Uncategorized

Uncategorized

कृती समिती मराठी भाषा विरोधी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे टीकास्त्र 

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीका करणाऱ्या कृती समितीत पहिलीपासून हिंदी सक्तीची करावी याचे समर्थन करणारे मराठी विरोधी लोक आहेत. साहित्य परिषदेने हिंदीच्या सक्तीला ठाम विरोध केलेला आहे. सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याने तिथे त्यांचा भ्रमनिरास झाला या धक्क्यातून सावरण्याआधीच  इकडेही धर्मादाय उपायुक्त यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विलंब माफी अर्जाबाबतचा आदेश त्यांच्या विरोधात गेला त्यामुळे आगपाखड करणे हे तंत्र आत्मसात केलेल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवायच्या ? विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला ,निकाल मान्य नसेल तर त्याला आव्हान द्या असे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  पवार म्हणाल्या, न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागावा यासाठी सरकारचा हस्तक्षेप वापरून न्यायाधीशांची चौकशी लावण्यापर्यंत या कृती समितीची मजल गेली आहे. तरीही न्यायालय महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफ़ी अर्ज मंजूर करते, न्यायालयाला चौकशीची भीती दाखवूनही काही घड़त नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे यांना पोटशूळ उठला आहे. हिंदीला मोठे करायचे असेल तर मराठी भाषक संस्था निष्ठेने चालवणारे कार्यकर्ते आधी संपवले पाहिजेत या भूमिकेतून स्थापन झालेली आणि नोंदणीकृत नसलेली कृती समिती काम करत आहे. हे परिषदेचे आजीव सभासद नसणारे दोन तीन लोक आहेत. संस्थेवर प्रशासक आणून हुकुमशाही पद्धतीने यांना हिंदीचा कार्यक्रम हवा तसा राबवायचा आहे. त्यांचा बोलवता धनी वेगळाच आहे.      साहित्य परिषदेच्या विरोधात तक्रार करणारे विजय शेंडगे न्यायालयाने दिलेल्या पाच सहा तारखांना उपस्थित नाहीत. धनंजय कुलकर्णी, शशांक महाजन याच लोकांना पुढे करून न्यायाच्या व न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप व अडथळा आणून कार्यालयीन प्रक्रियेचा अवमान करत आहेत.धनंजय कुलकर्णी हे खरे तर बदल अर्जाचे पक्षकार देखील नाहीत त्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाची त्यांना काहीही माहिती नाही असे असताना ऐकीव किंवा अर्धवट माहितीच्या आधारे खोटे बोल पण रेटून बोल  या हेतूने ते खोट्या बातम्या प्रसारित करत आहेत.ऐनकेन प्रकाराने न्यायालय व न्यायावर दबाव आणणे हा एकमेव हेतू समोर ठेवून काम करत असल्याचे स्पष्ट दिसते आहेच तसेच प्रसार माध्यमात  कार्यकारी मंडळावर खोटे नाटेआरोप करत आहेत.परिषदेची बदनामी करणे हाच या मराठी विरोधी लोकांचा हेतू आहे.एवढी आघाडी उघडूनही त्यांना साहित्य विश्वाकडून अजिबात प्रतिसाद नाही त्यामुळे त्यांना आलेल्या नैराश्यातून ते असे प्रकार करत आहेत.न्यायालय आदेश देईल तेव्हा निवडणुका घेण्याची कार्यकारी मंडळाची  तयारी आहे. कार्यकारी मंडळ निवडणुकांना घाबरत नाही. प्रशासक आणा असे बोलणार्यांचे हेतू शुद्ध नाहीत. त्यांना संस्था ताब्यात घ्यायची आहे. घटनाबाह्य विरोधी समितीचा छुपा हेतू योग्यवेळी जाहीर करू, त्यावेळी खुलाशाने समाज हादरून जाईल.  परिषदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुन निवडणुकीविषयी भाष्य करत नाही. मात्र ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी अशा हिंदी धार्जिण्या सभासद नसलेल्या लोकांच्या पाठिंब्याचे पॅनेल पराभूत करू. कोणत्याही परिस्थितीत आणि कितीही दबाव आला तरी हिंदीचा आग्रह धरणाऱ्यापुढे झुकणार नाही.

Uncategorized

संतांच्या महासमन्वयाची महाराष्ट्राला गरज : उल्हास पवार

दत्ता गोसावी यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार पुणे : जातीपातीच्या राजकारणात अडकलेल्या महाराष्ट्राला संतांच्या महासमन्वयाची गरज असे मत ज्येष्ठ नेते उल्हास पवार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दत्ता गोसावी यांच्या ‘आतां तरी हाचि उपदेश | संत तुकारामांच्या निवडक उपदेशपर अभंगाचे रसाळ विवरण’ या वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला पवार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंदिनी क्षीरसागर, कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी उपस्थित होते. पवार म्हणाले, सोनोपंत दांडेकर हे एक सत्वसंपन्न व्यक्तिमत्व होते. त्यांनी संतांचे तत्वज्ञान महाराष्ट्राला साध्या, सोप्या शब्दात सांगितले. गोसावी म्हणाले, अभंग विवरण लेखनाची प्रेरणा, स्फूर्ती आणि प्रकाशनाचा योग या सगळ्या गोष्टी केवळ तुकोबांच्या करुणाकृपेमुळेच घडलेल्या आहेत, अशी माझी दृढ श्रद्धा आहे. त्यांचे ऋण शब्दातीत आहे. प्रा. जोशी म्हणाले, संतानी अध्यात्माचे लोकशाहीकरण केले. विविध जाती-धर्मात विभागलेला समाज त्यांनी विठ्ठल नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणला. राष्ट्रीय एकात्मतेच्या पलीकडे जाऊन वैश्विक एकात्मतेची कल्पना मांडली. संतांनी व्यक्ती आणि समाज, बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ, लौकिक आणि अलोकिक अशी दोन टोके सांधत मानवी मनाला आणि जीवनाला उन्नत करणारे विचार त्यांच्या साहित्यातून दिले. संतांनी प्रखर प्रवृत्तीवाद समाजासमोर मांडला. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. आनंदिनी क्षीरसागर यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. 

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफी अर्ज मंजूर

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफी अर्ज मंजूर, विरोधकांची मागणी  फेटाळलीपुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेने धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केलेल्या बदल अर्जावरील विलंब माफी अर्ज सशुल्क स्वीकारण्याचा आदेश धर्मादाय उपायुक्तांनी दिला. महाराष्ट्र साहित्य परिषदेने दाखल केलेल्या बदल अर्जावर विलंब माफी देऊ नका, ही विरोधकांनी केलेली मागणी  धर्मादाय उपायुक्त राजेश परदेशी यांनी फेटाळून लावली असल्याची माहिती परिषदेच्यावतीने एका पत्रकाद्वारे देण्यात आली आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने कोरोनाच्या  लाटेत मृत्यूचे तांडव सुरु असताना निवडणुका घेणे शक्य नसल्याने वार्षिक सर्वसाधारण सभेस सामोरे जाण्याचा निर्णय घेतला आणि वार्षिक सर्वसाधारण सभेने विद्यमान कार्यकारी मंडळाची निवड पुढील पाच वर्षांसाठी त्याच सभेत केली. त्याचा बदल अर्ज  परिषदेने कायदेशीररित्या धर्मादाय आयुक्त कार्यालयात दाखल केला. कोरोनामुळे असलेल्या निर्बंधांमुळे वेळेत बदल अर्ज दाखल करणे शक्य नव्हते. त्यामुळे विलंबाने बदल अर्ज दाखल केलेला होता. त्यासोबत विलंब माफीचा अर्जही दाखल केलेला होता. हा अर्ज मंजूर करु नये, अशी जोरदार मागणी विरोधी वकीलांनी केली होती. त्यावर सुनावणी झाली. परिषदेची कायदेशीर बाजू भक्कमपणे ॲड. यशवंत पवार यांनी मांडली. दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकून  धर्मादाय उपायुक्त यांनी बदल अर्जाचा विलंब माफी अर्ज मंजूर केला आहे. धर्मादाय उपायुक्त कायदेशीर मार्गाने सुनावणी घेत आहेत. परिषदेचा न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेने जे काही केले आहे ते परिस्थितीनुरुप आणि कायद्याला धरुन केले आहे. परिषदेला न्यायालयात निश्चित न्याय मिळेल याची खात्री आहे. विलंब माफी अर्ज मंजूर झाल्याने पहिल्या टप्प्यात परिषदेने केलेली कार्यवाही योग्य ठरली आहे, अशी प्रतिक्रिया परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार  यांनी दिली आहे.

Uncategorized

दत्ता गोसावी यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी डॉ. म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार दत्ता गोसावी यांच्या ‘आतां तरी हाचि उपदेश | संत तुकारामांच्या निवडक उपदेशपर अभंगाचे रसाळ विवरण’ या वरदा प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ११ जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात उल्हास पवार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Uncategorized

बृहन्महाराष्ट्रातील संस्थांसाठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

पुणे : बृहन्महाराष्ट्रातील मराठी संस्थांना अर्थसाहाय्य मिळावे आणि मराठी भाषा पंधरवडा कालावधी बदलण्यात यावा यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे  अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेऊन त्यांना पत्र दिले. यावेळी ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, महाराष्ट्र राज्याने २०१० साली स्वीकारलेल्या सांस्कृतिक धोरणातील प्रकरण ४ ‘भाषा आणि साहित्य’ या अंतर्गत बृहन्महाराष्ट्र या विभागात बृहन्महाराष्ट्रातील मंडळांना अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने बृहन्महाराष्ट्र मंडळे अर्थसाहाय्य योजना राबवण्यात येत होती. परंतु २०२३ पासून ती बंद आहे. हा बृहन्महाराष्ट्रातील मराठी बांधव आणि संस्थांवर अन्याय आहे. जिथे मराठी भाषा राज्याची आणि संवादाची मुख्य भाषा नाही तिथे आपली भाषा आणि संस्कृती टिकवण्यासाठी ही योजना तातडीने सुरु करावी. महाराष्ट्राबाहेर अन्य राज्यांत मराठी भाषा, साहित्य आणि महाराष्ट्रीय संस्कृती यासंदर्भात कार्य करणाऱ्या मान्यताप्राप्त संस्थांना तसेच महाराष्ट्राबाहेर मराठी ग्रंथ प्रकाशनाचे दर्जेदार कार्य करणाऱ्या संस्थांना अर्थसाहाय्य देण्यात येत होते. महाराष्ट्राबाहेरील इतर राज्यात मराठी भाषा, साहित्य व संस्कृती वृद्धिंगत होण्यासाठी कार्य करणाऱ्या देशांतर्गत बृहन्महाराष्ट्रातील मान्यताप्राप्त संस्थांना / मंडळांना रु. ५०.०० लक्ष (प्रत्येकी रु. २.०० लक्षच्या मर्यादेत) अर्थसाहाय्य करण्यात येत होते. परंतु २०२३ पासून हे अर्थसाहाय्य बंद आहे, त्यामुळे  तातडीने याप्रश्नी लक्ष घालून हे अर्थसाहाय्य त्वरित सुरु करावे असे पत्रात नमूद करण्यात आले आहे. तसेच महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाच्या वतीने प्रतिवर्षी जानेवारी महिन्यात मराठी भाषा पंधरवडा साजरा करा व त्या निमित्ताने विविध भाषा विषयक कार्यक्रम घ्या असे निवेदन महाराष्ट्रातील सर्व साहित्य संस्था, विद्यापीठे, महाविद्यालये यांना पाठवले जाते व त्यानुसार कार्यक्रम घेतले जातात. हा मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला पाहिजे कारण २७ फेब्रुवारी हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन आहे तर १४ मार्च हा ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित श्रेष्ठ कवी विंदा करंदीकर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतींचा जागर हे औचित्य मराठी भाषा पंधरवडा साजरा करण्यासाठी अधिक योग्य आहे. त्याचा गांभीर्याने विचार करून यापुढे मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा. याबाबतचा ठरावही दिल्लीतील ९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात करण्यात आला होता, परंतु अद्याप त्याची अंमलबजावणी झालेली नाही. याप्रश्नी प्राधान्याने लक्ष घालून २०२६ पासून मराठी भाषा पंधरवडा २७ फेब्रुवारी ते १४ मार्च या कालावधीत साजरा केला जावा  यासाठी संबंधितांना तातडीने सूचना द्याव्यात आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनातील ठरावाची अंमलबजावणी व्हावी असेही पत्रात नमूद करण्यात आले आहे. हे विषय तातडीने मार्गी लावतो असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले आहे असे प्रा. मिलिंद जोशी यांनी सांगितले.

Uncategorized

५  जुलैच्या मोर्चात अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ सहभागी होणार

संस्थांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि मराठीप्रेमींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन   पुणे : पहिलीपासून हिंदी किंवा अन्य भारतीय भाषांची सक्ती करण्याच्या शासनाच्या निर्णयाविरोधात पाच जुलै रोजी मुंबई येथे होणाऱ्या मोर्चात सहभागी होण्याचा निर्णय अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने घेतला आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली प्रा. जोशी म्हणाले, मुंबईत पाच जुलै रोजी भाषाविषयक काम करणाऱ्या संस्था व साहित्यिकांनी मोर्चाचे आयोजन करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. हा मोर्चा कोणत्याही एका राजकींय पक्षाच्या झेंड्याखाली होणार नाही असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाला राजकारणात काडीचाही रस नाही. मराठीवरील अन्याय दूर व्हावा आणि मराठीचा झेंडा डौलाने फडकत राहावा हीच साहित्य महामंडळाची भूमिका आहे. त्या भूमिकेतूनच साहित्य महामंडळ या मोर्चात सहभागी होत आहे. महाराष्ट्रातील भाषा व साहित्यविषयक काम करणाऱ्या संस्थांनी, साहित्यिकांनी, कलावंतांनी आणि मराठीप्रेमींनी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले आहे. प्रा. जोशी म्हणाले  शिक्षण मंत्र्यांनी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी वा अन्य भारतीय भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य शासनाने स्थगित केला आहे असे जाहीर केले पण अचानक शिक्षण तज्ज्ञ, भाषा विषयक काम करणाऱ्या साहित्य संस्था किंवा राज्य शासन नियुक्त भाषा सल्लागार समितीशी चर्चा व विचार विनिमय न करता हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याबाबत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर  शासन शुद्धिपत्रक काढून मूळ १६ एप्रिलचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यावरून हिंदी सक्तीबाबत जे मुद्दे व  शास्त्रशुद्ध विचार मांडण्यात आले होते, त्याचा कसलाच विचार शासनाने केला नाही, शासनाची ही मराठीप्रेमी नागरिकांप्रतिची असंवेदनशीलता चिंताजनक आहे. शासनाच्या या निर्णयाला अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने विरोध केला आणि तसे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठविले आहे. आमचा कोणत्याही भाषेला विरोध नाही ती सक्तीने शिकवण्याला विरोध आहे.        कोवळ्या वयात पहिलीला मराठी खेरीज दोन भाषा विद्यार्थ्यांसाठी परक्याच असतात, त्या शिकणे त्याला नक्कीच जड जाते, हे बालमानसशास्त्र सांगते. शिक्षकांची मोठ्या संख्येने रिक्त असलेली पदे, अनेक शाळा एक किंवा दोन शिक्षकी असणे, हिंदी अनिवार्य करताना नवीन भरती तूर्त न करता कार्यरत शिक्षकाकडून ती शिकवण्याचा निर्णय, पहिली ते दहावीपर्यंत मराठी व इंग्रजी सक्तीची असताना आठवीच्या मुलांना दुसरीचे मराठी नीट न वाचता येणे आणि इंग्रजीचे पण तसेच चित्र असणे, असा भाषा शिक्षणाचा दर्जा असताना तेथे गुणवत्तावाढीसाठी प्रचंड प्रयत्न करण्याची गरज असताना त्याच्याकडे लक्ष न देता तिसरी भाषा अनिवार्य केली तर विद्यार्थी तिन्ही भाषांत मागे पडण्याची भीती वाटते. महाराष्ट्राची ओळख व अस्मिता मराठी भाषा व संस्कृती  आहे. भविष्यात महाराष्ट्राची मराठी भाषक राज्य म्हणून असणारी ओळख पुसट होणे ही राज्याची सर्वांत मोठी हानी ठरेल.

