Author name: admin

Uncategorized

डॉ. जयंत नारळीकरांनी त्यांच्या साहित्यातून विज्ञाननिष्ठा रुजवली

महाराष्ट्र साहित्य परिषदेत साहित्यिकांची आदरांजली पुणे : डॉ. जयंत नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलनाच्या चळवळीला बळ दिले. विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. डॉ नारळीकर यांना अचूकतेचा ध्यास होता. त्यांनी कायम आपले साधेपण जपले. शास्त्रज्ञ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची निर्मिती केल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लाभले. त्यांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील एक लखलखते नक्षत्र निमाले आहे. अशा भावना व्यक्त करत मान्यवरांनी जेष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना आदरांजली वाहिली महाराष्ट्र साहित्य परिषद, मराठी विज्ञान परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या वतीने महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात श्रद्धांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे, मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष राजेंद्र सराफ उपस्थित होते. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, विश्वकोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष प्रा. राजा दीक्षित, ज्येष्ठ लेखक राजीव तांबे, ज्येष्ठ संपादक प्रशांत दीक्षित, ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञान तज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, लेखिका चित्रलेखा पुरंदरे, पत्रकार शैलेंद्र परांजपे, गोपिका चितळे-किंजवडेकर, लेखक शाम भुर्के, प्रकाशक स्नेहसुधा कुलकर्णी यांनी डॉ नारळीकर यांच्या आठवणींना उजाळा दिला. प्रा जोशी म्हणाले, शास्त्रज्ञ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याची निर्मिती केल्यामुळे त्याला वेगळे परिमाण लाभले. कल्पना आणि वास्तव यांच्या मिश्रणातून विज्ञान कथा आणि कादंबऱ्यांची निर्मिती करताना त्यात विज्ञानाची माहिती आणि वैज्ञानिक दृष्टिकोन हे दोन्ही हेतू साध्य होतील असा त्यांचा प्रयत्न असायचा. अतिशय साध्या सोप्या शब्दांमध्ये एखादी वैज्ञानिक संकल्पना समजावून सांगणे, वाचकांच्या कल्पनाशक्तीला झोके देत देत त्यांना विज्ञानाच्या अंतरंगात घेऊन जाणे, शक्यतांच्या खेळात वाचकांना गुंतवून ठेवणे आणि वैज्ञानिक सत्य त्यांच्यासमोर मांडणे ही त्यांच्या लेखनाची खासियत होती. त्यांनी केलेल्या साहित्य निर्मितीमुळे मराठीतील विज्ञान कथांचा आणि कादंबऱ्यांचा प्रवाह अधिक समृद्ध झाला. सध्याच्या  कोसळणीच्या काळात अशा उत्तुंग माणसाचे आपल्यात नसणे अधिक दुःखदायक आहे त्यांच्या निधनाने साहित्याच्या नभांगणातील एक लखलखते नक्षत्र निमाले आहे. भारत सासणे म्हणाले, मराठीत सातत्याने विज्ञान साहित्य निर्माण होतच होते. डॉ नारळीकर यांनी विज्ञान साहित्याला नवी दिशा दिली. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे श्रीपाल ललवाणी म्हणाले, डॉ नारळीकर यांनी अंधश्रद्धा निर्मूलन चळवळीला बळ दिले. त्यांचा पाठिंबा असल्याने चळवळ फल ज्योतिषाला आव्हान देऊ शकली. प्रा. राजा दीक्षित म्हणाले, विज्ञान साहित्य चळवळीला त्यांनी प्रवाहित केले. ते प्रयोगशाळेइतकेच विज्ञानाच्या लोकअंगणात रमले. दीपक शिकारपूर म्हणाले, जागतिक कीर्तीचे खगोल शास्त्रज्ञ असूनही त्यांनी कायम साधेपणा आणि मूल्यनिष्ठा जपली. प्रशांत दीक्षित म्हणाले, डॉ नारळीकर यांना अचूकतेचा ध्यास होता. राजहंस प्रकाशनाच्या अनेक प्रकल्पांचे ते मार्गदर्शक होते. राजीव तांबे म्हणाले, डॉ नारळीकर यांच्या नावाने अध्यासन सुरु करावे.

