाळाशाळांत राबविलेला ‘लेखक तुमच्या भेटीला’ हा उपक्रम, महानगरांबरोबरच ग्रामीण भागातील कवी आणि कवयित्रींना पुण्यात निमंत्रित करून त्यांच्या कवितेची निर्मिती प्रक्रिया उलगडणारा ‘एक कवी एक कवयित्री’, सारखा उपक्रम राबवून परिषदेने साहित्यिकांसह साहित्यप्रेमींना परिषदेशी जोडले.
साहित्यक्षेत्रात कार्यरत असणाऱ्या अनेक संस्थांच्या सहयोगाने परिषदेने अनेक कार्यक्रम महाराष्ट्रभर घेतले. नवलेखक कवींना आणि मराठी विषयाचे अध्यापन करणाऱ्या शिक्षक व प्राध्यापकांना मार्गदर्शक ठरतील अशा अनेक कार्यशाळा राज्यभर घेतल्या. टिळक रस्त्यावरील जागा उदारमनाने वास्तू उभारणीसाठी परिषदेला देणारे औंध संस्थानचे अधिपती बाळासाहेब पंतप्रतिनिधी यांचे तैलचित्र परिषदेच्या सभागृहात लावले.
डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प हाती घेतले. साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांचे नाव परिषदेच्या पायरीला देऊन साहित्यसेवकांचा प्रातिनिधिक सन्मान केला.
जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने रस्त्यावर ग्रंथविक्री करणारे ग्रंथसेवक, मुद्रितशोधक आणि मुखपृष्ठकार यांचा सन्मान करून परिषदेने नवा पायंडा पाडला. थोर सारस्वतांच्या जन्मशताब्दी आणि स्मृतिशताब्दीच्या निमित्ताने अभिवादन कार्यक्रमांचे राज्यभर आयोजन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५ व्या जयंतीवर्षाच्या निमित्ताने पाटण येथे आयोजित केलेले आणि डॉ. आंबेडकरांच्या विचारांना वाहिलेले विभागी साहित्य संमेलन वैशिष्ट्यपूर्ण ठरले.
भाषा भगिनींमधील स्नेह वाढविला –
प्रसिद्ध लेखिका वैदेही, डॉ. प्रतिभा राय, सितांशु यशच्चंद्र, अशोक वाजपेयी, सूर्यबाला, डॉ. रामचंद्र गुहा आणि साहित्य अकादमीचे माधव कौशिक अशा अन्य भाषांतील थोर सारस्वतांना परिषदेच्या वर्धापनदिन समारंभासाठी प्रमुख अतिथी म्हणून निमंत्रित करून भाषा भगिनींमधील स्नेहभाव दृढ व्हावा यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न केले.
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोक चळवळ –
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी परिषदेने लोक चळवळ उभारली, त्यासाठी लेखकांच्या बैठका, पंतप्रधान कार्यालयाला शालेय विद्यार्थ्यांमार्फत एक लाख पत्रं पाठविण्याचा उपक्रम, राजकीय इच्छाशक्तीला आवाहन करण्यासाठी पत्रव्यवहार आणि गाठी भेटी हे सारे करीत असताना राजधानी दिल्लीत जाऊन धरणे आंदोलनही केले. महाराष्ट्रातील साहित्य संस्थेने भाषिक प्रश्नासाठी थेट राजधानीत जाऊन आंदोलन करण्याची ही घटनाच ऐतिहासिक आणि अभूतपूर्व आहे.
भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी आंदोलन –
मराठी भाषा शिक्षणाचा कायदा सक्तीचा करण्यात यावा यासाठी विविध संस्थांनी मुंबईच्या आझाद मैदानावर केलेल्या धरणे आंदोलनात साहित्य परिषदेचा लक्षणीय सहभाग होता. या आंदोलनाला यश आले. या कायद्याचे प्रारूप कसे असावे यासाठीच्या लेखक आणि विधिज्ञांच्या महत्त्वपूर्ण बैठका परिषदेतच झाल्या. परिषदेच्या संकेतस्थळावर या कायद्याचे प्रारूप लोकांसाठी ठेवण्यात आले व त्यांच्याकडून सूचना मागविण्यात आल्या. परिषदेच्या पुढाकारामुळे हा भाषा शिक्षणाचा कायदा सरकारने केला.
