Uncategorized

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांच्या काव्यवाचनाचाकार्यक्रम

पुणे : दिल्लीतील प्रसिद्ध हिंदी कवी, नाटककार आणि छायाचित्रकार प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम महाराष्ट्र साहित्य परिषदेने आयोजित केला आहे. या निमित्ताने प्रा. सुरेश ऋतुपर्ण यांचा काव्यप्रवास जाणून घेण्याची संधी साहित्य रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम सोमवार, २४ नोव्हेंबर २०२५ रोजी सायं. ६.०० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Uncategorized

साहित्य संमेलन मंडपाच्या पायाभरणीचा शुभारंभ

सातारा येथील संमेलन वेगळेपण जपून यशस्वी होईल : शरणकुमार लिंबाळे समाजाचा शस्त्रावर नव्हे तर पुस्तकांवर विश्वास : शरणकुमार लिंबाळे संमेलन पुस्तके, लेखक-वाचक, कलावंतांचा महोत्सव ठरावा : शरणकुमार लिंबाळे सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते साहित्य संमेलन मंडपाच्या पायाभरणीचा शुभारंभ सातारा : साहित्य संमेलन आरशाप्रमाणे असते. समाजाच्या साहित्यिक व सांस्कृतिक चेहर्‍याचे प्रतिबिंब त्यात उमटते. संमेलनासाठी उभारण्यात येत असलेला मंडप हा सातारकरांच्या मायेचा पदरच आहे. सातारा येथे होत असलेले संमेलन म्हणजे पुस्तके, लेखक-वाचक, कलावंत यांचा महोत्सव ठरावा. समाज शस्त्रावर नव्हे तर पुस्तकांवर विश्वास ठेवतो. साहित्य संमेलने लोकांचे, लेखकांचे, राष्ट्राचे मन उन्नत करण्यासाठी आयोजित केली जातात. त्यामुळे सातारा येथे होणारे संमेलन यशस्वी तर होईलच, पण वेगळेपण जपणारे ठरेल, असा विश्वास सरस्वती सन्मानप्राप्त ज्येष्ठ साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांनी व्यक्त केला. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन सातारा येथे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे, शाखा शाहुपुरी (सातारा) आणि मावळा फौंडेशन, सातारा आयोजित या संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते सातारा येथील छत्रपती शाहू स्टेडियम येथे आज (दि. १६) आयोजित करण्यात आला होता. त्या वेळी शरणकुमार लिंबाळे बोलत होते. संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, महामंडळाचे कोषाध्यक्ष आणि संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, संमेलनाचे कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत, जनता सहकारी बँकेचे अध्यक्ष अमोल मोहिते आदी मान्यवर व्यासपीठावर होते. लिंबाळे पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाची वाटचाल शताब्दीकडे सुरू असतानाच्या ९९ व्या टप्प्यावरचे हे संमेलन आहे. संमेलनांचा प्रारंभ पुण्यात १८७८ पासून झाला. लोकहितवादी आणि न्यायमूर्ती रानडे या समाजधुरिणांनी ही पायाभरणी केली. तेव्हा लेखक आणि समाज यांच्यात संवाद साधला जावा, हीच अपेक्षा होती. लेखक हाही समाजाचा घटक असतो. त्यामुळे संमेलनात आरशाप्रमाणे समाजमनाचे प्रतिबिंब लेखकांच्या माध्यमातून पडत असते. संमेलन ही लेखक, प्रकाशकांची वाचकांशी होणारी थेट भेट असते. संमेलनातून समाजाची वाचनसंस्कृती प्रकट होते. वाचन माणसाची जडणघडण करते, माणूस घडवण्याचे कार्य करते. त्यामुळे संमेलनाच्या निमित्ताने होणारी या सर्वांची भेट अगत्याची ठरते. संमेलनात जिल्ह्याचे प्रतिनिधित्व दिसेल : श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले स्वागताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनीही सातारचे साहित्य संमेलन वेगळेपण जपणारे ठरेल, अशी ग्वाही उपस्थितांना दिली. संमेलनाच्या वातावरणनिर्मितीचे उपक्रम आता सुरू होत आहेत. संमेलन सातारा शहरापुरते नसून, संपूर्ण सातारा जिल्ह्याचे प्रतिनिधित्व संमेलनात दिसेल. सातारकरांच्या सहकार्याने आम्ही संमेलन सुंदर पद्धतीने आणि उत्तम नियोजनाने यशस्वी करू, असे ते म्हणाले. संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने बळ देणारी : प्रा. मिलिंद जोशी प्रा. मिलिंद जोशी यांनी सातारच्या संमेलनाच्या निमित्ताने चांगले, अनुकरणीय पायंडे पडल्याचा उल्लेख केला. संमेलन साहित्य, लेखक, प्रकाशक, वाचककेंद्री ठरेल कारण संमेलनाच्या केंद्रस्थानी साहित्यिक, प्रकाशक आणि वाचक असतील. साहित्य संमेलन ही साहित्यिक – सांस्कृतिक तशीच राजकीय घटनाही असते. ती समाजसहभागानेच यशस्वी होते. सातारकर आयोजकांनी संमेलनाची, साहित्यिकांची स्वायत्तता टिकवून धरण्याचा आदर्श निर्माण केला आहे. संमेलने एका साच्यात अडकल्यासारखी झाली असताना, या संमेलनाच्या निमित्ताने साचा मोडून नव्या वाटांची निर्मिती साधली आहे. मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यानंतरचे हे पहिले साहित्य संमेलन महाराष्ट्राच्या ऐतिहासिक राजधानीत होत असल्याचा आनंद आणि अभिमान आहे. संमेलनाच्या निमित्ताने निर्माण झालेली स्पंदने पुढील साहित्यिक चळवळींना बळ पुरवतात, असेही जोशी म्हणाले. स्वागताध्यक्षांचा कुठलाही हस्तक्षेप नाही साचा मोडला की, नव्या वाटा निर्माण होतात, असे नमूद करून प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, साहित्य संमेलन हे स्वायत्त व्यासपीठ आहे त्याची स्वायत्तता जपली गेली पाहिजे. महामंडळाने संमेलन आयोजक संस्थेला दिले की आयोजकांचा महामंडळाशी संपर्क रहात नाही. पण सातारा येथील परिस्थिती पूर्णपणे निराळी आहे. संमेलनाचे स्वागाताध्यक्ष श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांनी संमेलनाच्या नियोजनाबाबत कुठल्याही हस्तक्षेप केलेला नाही. कविसंमेलन कुण्याच्या अध्यक्षतेखाली घ्यावे, परिसंवादात कुणाचा सहभाग असावा यासाठी कुठलाही दबाव आणलेला नाही, अशा शब्दात प्रा. मिलिंद जोशी यांनी श्रीमंत छत्रपती शिवजेंद्रराजे भोसले यांचे कौतुक केले.   शब्द, विचार, परिवर्तन आणि संवादाची पायाभरणी : सुनिताराजे पवार सुनिताराजे पवार म्हणाल्या, संमेलनातील साचलेपणा जाऊन नवे प्रयोग या संमेलनात होत आहेत, हे महत्त्वाचे आहे. परंपरा आणि परिवर्तनाच्या वाटेने हे संमेलन वेगळा वैचारिक संवाद घडवेल. संमेलनाच्या मंडपाची पायाभरणी करताना शब्द, विचार, परिवर्तन आणि संवादाचा पाया भरला गेला आहे. खंडित प्रवाह वाहता ठेवण्याचा प्रयत्न : विनोद कुलकर्णी विनोद कुलकर्णी यांनी सातारा येथे झालेल्या आधीच्या संमेलनाच्या आठवणी जागवल्या. त्यानंतर बराच खंड पडल्यानंतर हे संमेलन सातारकरांना मिळाले आहे. तो खंडित प्रवाह वाहता ठेवण्याचा प्रयत्न ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माध्यमातून एकत्रितपणे करू, असे ते म्हणाले. नंदकुमार सावंत यांनी स्वागतपर प्रास्ताविकात आयोजकांच्या वतीने संमेलनाच्या तयारीचा आढावा घेतला. संमेलन मिळणे, ते यशस्वी करणे, हे स्वप्न आम्ही सर्वांनी पाहिले होते. त्याची परिपूर्ती कष्टसाध्य आहे, पण आनंददायी आहे, असे ते म्हणाले. मान्यवरांचे स्वागत श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मसाप शाखेचे सभासद वझिर नदाफ, जनता सहकारी बँकेचे चेअरमन अमोल मोहिते यांनी केले. वैदेही कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले तर आभार मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष चंद्रकांत बेबले यांनी मानले. फोटो ओळ : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळातर्फे सातारा येथे आयोजित करण्यात आलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज (दि. १६) शाहू स्टेडिअम, सातारा येथे सरस्वती पुरस्कारप्राप्त लेखक शरणकुमार लिंबाळे यांच्या हस्ते झाला. समवेत संमेलनाचे स्वागताध्यक्ष श्री. छ. शिवेंद्रराजे भोसले, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी, कोषाध्यक्ष नंदकुमार सावंत आदी.

Uncategorized

साताऱ्यातील ९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

संमेलनाचे उद्घाटन :- भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग संमेलनाचा समारोप :- ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी प्रमुख अतिथी संमेलनातील परिसंवाद/चर्चा विषय :- जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ? मराठी कोशवाङ्‌मय आणि विस्ताराच्या दिशा आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती आजच्या मराठी साहित्यात भयकथा,रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे? अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात का दिसत नाही ? स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना समकालीन पुस्तकांवर चर्चा :- अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर चर्चा सहभाग : अमोल पालेकर, संध्या गोखले आणि वृंदा भार्गवे शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा सहभाग : शाहू पाटोळे, भूषण कोरगावकर, राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे मुलाखती :- साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत संवादक : डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांची मुलाखत संवादक : लेखक किशोर बेडकीहाळ आणि पत्रकार प्रसन्न जोशी ज्येष्ठ लेखक आणि प्रकाशक सन्मान ज्येष्ठ लेखक सन्मान : साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड ज्येष्ठ प्रकाशक सन्मान : बाबुराव मैंदर्गीकर, सुविद्या प्रकाशन, सोलापूर ‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम सहभाग : प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, कृष्णात खोत, अभिराम भडकमकर संवादक : राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर बालवाचकांशी संवाद सहभाग : साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित ल. म. कडू, संगीता बर्वे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व गणेश घुले कथाकथन निमंत्रितांची दोन कविसंमेलने सांस्कृतिक कार्यक्रम :- संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगत्गुरू संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संतसाहित्याला अभिवादन करणारा डॉ. भावार्थ देखणे आणि सहकाऱ्यांचा ‘बहुरुपी भारूड’ हा कार्यक्रम सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग महाराष्ट्राची हास्यजत्रा महाराष्ट्रातील लोकांच्या पसंतीस उतरलेले ‘फोक आख्यान’ संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये Ø संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी Ø पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग Ø ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस घेता येणार लाभ  Ø शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग Ø संमेलनाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान Ø संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रण  Ø सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण Ø साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी बालकुमार वाचककट्ट्यावर विद्यार्थ्यांचा संवाद Ø कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन Ø संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा Ø मान्यवर लेखकांच्या मुलाखती Ø चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद Ø ९९ विद्यार्थी उद्‌घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’          हे साने गुरुजींचे गीत. Ø ‘अटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य Ø साहित्यिक कार्यक्रमासह मनोरंजनाच्या कार्यक्रमात तरुणाईचा विशेष सहभाग

Uncategorized

साताऱ्यातील९९व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनात साहित्यिक कार्यक्रमांची मेजवानी

भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत मृदुला गर्ग यांच्या हस्ते उद्‌घाटन, ज्ञानपीठ पुरस्काराने  सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी समारोपाचे प्रमुख अतिथी मुलाखत, परिसंवाद, पुस्तकचर्चा, कविसंमेलन, कथाकथन, सांस्कृतिक कार्यक्रम असे भरगच्च कार्यक्रम पुणे : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या सातारा येथे होत असलेल्या ९९व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे उद्‌घाटन भारतीय पातळीवरील ज्येष्ठ लेखिका आणि विचारवंत डॉ. मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार असून समारोप सोहळ्यास ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मनित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी या वेळी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाहूपुरी शाखा आणि मावळा फाऊंडेशनतर्फे दि. १ ते ४ जानेवारी २०२६ या कालावधीत प्रसिद्ध साहित्यिक विश्वास पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुमारे ३२ वर्षांनंतर संमेलनाचे आयोजन करण्याचा मान सातारकरांना मिळाला आहे. गुरुवार, दि. १ जानेवारी रोजी दुपारी ३ वाजल्यापासून संमेलनातील कार्यक्रमांचा प्रारंभ होणार आहे.  ध्वजारोहण अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते होणार आहे. ग्रंथदिंडीसह ग्रंथ प्रदर्शन, कवीकट्टा आणि गझलकट्टा यांचेही उद्घाटन होणार आहे. सातारा जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांच्या योगदानाची दखल घेऊन त्यांच्या सन्मान समारंभाचे आयोजन करण्यात आले असून हा सन्मान संमेलनाध्यक्ष डॉ. तारा भवाळकर यांच्या हस्ते  संमेलनाच्या पूर्वसंध्येला करण्यात येणार आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या जन्मोत्सवानिमित्त आणि जगद्गुरु संत तुकोबाराय यांच्या ३७५ व्या वैकुंठगमन वर्षानिमित्त संत साहित्याला अभिवादन करण्यासाठी ‘बहुरूपी भारुड’ हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ.भावार्थ देखणे आणि त्यांचे सहकारी हा कार्यक्रम रात्री साडेआठ वाजता सादर करणार आहेत. त्यापूर्वी स्वानंद बेदरकर निरूपण करणार आहेत. शुक्रवार, दि. २ जानेवारी रोजी सकाळी १०:३० वाजता संमेलनाचे उद्‌घाटन मृदुला गर्ग यांच्या हस्ते होणार आहे. या प्रसंगी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष विश्वास पाटील, मावळत्या संमेलनाध्यक्ष डॉ.तारा भवाळकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाषामंत्री उदय सामंत, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर, सार्वजनिक बांधकाम मंत्री व स्वागताध्यक्ष शिवेंद्रराजे भोसले, खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासह अखिल भारतीय साहित्य महामंहळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांची उपस्थिती असणार आहे. मुख्य मंडपात हा कार्यक्रम होणार आहे. मंडप क्रमांक १ येथे दुपारी ३ वाजता  निमंत्रितांचे पहिले कविसंमेलन रंगणार असून रात्री ८:३० वाजता सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांची प्रमुख भूमिका असलेल्या ‘शिकायला गेलो एक’ या नाटकाचा प्रयोग आयोजित करण्यात आला आहे. मंडप क्रमांक २ येथे दुपारी ३ वाजता ‘जागतिक प्रकाशन व्यवहारात मराठी प्रकाशन व्यवहार कुठे आहे ? या विषयावर चर्चा होणार असून त्यात संजीव कुलकर्णी, क्षुभा साठे, अमृता तांदळे, राजीव श्रीखंडे, रोहन चंपानेरकर, डॉ. मनोज कामत, संदीप तापकीर यांचा सहभाग असणार आहे. त्यानंतर दुपारी ४:३० वाजता ‘मराठी कोशवाङ्‌मय आणि विस्ताराच्या दिशा’ या विषयावरील चर्चेत डॉ. राजा दीक्षित, डॉ. साहेब खंदारे, डॉ. नीलिमा गुंडी, मांगिलाल राठोड, प्रमोद पाटील, अविनाश कोल्हे सहभागी होणार आहेत. जगतानंद भटकर त्यांच्याशी संवाद साधणार आहे. शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता कथाकथन होणार असून यात राजेंद्र गहाळ, माधवी घारपुरे, बाबा परीट, रवींद्र कोकरे, कल्पना देशपांडे  सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कवयित्री अनुराधा पाटील यांची मुलाखत होणार असून डॉ. रणधीर शिंदे आणि प्रा. प्रवीण बांदेकर त्यांच्याशी संवाद साधणार आहेत. दुपारी ३ वाजता ज्येष्ठ लेखक प्रकाशक सन्मान कार्यक्रमात साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड तसेच सुविद्या प्रकाशनाचे बाबुराव मैंदर्गीकर, सोलापूर यांचा सत्कार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या वेळी विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, खासदार नितीन पाटील उपस्थित राहणार आहेत. समकालीन पुस्तकांवर दुपारी ४ वाजता चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून यात अमोल पालेकर लिखित ‘ऐवज : एक स्मृतिबंध’ या पुस्तकावर संवादात्मक कार्यक्रम होणार आहे. त्यात अमोल पालेकर यांच्यासह संध्या गोखले आण वृंदा भार्गवे सहभागी होणार आहेत. सायंकाळी ५:३० वाजता ‘आजच्या मराठी समाजाची विचारभ्रष्टता आणि वैचारिक साहित्याची निर्मिती’ या विषयावर परिसंवाद होणार असून  विनय हर्डीकर, प्रमोद काळबांडे, शाळीग्राम निकम, डॉ. संभाजी पाटील, ॲड. धनंजय वंजारी, हेरंब कुलकर्णी, यशवंत पाटणे हे मान्यवर सहभागी होणार आहेत. रात्री ९ वाजता महाराष्ट्राची हास्यजत्रा या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवार, दि. ३ जानेवारी रोजी मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘आजच्या मराठी साहित्यात भयकथा, रहस्यकथा आणि गूढकथा यांचा इतका दुष्काळ का आहे?’ या विषयावर चर्चा होणार असून यात डॉ. गणेश मतकरी, प्रवीण टोकेकर, हृषीकेश गुप्ते, डॉ. गोविंद बुरसे, डॉ. राजेंद्र राऊत यांचा सहभाग असणार आहे. दुपारी ४ वाजता ‘स्त्री चळवळीची पन्नास वर्षे : मागे वळून पाहताना’ या विषयावर आयोजित परिसंवादात डॉ. गीताली वि. म., सुचिता खल्लाळ, प्रमोद मुनघाटे, हिना कौसर खान, डॉ. सविता मोहिते, डॉ. गायत्री शिरोळे, डॉ. संध्या अणवेकर, डॉ. अंजली ढमाळ, नमिता कीर सहभागी होणार आहेत. सायंकाळी ६ वाजता ‘अभिजात दर्जानंतरची मराठी : संधी आणि आव्हाने’ या विषयावर चर्चा होणार असून यात श्रीधर लोणी, पी. विठ्ठल, डॉ. सुभाष उगले, श्याम जोशी, डॉ. संदीप श्रोत्री, डॉ. चैत्री साळुंके, डॉ. अस्मिता हवालदार यांचा सहभाग असणार आहे. रविवार, दि. ४ जानेवारी रोजी मंडप क्रमांक १ येथे सकाळी ९:३० वाजता लेखक शाहू पाटोळे लिखित ‘अन्न हे अपूर्णब्रह्म’ या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून त्यात पाटोळे यांच्यासह राहुल कोसंबी, डॉ. मिलिंद कसबे, भूषण कोरगावकर सहभागी होणार आहेत. सकाळी ११ वाजता लोकसत्ताचे संपादक आणि प्रसिद्ध लेखक गिरीश कुबेर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होणार आहे. त्यांच्याशी लेखक किशोर बेडकीहाळ आणि पत्रकार प्रसन्न जोशी संवाद साधणार आहेत. दुपारी १ वाजता दुसरे निमंत्रितांचे कविसंमेलन होणार आहे. मंडप क्रमांक २ येथे सकाळी १० वाजता ‘बदलत्या ग्रामीण वास्तवाचे चित्रण आजच्या मराठी साहित्यात दिसत का नाही?’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात भूषण कुमार उपाध्याय, चंद्रकांत दळवी, श्रीकांत पाटील, भगवान काळे, चांगदेव काळे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी १२:३० वाजता ‘संवाद लक्षवेधी कादंबरीकारांशी’ हा संवादात्मक कार्यक्रम होणार असून यात प्रा. शेषराव मोहिते, डॉ. सदानंद देशमुख, नीरजा, कृष्णात खोत, अभिराम भडकमकर हे कादंबरीकार  सहभागी होणार असून त्यांच्याशी राजेंद्र माने आणि निलेश महिगांवकर संवाद साधणार आहेत.  या संमेलनात बालकुमार वाचककट्ट्यावर साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित लेखक ल.म. कडू, संगीता बर्वे, राजीव तांबे, एकनाथ आव्हाड व गणेश घुले हे बालवाचकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी ४:३० वाजता ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाची सांगता होणार असून या प्रसंगी ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ लेखक रघुवीर चौधरी, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मराठी भाषा मंत्री उदय सामंत, पालकमंत्री शंभुराज देसाई, रोजगार हमीमंत्री भरत गोगावले, ज्येष्ठ उद्योजक फरोख कुपर यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. महाराष्ट्रातील  लोकसाहित्य आणि लोकसंस्कृतीचे दर्शन घडविणाऱ्या व लोकांच्या पसंतीस उतरलेल्या  तरुणाईच्या ‘फोक आख्यान’चे आयोजन रात्री करण्यात आले आहे. संमेलनाची ठळक वैशिष्ट्ये Ø  संमेलनाच्या पूर्वसंध्येला आकर्षक चित्ररथांसह ग्रंथदिंडी Ø  पुस्तक दालनातूनच संमेलनस्थळी जाणारा मार्ग Ø  ग्रंथ प्रदर्शनाचा वाचकांना ४ दिवस घेता येणार लाभ Ø  शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा लक्षणीय सहभाग Ø  संमेलनच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा विशेष सन्मान Ø  संमेलनाचे पूर्वाध्यक्ष व महामंडळाचे माजी अध्यक्ष यांना निमंत्रण Ø  सरस्वती सन्मानप्राप्त साहित्यिकांनाही निमंत्रण Ø  साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त बालसाहित्यकारांशी बालकुमार वाचककट्ट्यावर विद्यार्थ्यांचा संवाद Ø  कवी आणि गझलकारांसाठी कविकट्टा आणि गझलकट्ट्याचे आयोजन Ø  संमेलनात प्रथमच समकालीन पुस्तकांवर चर्चा Ø  मान्यवर लेखकांच्या मुलाखती Ø  चाकोरीबाहेरील विषयांवर परिसंवाद Ø  ९९ विद्यार्थी उद्‌घाटन सोहळ्यात एका सुरात गाणार ‘खरा तो एकचि धर्म, जगाला प्रेम अर्पावे’       हे साने गुरुजींचे गीत. Øअटकेपार’ या स्मरणिकेतून उलगडणार सातारा जिल्ह्यातील वैविध्य

Uncategorized

९९ व्या साहित्य संमेलनाच्या कार्यालयाचे डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते शनिवारी उद्घाटन

  सातारा – मसाप, पुणे शाहुपुरी शाखा, मावळा फौंडेशन आयोजित अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे ९९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साता-यात दि.१ जानेवारी ते ४ जानेवारी २०२६ दरम्यान होणार आहे. या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन शनिवार, दि. १८ ऑक्टोबर रोजी विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सायंकाळी ६ वाजता जनता बँकेच्या मुख्य कार्यालयातील तळमजल्यावर होणार असल्याची माहिती संमेलनाचे कार्याध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी प्रसिध्दीपत्रकाव्दारे दिली.    साता-यात तब्बल ३२ वर्षानंतर अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होणार आहे. हे संमेलन वैशिष्टयपूर्ण आणि साता-याच्या लौकिकाला साजेसे व्हावे यासाठी स्वागताध्यक्ष  शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संमेलनाच्या तयारीला वेग आला आहे. या संमेलनासाठी मार्गदर्शन समिती, स्मरणिका संपादन समिती, ग्रंथदिंडी, शोभायात्रा समिती, साहित्यिक व ऐतिहासिक दालन समिती, कवी कट्टा आणि गझल कट्टा समिती जाहीर करण्यात आली. त्याचप्रमाणे संमेलनाच्या बोधचिन्हाचेही अनावरण काही दिवसांपूर्वी पुणे येथे आणि लोकार्पण सातारा येथे विविध मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. संमेलनानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. त्याला साहित्यप्रेमींचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. आता या संमेलनाच्या कार्यालयाचे उद्घाटन धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर म्हणजे शनिवारी प्रसिध्द लेखक, कवी, गीतकार, संगीतकार डॉ. आशुतोष जावडेकर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. संमेलनाच्या इतिहासात प्रथमच  तरुण आणि लोकप्रिय लेखकाला कार्यालयाचे उद्घाटन करण्याचा मान देण्यात आला आहे.  अध्यक्षस्थान संमेलनाचे स्वागताध्यक्ष सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले भूषवणार आहेत. खा. उदयनराजे भोसले यांची विशेष उपस्थिती  या कार्यक्रमाला लाभणार असून  प्रमुख पाहुणे म्हणून रोजगार हमी, फलोत्पादन आणि खार जमीन विकासमंत्री भरत गोगावले उपस्थित राहणार आहेत. संमेलनाचे कार्यालय सातारकरांची अर्थवाहिनी असलेल्या जनता सहकारी बँकेच्या मुख्य कार्यालयाच्या इमारतीतील  तळमजल्यावर करण्यात आले आहे.   चौकट   संमेलनाचे कार्यालय आकर्षक   संमेलनाचे कार्यालय प्रशस्त असून  आकर्षक विद्युत रोषणाई, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, सातारा शहराचे संस्थापक आणि स्वराज्य विस्तारक छत्रपती शाहू महाराज यांच्या प्रतिमा सातारा शहराच्या राजधानीपणावर प्रकाशझोत टाकणाऱ्या आहेत. युगप्रवर्तक कवी बा.सी.मर्ढेकर, कवी गिरीश, शांता शेळके, कुसुमाग्रज यांच्यासह अनेक साहित्यिकांच्या प्रतिमांनी कार्यालयाची साहित्यिक ओळख अधिक गडद केली आहे. आकर्षक बोधचिन्हही लक्ष वेधून घेत आहे. छायाचित्रातून कार्यालयाचे रुप सुंदर दिसत आहे. उत्तम अशा या कार्यालयाची निर्मिती केल्याबद्दल संयोजकांचे अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी अभिनंदन केले आहे.

Uncategorized

परप्रांतियांचा मुंबईत मराठी भाषेला विरोध अयोग्यच

विश्वास पाटील‌‘पुस्तकाचे एकच गाव आणि सगळीकडे जाहिरात‌’ ही भूमिका चुकीची : विश्वास पाटीलतालुक्यांच्या ठिकाणी वाचनालये, माय मराठीची भवने उभारावीत : विश्वास पाटीलनियोजित संमेलनाध्यक्ष विश्वास पाटील यांचा मसाप, साहित्य महामंडळातर्फे जाहीर सत्कार पुणे : मराठी माणूस नोकरीनिमित्त परप्रांतात गेल्यानंतर तेथील स्थानिक भाषा शिकण्यास प्राधान्य देतो, परंतु मुंबईत राहून अमराठी माणूस मराठी शिकणार नाही असा दुराग्रह बाळगतो, मराठी भाषेला मुबंईमध्ये अनेक वर्षे विरोधच होत आहे हे अयोग्य आहे, अशी टीका सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष पानिपतकार विश्वास पाटील यांनी केली. पुस्तकाचे एकच गाव आणि सगळीकडे जाहिरात अशा उपरोधिक स्वरात भाष्य करून प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुस्तकाचे गाव, वाचनालये निर्माण व्हावीत, माय मराठीची भवने बांधावीत असे आग्रही मतही त्यांनी व्यक्त केले.महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे आणि अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ या संस्थांतर्फे सातारा येथे होणाऱ्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांचा बुधवारी (दि. 16) जाहीर सत्कार करण्यात आला. त्या वेळी सत्काराला उत्तर देताना पाटील बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. शाल, हार आणि सातारी कंदी पेढा भरवून सत्कार करण्यात आला. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने प्रा. मिलिंद जोशी यांनी पाटील यांचा सत्कार केला.लेखक हा टीपकागदासारखा असावा लागतो. लेखकाला, कवीला जात नसते तर त्याला धर्म असतो. त्याचा संबंध अश्रूंशी असतो. लेखकाने टीकेची पर्वा न करता स्वत:च्या मनाला वाटेल-पटेल ते लिहावे. पडलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधणे हे लेखकाचे काम आहे, असे नमदू करून विश्वास पाटील पुढे म्हणाले, मराठी वाचक अत्यंत जागरूक आहे. एका केसाएवढी चूकही त्याचा नजरेतून सुटत नाही. धोका पत्करल्याशिवाय आणि घरात बसून लेखन होऊ शकत नाही.साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी एकमताने निवड झाल्याचा आनंद व्यक्त करून विश्वास पाटील म्हणाले, साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी मी कधीच व्याकुळ नव्हतो. 2009साली मला अध्यक्षपदाची संधी चालून आली होती, मात्र मी ‌‘माझे वय लिहायचे आहे‌’ असे सांगून ती नाकारली.आपण सध्या एका मन्वंतरातून चाललो आहोत. आज आपले देव, आपली भाषा सुरक्षित नाही. त्यावर संकट आलेले आहे. आजची युवा पिढी मोबाईलच्या गर्तेत अडकलेली आहे. अशा युवा पिढीला साहित्याच्या प्रांगणात आणण्याचा प्रयत्न संमेलनाच्या माध्यमातून करण्याचा मानस आहे. साहित्याशी आणि नोकरीशी मी प्रामाणिक आहे. माझ्यावर झालेले वाङ्मय चौर्याचे आरोप अतिशय दु:खद आहेत. मोघम बोलून चुकीच्या वावड्या उठविणे योग्य नाही. मला मायमराठी वाचकांची साथ लाभलेली असून माझ्या साहित्यकृतींमधील शब्दांची आणि सत्याची धार याला वाचकांनी न्याय दिला आहे. न्यायदेवता माझ्या शब्दांकडे लक्ष ठेवून असल्यामुळे पुढील काळातही मला उत्तम लेखन करावेच लागेल.अध्यक्षपदावरून बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य संमेलन हा एक आनंदोत्सव असावा. साहित्य संमेलनाच्या माध्यमातून युवा पिढीला तुम्हीही लिहू शकता असा विश्वास देणे आवश्यक आहे. लिहिणे ही कुणा एका जाती-धर्म-लिंगाची मक्तेदारी नाही. साहित्यकृती हा नुसता समाज किंवा निसर्गाशी संवाद नसतो तर तो स्वत:शीच संवाद असतो त्यातून प्रश्न निर्माण होतात आणि ते सोडविण्यासाठी साहित्यकृतींची निर्मिती होते. डॉ. श्रीपाल सबनीस म्हणाले, विश्वास पाटील हे असत्याची पेरणी होणाऱ्या काळातील सत्याची पेरणी करणारे साहित्यिक आहेत. आपल्या साहित्य निर्मितीसाठी त्यांनी देशाचाच नव्हे तर जगाचा नकाशा धुंडाळला आहे. ते अभिजन आणि बहुजनांचेही लेखक आहेत. ते पुढे म्हणाले, राजकारणी नव्हे तर साहित्य संमेलनाध्यक्ष हाच खरा समाजाचा नायक असतो. विश्वास पाटील हे साहित्य संमेलनाचेच नव्हे तर सांस्कृतिक संमेलनाचे देखील अध्यक्ष आहेत.प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, विश्वास पाटील यांची लेखणी इतिहास आणि वर्तमानालाही स्पर्श करणारी आहे. त्यांच्याकडे अव्वल दर्जाची प्रतिभा आहे. ते उथळ पाण्यात रमणारे नाहीत तर अथांग सागराची ओढ असणारे प्रतिभावान साहित्यिक आहेत. राजहंस प्रकाशनाचे डॉ. सदानंद बोरसे म्हणाले, विश्वास पाटील फक्त शब्दातून कारागिरी करणारे साहित्यिक नसून पुस्तके, कादंबऱ्यांमधील परिसर, पात्रे, माणसे यांच्याशी नाळ जुळलेला लेखक आहेत.सुनिताराजे पवार यांनी विश्वास पाटील यांचा परिचय करून दिला तर सूत्रसंचालन महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यवाह अंजली कुलकर्णी यांनी केले. आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.फोटो ओळ : महाराष्ट्र साहित्य परिषद आणि अखिल भारतीय साहित्य महामंडळ आयोजित सत्कार समारंभात (डावीकडून) विनोद कुलकर्णी, प्रा. मिलिंद जोशी, विश्वास पाटील, डॉ. रावसाहेब कसबे, डॉ. श्रीपाल सबनीस, सुनिताराजे पवार

