सातारा येथील संमेलन वेगळेपण जपून यशस्वी होईल : शरणकुमार लिंबाळे
समाजाचा शस्त्रावर नव्हे तर पुस्तकांवर विश्वास : शरणकुमार लिंबाळे
संमेलन पुस्तके, लेखक-वाचक, कलावंतांचा महोत्सव ठरावा : शरणकुमार लिंबाळे
सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते साहित्य संमेलन मंडपाच्या पायाभरणीचा शुभारंभ
सातारा : साहित्य संमेलन आरशाप्रमाणे असते. समाजाच्या साहित्यिक व सांस्कृतिक चेहर्याचे प्रतिबिंब त्यात उमटते. संमेलनासाठी उभारण्यात येत असलेला मंडप हा सातारकरांच्या मायेचा पदरच आहे. सातारा येथे होत असलेले संमेलन म्हणजे पुस्तके, लेखक-वाचक, कलावंत यांचा महोत्सव ठरावा. समाज शस्त्रावर नव्हे तर पुस्तकांवर विश्वास ठेवतो. साहित्य संमेलने लोकांचे, लेखकांचे, राष्ट्राचे मन उन्नत करण्यासाठी आयोजित केली जातात. त्यामुळे सातारा येथे होणारे संमेलन यशस्वी तर होईलच, पण वेगळेपण जपणारे ठरेल, असा विश्वास सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला.
अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आज (दि. १६) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी शरणकुमार लिंबाळे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर व्यासपीठावर होते.
लिंबाळे पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाची वाटचाल शताब्दीकडे सुरू असतानाच्या ९९ व्या टप्प्यावरचे हे संमेलन आहे. संमेलनांचा प्रारंभ पुण्यात १८७८ पासून झाला. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे या समाजधुरिणांनी ही पायाभरणी केली. तेव्हा लेखक आणि समाज यांच्यात संवाद साधला जावा, हीच अपेक्षा होती. लेखक हाही समाजाचा घटक असतो. त्यामुळे संमेलनात आरशाप्रमाणे समाजमनाचे प्रतिबिंब लेखकांच्या माध्यमातून पडत असते. संमेलन ही लेखक, प्रकाशकांची वाचकांशी होणारी थेट भेट असते. संमेलनातून समाजाची वाचनसंस्कृती प्रकट होते. वाचन माणसाची जडणघडण करते, माणूस घडवण्याचे कार्य करते. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने होणारी या सर्वांची भेट अगत्याची ठरते.
संमेलनात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिसेल : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सातारचे साहित्य संमेलन वेगळेपण जपणारे ठरेल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीचे उपक्रम आता सुरू होत आहेत. संमेलन सातारा शहरापुरते नसून, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संमेलनात दिसेल. सातारकरांच्या सहकार्याने आम्ही संमेलन सुंदर पद्धतीने आणि उत्तम नियोजनाने यशस्वी करू, असे ते म्हणाले.
संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने बळ देणारी : प्रा. मिलिंद जोशी
प्रा. मिलिंद जोशी यांनी सातारच्या संमेलनाच्या निमित्ताने चांगले, अनुकरणीय पायंडे पडल्याचा उल्लेख केला. संमेलन साहित्य, लेखक, प्रकाशक, वाचककेंद्री ठरेल कारण संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक असतील. साहित्य संमेलन ही साहित्यिक – सांस्कृतिक तशीच राजकीय घटनाही असते. ती समाजसहभागानेच यशस्वी होते. सातारकर आयोजकांनी संमेलनाची, साहित्यिकांची स्वायत्तता टिकवून धरण्याचा आदर्श निर्माण केला आहे. संमेलने एका साच्यात अडकल्यासारखी झाली असताना, या संमेलनाच्या निमित्ताने साचा मोडून नव्या वाटांची निर्मिती साधली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीत होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने पुढील साहित्यिक चळवळींना बळ पुरवतात, असेही जोशी म्हणाले.
स्वागताध्यक्षांचा कुठलाही हस्तक्षेप नाही
साचा मोडला की, नव्या वाटा निर्माण होतात, असे नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हे स्वायत्त व्यासपीठ आहे त्याची स्वायत्तता जपली गेली पाहिजे. महामंडळाने संमेलन आयोजक संस्थेला दिले की आयोजकांचा महामंडळाशी संपर्क रहात नाही. पण सातारा येथील परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. संमेलनाचे स्वागाताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत कुठल्याही हस्तक्षेप केलेला नाही. कविसंमेलन कुण्याच्या अध्यक्षतेखाली घ्यावे, परिसंवादात कुणाचा सहभाग असावा यासाठी कुठलाही दबाव आणलेला नाही, अशा शब्दात प्रा. मिलिंद जोशी यांनी श्रीमंत छत्रपती शिवजेंद्रराजे भोसले यांचे कौतुक केले.
शब्द, विचार, परिवर्तन आणि संवादाची पायाभरणी : सुनिताराजे पवार
सुनिताराजे पवार म्हणाल्या, संमेलनातील साचलेपणा जाऊन नवे प्रयोग या संमेलनात होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. परंपरा आणि परिवर्तनाच्या वाटेने हे संमेलन वेगळा वैचारिक संवाद घडवेल. संमेलनाच्या मंडपाची पायाभरणी करताना शब्द, विचार, परिवर्तन आणि संवादाचा पाया भरला गेला आहे.
खंडित प्रवाह वाहता ठेवण्याचा प्रयत्न : विनोद कुलकर्णी
विनोद कुलकर्णी यांनी सातारा येथे झालेल्या आधीच्या संमेलनाच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर बराच खंड पडल्यानंतर हे संमेलन सातारकरांना मिळाले आहे. तो खंडित प्रवाह वाहता ठेवण्याचा प्रयत्न ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्रितपणे करू, असे ते म्हणाले.
नंदकुमार सावंत यांनी स्वागतपर प्रास्ताविकात आयोजकांच्या वतीने संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. संमेलन मिळणे, ते यशस्वी करणे, हे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिले होते. त्याची परिपूर्ती कष्टसाध्य आहे, पण आनंददायी आहे, असे ते म्हणाले.
मान्यवरांचे स्वागत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप शाखेचे सभासद वझिर नदाफ, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी केले. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी मानले.
फोटो ओळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज (दि. १६) शाहू स्टेडिअम, सातारा येथे सरस्वती पुरस्कारप्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते झाला. समवेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी.