अ.भा.मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद निवडणुकीऐवजी सन्मानाने देण्यासाठी घटनाबदल-
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा मराठी समाजाचा वाङ्मयीन उत्सव आहे. साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी समाजाचे वैचारिक नेतृत्व करतात, अशी भावना मराठी जनांमध्ये आहे. साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रिया होती तेव्हा प्रतिभावंत सारस्वतांना मतांसाठी याचना करावी लागत होती. मतदारांची पात्रता ते साहित्यसंस्था प्रमुखांची भूमिका या साऱ्याविषयीच आक्षेप घेतले जात होते. निवडणुकांच्या गदारोळात वातावरण कलुषित व्हायचे. त्यामुळेच अनेक थोर सारस्वत या निवडणुकीपासून आणि संमेलनाध्यक्षपदापासून दूरच राहिले. समाजमनातही त्याविषयी खदखद होतीच. हे जाणून घेतल्यानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळात घटना दुरुस्ती व्हावी यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेने ठाम भूमिका घेऊन निवडणुकीऐवजी सन्मानपूर्वक निवड या पर्यायाचे समर्थन केले. तसा ठराव मसापच्या कार्यकारी मंडळात प्रथम मंजूर केला आणि महामंडळातही तो मंजूर व्हावा यासाठी पुढाकार घेतला. सर्व संस्थांच्या सहमतीने हा पर्याय स्वीकारला गेला आणि डॉ. अरुणा ढेरे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, डॉ. जयंत नारळीकर, भारत सासणे, न्या. नरेंद्र चपळगावकर, रवींद्र शोभणे यांच्या रूपाने वाचकांच्या मनातील संमेलनाध्यक्ष संमेलनांना मिळाले.
डिजिटायझेशन आणि संशोधनप्रकल्प –
तंत्रस्नेही समाजाला साहित्य परिषदेशी जोडण्यासाठी परिषदेने संकेतस्थळ सुरू केले, युनिकोडचा वापर सुरू केला. कार्यकारी मंडळातील सदस्यांनी स्वतः ग्रंथ दत्तक घेऊन आणि ग्रंथप्रेमींना आवाहन करून परिषदेच्या वा.गो. आपटे संदर्भ ग्रंथालयातील दुर्मीळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. मराठी वाङ्मयाचा इतिहास, सात खंडांत प्रकाशित – करणारी मसाप ही भारतातील एकमेव साहित्यसंस्था आहे. हा वाड्मयाचा इतिहास ई-बुक रूपात आणला.
परिषदेतर्फे घेतल्या जाणाऱ्या परीक्षांची व्याप्ती वाढविताना काळाची गरज ओळखून अभ्यासक्रमांची पुनर्रचना केली. परिषदेचे मुखपत्र असलेल्या साहित्य पत्रिकेला आयएसएसएन नंबर मिळवून तो अंक ई- स्वरूपात उपलब्ध करून दिला. ज्ञानमंडळाच्या माध्यमातून परिषदेने विश्वकोश निर्मिती मंडळासाठी मोलाचे योगदान दिले. महापुरात उद्ध्वस्त झालेल्या सांगलीच्या नगर वाचनालयाला अकरा हजार पुस्तके परिषदेने भेट म्हणून दिली.
परिषदेच्या संशोधन विभागाने डॉ. अरुणा ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे खंड आणि महाराष्ट्र साहित्य पत्रिकेतील १०० वर्षांतील निवडक लेखांचे संकलन, (संपादक डॉ. नीलिमा गुंडी) हे महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतले. त्यातील अक्षरधन (निवडक महाराष्ट्र साहित्य पत्रिका) हा ग्रंथ आपल्या हाती देताना परिषदेला आनंद आणि समाधान वाटत आहे. व्यासंगी समीक्षक आणि कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांनी हा ग्रंथ अभ्यासपूर्वक सिद्ध करताना उत्तम संपादन केले आहे. महाराष्ट्रातील गेल्या शतकातील सामाजिक, सांस्कृतिक, वाङ्मयीन आणि राजकीय घडामोडींचे प्रतिबिंब ज्यात उमटले आहे असा अनमोल ठेवा या ग्रंथाच्या माध्यमांतून चोखंदळ वाचक आणि अभ्यासक यांच्यासाठी परिषदेने उपलब्ध करून दिला आहे. या प्रकल्पासाठी मार्गदर्शन करणाऱ्या डॉ. अरुणा ढेरे आणि संपादनाची जबाबदारी उत्तमरीत्या पार पाडणाऱ्या डॉ. नीलिमा गुंडी यांची परिषद आभारी आहे. या प्रकल्पासाठी अर्थसाहाय्य करणारे परिषदेचे हितचिंतक नलिनी आणि मोहनराव गुजराथी यांची परिषद ऋणी आहे. या कामी परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे, प्रभारी प्रमुख कार्यवाह व कोषाध्यक्ष सुनिताराजे पवार यांच्यासह कार्यकारी मंडळाचे मला बहुमोल सहकार्य लाभले. या महत्त्वपूर्ण ग्रंथाचे साहित्यप्रेमी स्वागत करतील याची मला खात्री आहे. या ग्रंथाचे ज्येष्ठ समीक्षक डॉ. मिलिंद मालशे यांच्या हस्ते २७ फेब्रुवारी २०२४ रोजी प्रकाशन झाले. – संमेलनाध्यक्षांच्या भाषणांचे खंड लवकरच परिषदेत प्रकाशित होतील.