Uncategorized

साहित्य परिषदेत योगिनी जोगळेकर जयंतीनिमित्त कवयित्रींचे संमेलन संपन्न

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेत ज्येष्ठ लेखिका योगिनी जोगळेकर यांच्या जयंतीनिमित्त कवयित्रींच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. ज्येष्ठ कवयित्री डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कवयित्री संमेलनात अंजली कुलकर्णी, ज्योत्स्ना चांदगुडे, वैशाली मोहिते, चिन्मय चिटणीस, निरुपमा महाजन, वर्षा कुलकर्णी, अनुराधा काळे, प्राजक्ता वेदपाठक, नूतन शेटे वैजयंती आपटे, जयश्री श्रोत्रीय, प्रतिभा पवार, ऋचा कर्वे, सविता कुरुंदवाड, वासंती वैद्य या कवयित्री सहभागी झाल्या होत्या.  सुनीताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. ज्योत्स्ना चांदगुडे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Uncategorized

डॉ. रमेश वरखेडे यांना डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा डॉ. गं. ना जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांना जाहीर झाला आहे. दहा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते मराठी भाषेसाठी दिलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार वरखेडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. हा कार्यक्रम गुरुवार १४ ऑगस्ट  रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Uncategorized

भाषेतून समाज वाचता आला पाहिजे : डॉ. रमेश वरखेडे

साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार डॉ. रमेश वरखेडे यांना प्रदान     पुणे : केवळ व्याकरणाचा आग्रह धरून चालणार नाही. भाषेतून समाज वाचता आला पाहिजे असे मत ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ भाषा अभ्यासक, लेखक व समीक्षक डॉ. रमेश वरखेडे यांना महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. दहा हजार रुपये रोख आणि स्मृतिचिन्ह असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह अंजली कुलकर्णी, पराग जोगळेकर, उज्ज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते. डॉ. मोरे म्हणाले, अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ. जोगळेकर यांनी अभ्यासाबरोबरच संस्थात्मक काम मनोभावे केले आणि तेच काम डॉ. वरखेडे करत आहेत. प्रा. जोशी म्हणाले, एक काळ असा होता की प्राध्यापकांच्या नवे शिक्षण संस्था आणि विद्यापीठे ओळखली जात होती. आज ते वैभव उरले नाही. समाजात भौतिक समृद्धी येत असताना वाढणारे वैचारिक दारिद्र्य हा चिंतेचा विषय आहे. डॉ. जोगळेकर यांनी संस्थात्मक कार्याचा आदर्श वस्तुपाठ निर्माण केला. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. फोटो ओळ : डॉ. उज्ज्वला जोगळेकर, पराग जोगळेकर, प्रा. मिलिंद जोशी, डॉ. रमेश वरखेडे, डॉ. सदानंद मोरे, सुनिताराजे पवार, अंजली कुलकर्णी

