दत्ता गोसावी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार
पुणे : जातीपातीच्या राजकारणात अडकलेल्या महाराष्ट्राला संतांच्या महासमन्वयाची गरज असे मत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दत्ता गोसावी यांच्या ‘आतां तरी हाचि उपदेश | संत तुकारामांच्या निवडक उपदेशपर अभंगाचे रसाळ विवरण’ या वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंदिनी क्षीरसागर, कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी उपस्थित होते.
पवार म्हणाले, सोनोपंत दांडेकर हे एक सत्वसंपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी संतांचे तत्वज्ञान महाराष्ट्राला साध्या, सोप्या शब्दात सांगितले.
गोसावी म्हणाले, अभंग विवरण लेखनाची प्रेरणा, स्फूर्ती आणि प्रकाशनाचा योग या सगळ्या गोष्टी केवळ तुकोबांच्या करुणाकृपेमुळेच घडलेल्या आहेत, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. त्यांचे ऋण शब्दातीत आहे.
प्रा. जोशी म्हणाले, संतानी अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. विविध जाती-धर्मात विभागलेला समाज त्यांनी विठ्ठल नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणला. राष्ट्रीय एकात्मतेच्या पलीकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची कल्पना मांडली. संतांनी व्यक्ती आणि समाज, बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि अलोकिक अशी दोन टोके सांधत मानवी मनाला आणि जीवनाला उन्नत करणारे विचार त्यांच्या साहित्यातून दिले. संतांनी प्रखर प्रवृत्तीवाद समाजासमोर मांडला. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. आनंदिनी क्षीरसागर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.