कोरोनाच्या संकटकाळातही कार्यरत –
कोरोनाच्या जागतिक संकटकाळात टाळेबंदीमुळे जेव्हा सारे जग ठप्प झाले होते तेव्हा परिषदेने आणि शाखांनी ऑनलाइन कार्यक्रमांच्या माध्यमांतून परिषदेचे काम जोमात सुरू ठेवले. या कठीण काळातही भरपूर देणग्या मिळविल्या आणि परिषदेची आर्थिक स्थिती (सरकारी अनुदान अर्ध्याने कमी झालेले असतानाही) मजबूत केली. ज्या काळात सार्वजनिक समारंभांवर निर्बंध होते, त्या काळात परिषदेच्या वर्धापनदिनाला वास्तूत किमान दिवा लागावा यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालून पदाधिकाऱ्यांनी दीपप्रज्वलन केले.

ऐतिहासिक वास्तूला धक्का न लावता अंतर्गत देखणे सुशोभीकरण –
२०२१ साली कोरोनाच्या संकटात वार्षिक सर्वसाधारण सभेने घटनेतील तरतुदीनुसारच महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाला या मंडळाने परिषदेला साहित्याभिमुख आणि लोकाभिमुख करण्यासाठी केलेले काम पाहून पाच वर्षांची मुदतवाढ दिली. साहित्य परिषदेच्या आजवरच्या वाटचालीतील ही ऐतिहासिक घटना आहे. वार्षिक सर्वसाधारण सभेने व्यक्त केलेला हा विश्वास सार्थ ठरवत कार्यकारी मंडळाने साहित्य परिषदेच्या अंतर्गत नूतनीकरणाचा महत्त्वपूर्ण प्रकल्प हाती घेतला आणि तो पूर्णत्वाला नेऊन साहित्यिकांचे आणि साहित्यरसिकांचे कित्येक दशकांचे स्वप्न पूर्ण केले. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष प्रा. डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख यांनी केलेल्या भरघोस अर्थसाहाय्यामुळे हा प्रकल्प पूर्ण झाला. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहाच्या नूतनीकरणामुळे या सभागृहात येणाऱ्या साहित्य रसिकांना आता सर्व अत्याधुनिक सोयी-सुविधा उपलब्ध झाल्या आहेत. या सभागृहातली आसन व्यवस्था आरामदायी झाली आहे. हे सभागृह वातानुकूलित आणि ध्वनिदोषविरहीत करण्यात आले आहे. आसनक्षमता वाढली आहे.

आजवर झालेल्या साहित्य संमेलनाच्या सर्व अध्यक्षांची छायाचित्रे नव्या रूपात सभागृहात लावण्यात आलेली आहेत. ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित सारस्वतांचे सभागृहात खास दालन करण्यात आले आहे. परिषदेच्या कार्यालयानेही कात टाकली आहे. प्रसिद्ध उद्योजक कृष्णकुमार गोयल यांनी दिलेल्या देणगीतून पहिल्या मजल्यावर सर्व सोयींनीयुक्त कोहिनूर बैठक कक्ष करण्यात आला आहे. स्थानिक कार्यवाहांना बसण्यासाठी स्वतंत्र कार्यवाह कक्ष तयार करण्यात आला आहे.

दुबईस्थित प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव यांनी त्यांचे वडील कल्याणराव जाधव यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयाचे नूतनीकरण करून दिले आहे. या ग्रंथालयात कल्याणराव जाधव अभ्यासिकेचीही निर्मिती करण्यात आली आहे. लिफ्टची सुविधा परिषदेचे उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी दिलेल्या देणगीतून उपलब्ध झाली आहे. उपाध्यक्ष राजीव बर्वे यांनी दिलेल्या देणगीतून साकारणाऱ्या द.के.बर्वे व्यासपीठावर अनेक अभिनव कार्यक्रम होतील.

टेरेसवर कल्याणराव जाधव सभागृह तयार करण्यात आले असून ते सभागृहही विविध कार्यक्रमांसाठी अनेक संस्थांना उपयुक्त ठरणार आहे. परिषदेची संरक्षक भिंत आणि रंगकाम झाल्यानंतर या ऐतिहासिक वास्तूला नवी झळाळी प्राप्त होईल. बौद्धिक कामांबरोबरच परिषदेच्या भौतिक विकासाचे हे कामही महत्त्वाचे होते. या विकास कामामुळे परिषदेला भविष्यासाठी उत्पन्नाचे नवे स्त्रोत निर्माण होणार आहेत. परिषद आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होण्यासाठी ते महत्त्वाचे आहेत.
परंपरा आणि आधुनिकतेचा मिलाफ घडवित आज साहित्य परिषदेची वाटचाल सुरू आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत यापुढेही परिषद समाजमनाची स्पंदने ओळखून कार्यरत राहणार आहे.
आजवर आपल्यासारख्या साहित्यप्रेमींची खंबीर साथ परिषदेला मिळाली आहे, यापुढेही मिळेल याची खात्री आहे.
प्रा. मिलिंद जोशी , कार्याध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे