पुणे – आगामी काळातील अखिल भारतीय साहित्य संमेलने ही अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी संमेलनाध्यक्षांनी आज केली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचे. या निमित्ताने माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, डाॅ. सदानंद मोरे, डाॅ. अरुणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार व कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी हे महामंडळाचे कार्यालय आता कार्यरत असणार आहे..
या वेळी राजेंद्र बनहट्टी म्हणाले, १९८८ ते १९९२ या काळात पुण्यामध्ये महामंडळाचे कार्यालय होते तेव्हा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी अक्षर वाङ्मय योजना आणण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामध्ये १०० उत्कृष्ट पुस्तके अवघ्या एक हजार रुपयांत द्यायची योजना होती. मात्र ती योजना धूळ खात पडली. आता महामंडळाने अशीच एक नवी योजना नूतनीकरण करून आणावी आणि वाचकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा
डाॅ. सदानंद मोरे म्हणाले, साहित्य संमेलनाच्या रुपाने साहित्याचा उत्सव जरुर व्हावा परंतु काही ठोससुद्धा व्हावे अशी अपेक्षा आहे. सध्याच्या काळामध्ये भाषेवर आक्रमण करणारे एक नवे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या रुपाने आलेले आहे. सगळ्याच भाषांना या एआयचा सामना करावा लागणार आहे. कारण हे तंत्रज्ञान जगण्याला व्यापून टाकणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, साहित्य संमेलने लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. इंग्रजी लिट फेस्टिव्हलला युवकांचा जो प्रतिसाद मिळतो तो इतका का असतो याचा अभ्यास आपणही करणे गरजेचे आहे. त्यानुसार संमेलनात बदल करणे गरजेचे आहे. परिसंवाद केंद्रित संमेलनाकडून ती पुस्तककेंद्रित आणि लेखककेंद्रित होणे गरजेचे आहे. वाचकांचा विचार करून उपक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीला नवे वळण कसे देता येईल हे पाहायला हवे.
भारत सासणे म्हणाले, नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या नामांकीत व्यक्ती, लेखक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. त्यातून वैश्विक विचार आपल्याला समजतील. संमेलने अधिक उंचीवर जाण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. बालसाहित्य हा विषय दुर्लक्षित राहत असल्याने संमेलनात त्याला महत्त्वाचे स्थान देणे गरजेचे आहे.
या वेळी माजी संमलेनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांनी लिहून शुभेच्छा पाठवल्या. प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.
चौकट
संमेलन सर्वसमावेशक करणार – प्रा. मिलिंद जोशी
अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अन्य कोणाच्याही हस्ते करता आले असते परंतु सर्व संमेलनाध्यक्ष हे साहित्यविश्वाचे ब्रँड एम्बेसिडर आहेत म्हणून त्यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले आहे. साचा मोडल्याशिवाय नवे काही करता येणार नाही. हे एकदम होणार नसले तरी किमान दारे, खिडक्या किलकिले करण्याचे काम पुढील तीन वर्षांत नक्की केले जाईल. साहित्य संमेलनामध्ये दिसणारे तेच तेच चेहरे टाळून नवे चेहरे आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. परिसंवादांचे स्वरुप बदलून त्यांना चर्चासत्रांचे स्वरुप दिले जाईल. बालसाहित्यालाही संमेलनात स्थान दिले जाईल. ते सर्वसमावेशक कसे होईल असा प्रयत्न केला जाईल. संमेलन वाचककेंद्री व्हावे असा प्रयत्न केला जाईल आणि ग्रंथप्रदर्शनांतील तक्रारीही दूर केल्या जातील. संवादाचे पूल जोडण्याचे काम नक्की केले जाईल, अशी ग्वाही दिली.