पुरस्कार

डॉ. मीना प्रभू यांना ‘मसाप जीवनगौरव’ फ्रान्सिस वाघमारे यांना’डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ फ्रान्सिस वाघमारे (नाशिक) यांना जाहीर झाला असून ११,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

मसापच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्ताने विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशिक बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवत डाॅ. रावसाहेब कसबे होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार केशव चैतन्य कुंटे यांना जाहीर
महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

मसापचे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक बा. सी. मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण, अभिजात दर्जासाठीची चळवळ उभारणाऱ्या आणि गेली अनेक वर्षे मराठी भाषा पंधरवडा साजरा करणाऱ्या मसापच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेला, राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतीप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार गेली ३५ वर्षे सतत उपक्रमशील राहून ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करणाऱ्या मसापच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेला देण्यात येणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणार्या कार्यकर्त्यास देण्यात येणारे कार्यकर्ता पुरस्कार कोकणात साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार करून वैशिष्ट्यपूर्ण वाड्मयीन उपक्रम घेणारे प्रकाश देशपांडे (चिपळूण) यांना व पुण्यातील वारजे-कोथरूड शाखेच्या माध्यमातून विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या माधुरी वैद्य (पुणे) यांना जाहीर झाले आहेत.

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार
ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वर्षीचा उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा कै. रा. द. पुसाळकर पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना आणि उत्कृष्ट रहस्य कथा लेखनासाठीचा कै. इंदुमती पुसाळकर पुरस्कार लेखिका रमा गोळवलकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार, दि. २५ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सासणे, सौदागर यांचा जाहीर सत्कार
‘उसवण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालेले लेखक देविदास सौदागर आणि ‘समशेर व भूतबंगला’ या कादंबरीसाठी बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवार २१ जून २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे असे परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी कळविले आहे.

डॉ. मुकुंद दातार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. चिडगोपकर यांना प्रदान
ज्या काळात स्त्रियांवर खूप बंधने होती त्याकाळात संत कवयित्रींनी सामाजिक बंधने सैल केली. संत कवयित्रींच्या कवितेत त्यांचा अंत:स्वर प्रकटला आहे. त्यांनी स्त्री मुक्तीचा पाया रचला. असे मत गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने डॉ. म.वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. अलका चिडगोपकर यांना ‘मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा’ या ग्रंथासाठी डॉ. दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंदिनी क्षीरसागर उपस्थित होते.

साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. सुधाकर भोसले यांना प्रदान
अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ जोगळेकर यांनी संस्थात्मक काम मनोभावे केले असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ लेखक प्रा सुधाकर भोसले यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पराग जोगळेकर, उज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते.