महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते : लक्ष्मण गायकवाड

मसापच्या १२०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण

पुणे : राजशिष्टाचारात प्रस्थापित झालेले राजकारणी आपआपल्या जातीधर्मापुढे जाऊ इच्छित नाहीत ही शोकांतिका आहे. भटक्या विमुक्त समाजाची स्थिती आजही सुधारलेली नाही. आमचे आजचे जीवन भयानकच आहे. संविधानात बदल न झाल्यामुळे आमची साहित्यिक कार्यकर्ता म्हणून देखील शोकांतिका झालेली आहे. राजकारण्यांनी भटक्या विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक प्रस्थापित होऊ दिले नाही. त्यामुळे आजही आमचा समाज संविधानाबाहेरच ठेवलेला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते, असे उद्विग्न उद्गार प्रसिद्ध लेखक, ‌‘उचल्या‌’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आज काढले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 120व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि. 27) लेखक सन्मान आणि शाखा व कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. गायकवाड यांचा ज्येष्ठ भाषा अभ्यासक व लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारांचे वितरण मसापचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं. यांना, राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक मसाप शाखा चोपडा (जि. जळगाव), राजन लाखे पुरस्कृत डॉ. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा पलूस (जि. सांगली), तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार अहिल्यानगर येथील जयंत येलुलकर आणि तळेगाव दाभाडे येथील श्रीकृष्ण पुरंदरे यांना, म. श्री. दीक्षित स्मरणार्थ मसाप स्नेहबंध पुरस्कार लेखिका डॉ. मंदा खांडगे यांना प्रदान करण्यात आला.

मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष राजीव बर्वे, मसापचे कार्याध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मंचावर होते.

सुरेश देशपांडे संपादित साहित्य पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले.

आजच्या सामाजिक स्थितीत जाती-पातीचे राजकारण वाढवत आमचा प्रवास सामाजिक एकात्मतेकडे न जाता उलट्या दिशेने सुरू आहे, याविषयी खंत व्यक्त करून लक्ष्मण गायकवाड म्हणाले, जाती, पाती, धर्म कालबाह्य होऊन समाज आज ना उद्या बदलेल या आशेवर आम्ही जगत आहोत. आज देशाला बुद्धाच्या विचारांची गरज आहे. भेदभाव, धर्म, पंथ नाहीसे होऊन नवनिर्मितीच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. आमचे साहित्य करमणुकीसाठी नव्हे तर तुम्हाला आजच्या सामाजिक परिस्थितीचे भान देण्यासाठी निर्माण करत आहोत. ‌‘नाही रे‌’ असलो तरी ‌‘आहे रे‌’ला आमच्या यातना समजाव्यात आणि परिघाबाहेर ठेवलेल्या आम्हाला परिघाच्या आत घ्यावे, यासाठी साहित्याची निर्मिती करीत आहोत.

गीताली वि. मं. म्हणाल्या, विद्रोहातून विद्वेषनिर्मिती होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि त्यातून चांगला माणूस तयार होत नाही. हा चांगला माणूस घडविण्यासाठी स्त्रीवादाचे महत्त्व आहे. आमची स्त्रीवादाची चळवळ पुरुषप्रधान विरोधी नाही तर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध आहे. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय या चार तत्त्वांवर पुरुषपणाच्या संकल्पनेतून बाहेर पडत परिवर्तन घडले पाहिजे.

स्त्री साहित्यिकांचे साहित्य समाजापर्यंत आणण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाधानी आहे असे डॉ. मंदा खांडगे यांनी सांगितले. जयंत येलुलकर, श्रीकृष्ण पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले.

अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य परिषद ही समाजजीवनात झिरपलेली चळवळ आहे. समाजात स्थैर्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही. भटके विमुक्त आणि स्त्रिया यांच्याविषयी कार्य करणाऱ्या साहित्यिकांना गौरविण्यात आले, ही समाधानाची बाब असून साहित्य परिषदेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचत असल्याबद्दल आनंदी आहे.

स्वागतपर प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त मान्यवरांची माहिती सुनिताराजे पवार यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले तर आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top