Uncategorized

इंदिरा संतांच्या कवितेत मध्यमवर्गीय स्त्रीचा अंतःस्वर : डॉ नीलिमा गुंडी

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत प्रतिपादन पुणे : कवयित्री इंदिरा संत यांची कविता स्वातंत्र्योत्तर  सुशिक्षित, स्वावलंबी अशा नवीन स्त्री प्रतिमेचे दर्शन घडवीत होती. कवितेतून त्यांनी एका  सांस्कृतिक  अवकाशाची कलात्मक निर्मिती केली. त्यांची कविता केवळ खासगी सुखदुःख व्यक्त करणारी नव्हती. त्यातून तत्कालीन मध्यमवर्गीय स्त्रीचा अंतःस्वर प्रकट झाला. असे मत साहित्याच्या अभ्यासक आणि ज्येष्ठ कवयित्री डॉ नीलिमा गुंडी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित राजेंद्र बनहट्टी व्याख्यानमालेत त्या बोलत होत्या. ‘कवयित्री इंदिरा संत आणि त्यांच्या वारसदार’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिता राजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यावेळी उपस्थित होते. डॉ गुंडी म्हणाल्या, स्त्रीकेंद्री कविता आणि स्त्रीवादी कविता हे दोन प्रवाह वेगळे असले, तरी त्यामागे स्त्रीमनाचा  थांग लावण्याची असलेली धडपड ही एकाच कोंबातून निघाली आहे. अशी कविता जाणून घेण्यासाठी वाचकाचीही भाषेवर पकड असावी लागते. कारण चांगली कविता ही रसज्ञतेची  परीक्षा घेणारी असते. इंदिरा संतांच्या काव्यक्षेत्रातील सांस्कृतिक वारसदार म्हणून आजच्या अनेक कवयित्रींचा उल्लेख करता येईल. स्त्रीत्वाचा शोध, अभिव्यक्त होण्याची उत्कट ओढ, संश्लिष्ट प्रतिमा, समकालीन स्त्रीवर्गाशी सहसंवेदन आणि आत्मभान ही त्यांच्या कवितेची घटकद्रव्ये प्रभा गणोरकर, उषा मेहता, रजनी परुळेकर, अरुणा ढेरे, अनुराधा पाटील, मलिका अमरशेख, अश्विनी धोंगडे, कविता महाजन, नीरजा, प्रज्ञा पवार आदी अनेक कवयित्रींमध्ये दिसून येतात. अध्यक्षीय समारोप करताना प्रा जोशी म्हणाले, विशुद्ध भावकविता लिहिणाऱ्या कवयित्री हीच इंदिरा संत यांची खरी ओळख आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर सुरू झालेल्या आधुनिक मराठी कवितेच्या युगाचे प्रणेते मर्ढेकर यांनी मागची वाट पुसून नवीन वाट तयार केली. इंदिरा संतांनी ही वाट पूर्णतः स्वीकारली नसली तरी मर्ढेकरांच्या नवकाव्याचे, प्रतिमांचे संस्कार त्यांच्या कवितेवर होत गेले. समकालीन कवयित्री पद्मा गोळे, संजीवनी मराठे, सरिता पत्की यांच्यापेक्षा इंदिराबाईंची कविता निराळी आहे. शुद्ध कलानिर्मिती हे विशुद्ध भावककवितेचे कार्य इंदिराबाईंच्या प्रेम कवितेने केले आहे. त्यांची कविता समाजविन्मुख असली तरी तिने आपल्या पद्धतीने स्वतःची वाट शोधली. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.