Uncategorized

पहिलीपासून हिंदी व अन्य भाषा शिकविण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा

पहिलीपासून हिंदी व अन्य भाषा शिकविण्याचा महाराष्ट्र शासनाने घेतलेला निर्णय रद्द करण्यात यावा यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषदेत आज बैठक झाली. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष लक्ष्मीकांत देशमुख, साहित्य महामंडळाच्या कार्यवाह सुनिताराजे पवार, प्रसिद्ध लेखक अच्युत गोडबोले, राजीव तांबे, डॉ. केशव देशमुख, साहित्य परिषदेचे कार्यवाह प्रमोद आडेकर, अंजली कुलकर्णी, मृणालिनी कानेटकर जोशी, जोत्स्ना चांदगुडे, डॉ. माधुरी कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे पराग लोणकर, दत्तात्रय पाष्टे, डॉ. स्नेहसुधा कुलकर्णी, संवादचे सुनील महाजन, अखिल भारतीय समाजवादी शिक्षण सभेचे शरद जावडेकर, मराठीच्या व्यापक हितासाठी चळवळीचे अनिल कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेचे माधव राजगुरू, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराजराजे भोसले यावेळी उपस्थित होते या बैठकीत झालेल्या चर्चेनुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना खालील मुद्द्यांचा समावेश असलेले पत्र पाठविण्यात आले. सोबत पत्र दिले आहे, पत्रकार परिषदेत त्याबाबत सांगण्यात आले.  ____________________________________________________________________________________________ मा. देवेंद्रजी फडणवीसमुख्यमंत्रीमहाराष्ट्र राज्यमंत्रालय, मुंबई     विषय : पहिली ते पाचवी इयत्तेसाठी हिंदी वा अन्य भाषा शिकविण्याचा निर्णय रद्द करणेबाबत.    संदर्भ : १) शासन शिक्षण  व क्रीडा विभाग शासन शुद्धिपत्रक क्रमांक : क्रमांक : संकीर्ण – २०२५/ प्र. क्र. ९४/एस. डी.-४ दिनांक : १७ जून २०२५   २) मा. शिक्षण मंत्री श्री. दादा भुसे यांनी दिनांक २५ मे २०२५ रोजी पुणे येथे केलेली जाहीर घोषणा (सर्व मराठी वृतपत्रात आलेल्या बातम्या)आदरणीय महोदय,     उपरोक्त संदर्भ दोन नुसार राज्याच्या शिक्षणमंत्र्यांनी पत्रकारांशी बोलताना जी घोषणा केली, ती सर्व मराठी वृत्तपत्रांत प्रसिद्ध झाली होती, ती खालील प्रमाणे होती. पुणे – २५ मे. राज्यात इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याबाबतच्या चर्चेला शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी रविवारी पूर्णविराम दिला. ‘इयत्ता पहिलीपासून तिसरी भाषा लागू करण्याचा निर्णय स्थगित करण्यात आला आहे. त्याबाबत कोणाच्याही मनात काहीही शंका असायला नको. आतापर्यंत जी कार्यपद्धती होती, त्यानुसारच शैक्षणिक कामकाज होईल.’      महोदय, राज्याच्या जबाबदार मंत्र्यांनी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत हिंदी वा अन्य भारतीय भाषा शिकवण्याचा निर्णय राज्य शासनाने स्थगित केला आहे असे जाहीर केले पण अचानक शिक्षण तज्ज्ञ, भाषा विषयक काम करणाऱ्या साहित्य संस्था किंवा राज्य शासन नियुक्त भाषा सल्लागार समितीशी चर्चा व विचार विनिमय न करता हिंदी किंवा अन्य भारतीय भाषा शिकवण्याबाबत शैक्षणिक वर्ष सुरू झाल्यावर  शासन शुद्धिपत्रक काढून मूळ १६ एप्रिलचा निर्णय कायम ठेवण्यात आला. त्यावरून हिंदी सक्तीबाबत जे मुद्दे व  शास्त्रशुद्ध विचार मांडण्यात आले होते, त्याचा कसलाच विचार शासनाने केला नाही, हे स्पष्ट होते. शासनाच्या या मराठीप्रेमी नागरिकांप्रतिच्या असंवेदनशीलतेचा आम्ही सर्वपथम तीव्र निषेध करतो आणि स्पष्टपणे हे सांगू इच्छितो की, हिंदीची सक्ती आम्ही मराठीसाठी काम करणाऱ्या संस्था, लेखक, कलावंत, शिक्षक आणि मराठीप्रेमी नागरिक अमान्य करत आहोत. शासनाने त्वरित हा निर्णय रद्द करावा असे आवाहन करतो. अन्यथा आम्हाला शासन विरोधात शांततापूर्ण आंदोलन करावे लागेल.      आमचा पहिलीपासून तिसरी भाषा शिकविण्यास विरोध का आहे हे येथे आम्ही खालील प्रमाणे सादर करीत आहोत, त्याचा सरकारने गांभीर्याने विचार करावा ही अपेक्षा.      