जगण्यातले अंधारे आणि कुरूप कोपरे दळवींनी लेखनासाठी शोधले

वंदना बोकील कुलकर्णी यांचे मत, महाराष्ट्र साहित्य परिषदेत का.र. मित्र व्याख्यानमाला 

पुणे : माणसाच्या जगण्यातले अंधारे आणि कुरूप कोपरे दळवींनी आपल्या लेखनासाठी शोधले असे मत ज्येष्ठ लेखिका वंदना बोकील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘मासिक मनोरंजन’ कार का.र. मित्र व्याख्यानमालेचे जन्मशताब्दी विशेष तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘चतुरस्र प्रतिभेचा लेखक: जयवंत दळवी ’  हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते. बोकील  म्हणाल्या दळवींनी मानवी जगण्यातले कारुण्य,  निराशा,  वेदना यांची रूपे दाखवली.  दुसरीकडे ठणठणपाळ या नावाने अतिशय खुसखुशीत,  निर्विष विनोदी लेखन केले.  भल्या भल्या,  प्रस्थापित लेखकांची मनसोक्त खिल्ली उडवली आणि तरीही ते अजातशत्रू राहिले. स्वतःचे अंतर्गत जीवन शिंपल्यातील  प्राण्यासारखे जपले. दळवी म्हणून कोणी ओळखू नये, असे वावरले. लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही दळवींच्या योगदानाची बूज राखायला हवी. 

 अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, कामवासनेसारख्या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेल्या दळवींच्या नाटकातील पुरुष संवेदन अतिशय टोकदार आहे. लैंगिकता आणि नैतिकता यांच्यातील संघर्षांचे मार्मिक चित्रण त्यात आहे. एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निवडलेली नवी वाट माणसांच्या जीवनात अनेक नवे प्रश्न निर्माण करत असते अशी प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेली माणसे दळवींच्या साहित्यात जागोजागी भेटतात. त्यांच्या  साहित्याचे गारुड आजही कायम आहे. 

सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.  शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top