Uncategorized

कृती समिती मराठी भाषा

कृती समिती मराठी भाषा विरोधी, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे टीकास्त्र  पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेवर टीका करणाऱ्या कृती समितीत पहिलीपासून हिंदी सक्तीची करावी याचे समर्थन करणारे मराठी विरोधी लोक आहेत. साहित्य परिषदेने हिंदीच्या सक्तीला ठाम विरोध केलेला आहे. सरकारने दोन्ही शासन निर्णय मागे घेतल्याने तिथे त्यांचा भ्रमनिरास झाला या धक्क्यातून सावरण्याआधीच  इकडेही धर्मादाय उपायुक्त यांचा महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विलंब माफी अर्जाबाबतचा आदेश त्यांच्या विरोधात गेला त्यामुळे आगपाखड करणे हे तंत्र आत्मसात केलेल्या लोकांकडून काय अपेक्षा ठेवायच्या ? विलंब माफीचा अर्ज मंजूर झाला ,निकाल मान्य नसेल तर त्याला आव्हान द्या असे महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे.  पवार म्हणाल्या, न्यायप्रविष्ट प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागावा यासाठी सरकारचा हस्तक्षेप वापरून न्यायाधीशांची चौकशी लावण्यापर्यंत या कृती समितीची मजल गेली आहे. तरीही न्यायालय महाराष्ट्र साहित्य परिषदेचा विलंब माफ़ी अर्ज मंजूर करते, न्यायालयाला चौकशीची भीती दाखवूनही काही घड़त नाही. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या हिंदी विरोधी मोर्चात सहभागी होण्याच्या निर्णयामुळे यांना पोटशूळ उठला आहे. हिंदीला मोठे करायचे असेल तर मराठी भाषक संस्था निष्ठेने चालवणारे कार्यकर्ते आधी संपवले पाहिजेत या भूमिकेतून स्थापन झालेली आणि नोंदणीकृत नसलेली कृती समिती काम करत आहे. हे परिषदेचे आजीव सभासद नसणारे दोन तीन लोक आहेत. संस्थेवर प्रशासक आणून हुकुमशाही पद्धतीने यांना हिंदीचा कार्यक्रम हवा तसा राबवायचा आहे. त्यांचा बोलवता धनी वेगळाच आहे. साहित्य परिषदेच्या विरोधात तक्रार करणारे विजय शेंडगे न्यायालयाने दिलेल्या पाच सहा तारखांना उपस्थित नाहीत. धनंजय कुलकर्णी, शशांक महाजन याच लोकांना पुढे करून न्यायाच्या व न्यायालयाच्या कामकाजात हस्तक्षेप व अडथळा आणून कार्यालयीन प्रक्रियेचा अवमान करत आहेत.धनंजय कुलकर्णी हे खरे तर बदल अर्जाचे पक्षकार देखील नाहीत त्यामुळे न्यायालयात प्रत्यक्ष चालणाऱ्या कामकाजाची त्यांना काहीही माहिती नाही असे असताना ऐकीव किंवा अर्धवट माहितीच्या आधारे खोटे बोल पण रेटून बोल  या हेतूने ते खोट्या बातम्या प्रसारित करत आहेत.ऐनकेन प्रकारानेन्यायालय व न्यायावर दबाव आणणे हा एकमेव हेतू समोर ठेवून काम करत असल्याचे स्पष्ट दिसते आहेच तसेच प्रसार माध्यमात  कार्यकारी मंडळावर खोटे नाटेआरोप करत आहेत.परिषदेची बदनामी करणे हाच या मराठी विरोधी लोकांचा हेतू आहे.एवढी आघाडी उघडूनही त्यांना साहित्य विश्वाकडून अजिबात प्रतिसाद नाही त्यामुळे त्यांना आलेल्या नैराश्यातून ते असे प्रकार करत आहेत.न्यायालय आदेश देईल तेव्हा निवडणुका घेण्याची कार्यकारी मंडळाची  तयारी आहे. कार्यकारी मंडळ निवडणुकांना घाबरत नाही. प्रशासक आणा असे बोलणार्यांचे हेतू शुद्ध नाहीत. त्यांना संस्था ताब्यात घ्यायची आहे. घटनाबाह्य विरोधी समितीचा छुपा हेतू योग्यवेळी जाहीर करू, त्यावेळी खुलाशाने समाज हादरून जाईल.  परिषदेचे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. त्यामुळे न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करुननिवडणुकीविषयी भाष्य करत नाही. मात्र ज्यावेळी निवडणुका लागतील त्यावेळी अशा हिंदीधार्जिण्या सभासद नसलेल्या लोकांच्या पाठिंब्याचे पॅनेल पराभूत करू. कोणत्याही परिस्थितीत आणि कितीही दबाव आला तरी हिंदीचा आग्रह धरणाऱ्यापुढे झुकणार नाही.

Scroll to Top