केंद्र शासनाचे व राज्य शासनाचे  राष्ट्रीय शिक्षण धोरण व अभ्यासक्रम आराखडे ( National and State curriculum framework for School Education ) संकेतस्थळावर उपलब्ध आहेत, त्यातील त्रि- भाषा धोरणाच्या शिफारशीच्या आधारे नम्रपणे पण स्पष्टपणे आम्ही हे सांगू इच्छितो की, राष्ट्रीय शिक्षण धोरणाशी आपला शासन निर्णय पूर्णपणे विसंगत व ध्येयधोरणाशी फारकत घेणारा आहे कारण राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखड्यामध्ये (NCF 2023) तिसरी भाषा पायाभूत व  पूर्व तयारी स्तरावर (म्हणजे पहिली ते पाचवी स्तरावर) शिकविण्याची मुळातच शिफारस केलेली नाही, तर तिसरी भाषा सहावीपासून शिकवावी असे स्पष्टपणे म्हटले आहे. तेव्हा शासन व  खास करून शिक्षण विभाग हिंदी सक्तीचे व एकूणच तिसऱ्या भाषेच्या सक्तीचे समर्थन त्याआधारे कसे करू शकते ?      राज्याचे भाषा शिक्षण धोरण पहिले १९६८ मग दुसरे १९८६ च्या धोरणाशी आजवर सुसंगत होते, मग  आता आपल्याच पक्षाच्या केंद्र सरकारच्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० आणि राष्ट्रीय शिक्षण आराखड्यात शिफारस न केलेली तिसरी भाषा आपण का लादत आहात ?      आमचा पहिली ते पाचवीसाठी तिसरी भाषा शिकवण्याला जो विरोध आहे, त्याची कारणे खालील प्रमाणे आहेत.                 | एक |      राष्ट्रीय शिक्षण  धोरणातील परिच्छेद ४.३३ मध्ये  पूर्वीप्रमाणेच त्रि -भाषा धोरण चालू राहील असे नमूद केले आहे. त्यात कुठेही ते पहिलीपासून लागू करावे असे म्हटलेले नाही. १९६८  व १९८६ च्या आधीच्या त्रि-भाषा धोरणानुसार महाराष्ट्रात पाचवीपासून दुसरी व तिसरी भाषा (इंग्रजी व हिंदी) आधीपासून लागू होती. २००१ साली तत्कालीन शिक्षण मंत्री कै. प्रा. रामकृष्ण मोरे यांच्या कार्यकाळात  पालकांचा कल लक्षात घेऊन पहिलीपासून इंग्रजी अनिवार्य करण्यात आली. त्यामुळे नव्या शतकात महाराष्ट्रात पहिली ते चौथी मराठी व इंग्रजी आणि पाचवीपासून हिंदीसह त्रि-भाषा धोरण अमलात आहे, हे सर्वज्ञात आहे.  पण नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० मध्ये पहिलीपासून तीन भाषा शिकवाव्यात असे म्हटलेले नाही आणि कोणत्याही भाषेची सक्ती केली जाणार नाही  असेही स्पष्ट म्हटले आहे.                        | दोन  |        राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० च्या आधारे केंद्राने ‘National Curriculum Framework for School Education 2023’ प्रसिद्ध केला आहे व त्या आधारे राज्यांनी आपले अभ्यासक्रम आराखडे बनवावेत, असे निर्देशित केले आहे.सदर  राष्ट्रीय शिक्षण आराखड्यात भाषेसंदर्भात पुढील प्रमाणे सुस्पष्ट शिफारशी आहेत.       1.4.1 Foundational stage     a) This stage is for students aged between 3 and 8.     b)…..    c) children to learn two languages (R1 and R2) and are expected to achieve Foundational Literacy in R1 by the end of this stage.1.4.2 Preparatory Stage      a) This stage is for students aged between 8 and 11      b) The Learning Standards for this stage have been set for two languages within language education (R1 and R2),     महोदय, या शिफारशी पाहता पहिली ते पाचवीसाठी फक्त दोन भाषा R 1 आणि R 2 शिकवाव्यात असे म्हटले आहे. मग राज्यात तिसऱ्या भाषेची सक्ती कशासाठी याचे समर्पक व शास्त्रशुद्ध उत्तर राज्य अभ्यासक्रम आराखडा व शासन निर्णयात सापडत नाही.                |  तीन  |      आता आपल्या महाराष्ट्र राज्याच्या SCERT चा ‘प्राथमिक राज्य अभ्यासक्रम आराखडा’, (जो प्रसिद्ध करून लोकांच्या सूचना व आक्षेप मागविले होते), त्यात भाषेबाबतच्या ज्या शिफारशी केल्या आहेत त्या पाहू या. त्या खालील प्रमाणे आहेत.विभाग १.४ : शिकण्याची मानकेपायाभूत स्तर (बालवाटिका ते इयत्ता दुसरी) : ——RI आणि R2 (दोन भारतीय भाषा) मध्ये विद्यार्थ्यांची स्व-ओळख निर्माण करणे.—-पूर्वतयारी स्तर (इयत्ता तिसरी ते पाचवी) :—-R1 आणि R2 मध्ये बोलण्यातील प्रावीण्य, वाचन आणि लेखन क्षमता विकसित करणे. (राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण (SCF-SE) (भाग क)  पान क्रमांक ११४) प्रमाणे)          वरील शिफारशी स्वयंस्पष्ट आहेत. राज्य सरकारच्या

