बृहन्महाराष्ट्रातील संस्थांसाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुणे : बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसाहाय्य मिळावे आणि मराठी भाषा पंधरवडा कालावधी बदलण्यात यावा यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे  अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पत्र दिले. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते.

प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्र राज्याने २०१० साली स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण ४ ‘भाषा आणि साहित्य’ या अंतर्गत बृहन्महाराष्ट्र या विभागात बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना राबवण्यात येत होती. परंतु २०२३ पासून ती बंद आहे. हा बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि संस्थांवर अन्याय आहे. जिथे मराठी भाषा राज्याची आणि संवादाची मुख्य भाषा नाही तिथे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही योजना तातडीने सुरु करावी.

महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती यासंदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येत होते. महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना / मंडळांना रु. ५०.०० लक्ष (प्रत्येकी रु. २.०० लक्षच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य करण्यात येत होते. परंतु २०२३ पासून हे अर्थसाहाय्य बंद आहे, त्यामुळे  तातडीने याप्रश्नी लक्ष घालून हे अर्थसाहाय्य त्वरित सुरु करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे.

तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा करा व त्या निमित्ताने विविध भाषा विषयक कार्यक्रम घ्या असे निवेदन महाराष्ट्रातील सर्व साहित्य संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये यांना पाठवले जाते व त्यानुसार कार्यक्रम घेतले जातात. हा मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला पाहिजे कारण २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे तर १४ मार्च हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींचा जागर हे औचित्य मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी अधिक योग्य आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून यापुढे मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. याबाबतचा ठरावही दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याप्रश्नी प्राधान्याने लक्ष घालून २०२६ पासून मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा  यासाठी संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठरावाची अंमलबजावणी व्हावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे विषय तातडीने मार्गी लावतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top