Uncategorized

९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार  साताऱ्याला

पुणे : ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साताऱ्याला होणार आहे. ते आयोजित करण्याचा मान साताऱ्यातील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या शाहूपुरी शाखेला आणि मावळा फौंडेशनला मिळणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत हा निर्णय एकमताने घेण्यात आला अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली. या बैठकीला उपाध्यक्ष गुरुय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या सह सर्व घटक, समाविष्ट आणि संलग्न संस्थांचे प्रतिधिनी उपस्थित होते. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली होती. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी  निमंत्रक संस्थांना भेट देऊन आली. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली होती. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे संपन्न झाली. त्यात साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेण्याचा निर्णय एकमताने घेण्यात आला. त्यानंतर झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या बैठकीत स्थळ निवड समितीच्या निर्णयावर महामंडळाने एकमताने शिक्कामोर्तब केले. प्रा मिलिंद जोशी म्हणाले, साताऱ्याला ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित करण्याचा मान मिळाला आहे. यापूर्वी १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात संमेलन झाले होते. गेल्या १२ वर्षांपासून महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा साताऱ्याला अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या आयोजनाची संधी मिळावी यासाठी पाठपुरावा करत होती. साताऱ्यातील ४ थे संमेलन साताऱ्यात होणारे हे ४ थे संमेलन आहे. १८७८ मध्ये लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे यांनी ग्रंथकार संमेलन सुरु केल्यानंतर ३ रे संमेलन १९०५ साली रघुनाथ पांडुरंग करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली साताऱ्यात  झाले होते. १९६२ मध्ये न. वि. गाडगीळ यांच्या अध्यक्षतेखाली ४४ वे तर १९९३ साली विद्याधर गोखले यांच्या अध्यक्षतेखाली ६६ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन संपन्न झाले होते. शाहू स्टेडीअमवर होणार संमेलन नियोजित संमेलन स्थळ छत्रपती शाहू स्टेडियम हे आहे. योगायोग असा की १९९३  साली ६६ वे संमेलन इथेच झाले होते. हे स्टेडियम १४ एकरात असून तिथे मुख्य मंडप, २ इतर मंडप, ग्रंथ प्रदर्शन, कवी गझल कट्टा, तसेच भोजन व्यवस्था करण्यात येणार आहे. इतर छोटे कार्यक्रम करण्यासाठी तीन सभागृहे उपलब्ध आहेत. स्टेडियम मध्ये २५००० प्रेक्षक क्षमता असलेली गॅलरी आहे. हे स्टेडियम सातारा बस स्थानकापासून पायी चालत जाण्याच्या अंतरावर  असून शहराच्या मध्यभागी असल्याने शहरातील आणि बाहेरून येणाऱ्या साहित्य रसिकांची सोय होणार आहे. स्टेडियमच्या पाठीमागील बाजूस पोलिस परेड ग्राउंडची ८ एकर जागा असून तिचा वापर पार्किंगसाठी करता येणार आहे. स्थळ निवड समिती या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती गठीत करण्यात आली असून त्यात प्रा मिलिंद जोशी, गुरय्या स्वामी, सुनिता राजे पवार, विनोद कुलकर्णी, प्रदीप दाते, दादा गोरे आणि डॉ उज्ज्वला मेहेंदळे यांचा समावेश आहे.

Uncategorized

९९ व्या साहित्य संमेलनाचे  स्थळ ठरणार आठ जूनला

पुणे : ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ ८ जूनला ठरणार आहे अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा जोशी म्हणाले, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे स्थळ निश्चित करण्यासाठी स्थळ निवड समिती गठित करण्यात आली आहे. ही समिती पाच, सहा आणि सात जून रोजी  निमंत्रक संस्थांना भेट देणार आहे. ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सदानंद साहित्य मंडळ, औदुंबर, महाराष्ट्र साहित्य परिषद, शाखा इचलकरंजी, दक्षिण महाराष्ट्र साहित्य सभा, कोल्हापूर आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा शाहूपुरी, सातारा या संस्थांकडून निमंत्रणे आली आहेत. या स्थळांना भेटी दिल्यानंतर स्थळ निवड समितीची बैठक ८ जून रोजी सकाळी पुणे येथे होणार आहे .त्यानंतर त्याच दिवशी सकाळी ११ वाजता अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाची बैठक होणार असून त्यात ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या स्थळावरती शिक्कामोर्तब होईल. स्थळ निवड समितीत अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, उपाध्यक्ष गुरय्या स्वामी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष प्रदीप दाते, मराठवाडा साहित्य परिषदेचे रामचंद्र काळुंखे, मुंबई मराठी साहित्य संघाच्या प्रतिभा सराफ यांचा समावेश आहे.

Uncategorized

प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समिती, पुणे

मा. संपादक  ————- पुणे.  डॉ. शंकर अभ्यंकर यांना प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान जाहीर साखळीपीर तालीम वसंत व्याख्यानमालेचा विशेष सन्मान पुणे : प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीच्या वतीने देण्यात येणारा प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती सन्मान या वर्षी प्रसिद्ध व्याख्याते  डॉ. शंकर अभ्यंकर यांना जाहीर झाला आहे. गेली ३२ वर्षे श्रवणसंस्कृती समृद्ध करण्यासाठी कार्यरत असलेल्या, साखळीपीर तालीम राष्ट्रीय मारुती मंदिर आयोजित वसंत व्याख्यानमालेचा यावर्षी विशेष  सन्मान करण्यात येणार आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरुप आहे. प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या ९८ व्या जयंती दिनी १५ जुलै रोजी (मंगळवार) सायं. ६.०० वा. एस. एम. जोशी सभागृहात होणाऱ्या समारंभात मूर्तिशास्त्राचे गाढे अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्काराचे हे बारावे वर्ष असून यापूर्वी शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, डॉ. रघुनाथ माशेलकर, सिंधुताई सपकाळ, प्रा. द. मा. मिरासदार, डॉ. ह. वि. सरदेसाई, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, नरेंद्र चपळगावकर, डॉ. रामचंद्र देखणे, डॉ. यशवंत पाटणे, डॉ. अरुणा ढेरे यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे. अशी माहिती प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.    प्रा. जोशी म्हणाले, “महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत आणि ख्यातनाम वक्ते प्राचार्य शिवाजीराव भोसले यांच्या निधनानंतर त्यांच्या स्मृती जपण्यासाठी प्राचार्य शिवाजीराव भोसले स्मृती समितीची स्थापना करण्यात आली. आपल्या अमोघ आणि विचारसंपन्न वक्तृत्वाच्या माध्यमातून समाजमानस समृद्ध करण्याचे काम प्राचार्य शिवाजीराव भोसले यांनी केले. जीवनाच्या सर्व क्षेत्रांत व्रतस्थ वृत्तीने काम करणाऱ्या माणसांविषयी प्राचार्यांना विलक्षण आदर होता. डॉ. शंकर अभ्यंकर यांनी गेली पाच दशके  व्याख्यानातून विचारजागर केला. या योगदानाबद्दल हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्याचे समितीने ठरविले आहे.  प्रा. मिलिंद जोशी

Scroll to Top