Uncategorized

कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे : भानू काळे

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा लेखक वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार मंगला गोडबोले यांना प्रदान पुणे : असहिष्णू वातावरणात विनोद फुलत नाही, कसदार विनोद निर्मितीसाठी सहिष्णू वातावरण गरजेचे आहे असे मत ज्येष्ठ लेखक आणि संपादक भानू काळे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने रमेश बोकील यांनी दिलेल्या देणगीतून लेखक वि. वि. बोकील स्मृती पुरस्कार विनोदी लेखनासाठी मंगला गोडबोले यांना प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि रमेश बोकील यावेळी उपस्थित होते. काळे म्हणाले, आजचा समाज अकारण अतिसंवेदनशील झाला आहे. खिलाडू वृत्ती कमी होत चालली आहे हे वातावरण विनोदासाठी पोषक नाही. गोडबोले म्हणाल्या, सांस्कृतिक दबावामुळे स्त्रियांनी विनोदाची वाट चोखाळली नाही. विनोदी लेखन करण्यासाठी लेखकाला गंभीरपणे अभ्यास करावा लागतो. विनोदी लेखन जगण्याला समर्थपणे सामावून घेते. गंभीर विषय विनोदातून मांडला की तो सर्वांपर्यंत सहजतेने पोहोचतो. प्रा. जोशी म्हणाले, विनोद बुद्धि क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांकृतिक अधोगतीचे लक्षण आहे. चांगला विनोद निर्माण झाला तरी तो पचवण्याची समाजाची शक्ती कमी होत चालली आहे. ह्या जगातले दु:ख नाहीसे करता येत नाही पण ते हलके करण्याची ताकद विनोदात आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. रमेश बोकील यांनी पुरस्कारामागील भूमिका विशद केली. कार्यवाह मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.  

Uncategorized

श्रद्धांजली सभा

पुणे : ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ आणि अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष डॉ. जयंत नारळीकर यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी महाराष्ट्र साहित्य परिषद,  मराठी विज्ञान परिषद आणि अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सभेचे आयोजन करण्यात आले आहे. बुधवार  दिनांक ४ जून २०२५  सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात ही सभा होणार आहे. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.  

Uncategorized

महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते : लक्ष्मण गायकवाड

मसापच्या १२०व्या वर्धापन दिनानिमित्त विविध पुरस्कारांचे वितरण पुणे : राजशिष्टाचारात प्रस्थापित झालेले राजकारणी आपआपल्या जातीधर्मापुढे जाऊ इच्छित नाहीत ही शोकांतिका आहे. भटक्या विमुक्त समाजाची स्थिती आजही सुधारलेली नाही. आमचे आजचे जीवन भयानकच आहे. संविधानात बदल न झाल्यामुळे आमची साहित्यिक कार्यकर्ता म्हणून देखील शोकांतिका झालेली आहे. राजकारण्यांनी भटक्या विमुक्त समाजाला जाणीवपूर्वक प्रस्थापित होऊ दिले नाही. त्यामुळे आजही आमचा समाज संविधानाबाहेरच ठेवलेला आहे. अशा स्थितीत महाराष्ट्राला पुरोगामी राज्य म्हणायची लाज वाटते, असे उद्विग्न उद्गार प्रसिद्ध लेखक, ‌‘उचल्या‌’कार लक्ष्मण गायकवाड यांनी आज काढले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या 120व्या वर्धापन दिनानिमित्त आज (दि. 27) लेखक सन्मान आणि शाखा व कार्यकर्ता पुरस्कार वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता. गायकवाड यांचा ज्येष्ठ भाषा अभ्यासक व लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या जीवन गौरव पुरस्काने सन्मान करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कारांचे वितरण मसापचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या डॉ. गीताली वि. मं. यांना, राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट मसाप शाखा फिरता करंडक मसाप शाखा चोपडा (जि. जळगाव), राजन लाखे पुरस्कृत डॉ. बाबुराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसाप शाखा पलूस (जि. सांगली), तसेच रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा मसाप कार्यकर्ता पुरस्कार अहिल्यानगर येथील जयंत येलुलकर आणि तळेगाव दाभाडे येथील श्रीकृष्ण पुरंदरे यांना, म. श्री. दीक्षित स्मरणार्थ मसाप स्नेहबंध पुरस्कार लेखिका डॉ. मंदा खांडगे यांना प्रदान करण्यात आला. मसाप विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, उपाध्यक्ष विद्याधर अनास्कर, उपाध्यक्ष राजीव बर्वे, मसापचे कार्याध्यक्ष, प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मंचावर होते. सुरेश देशपांडे संपादित साहित्य पत्रिकेच्या वर्धापन दिन विशेषांकाचे प्रकाशन या प्रसंगी मान्यवरांच्या हस्ते झाले. आजच्या सामाजिक स्थितीत जाती-पातीचे राजकारण वाढवत आमचा प्रवास सामाजिक एकात्मतेकडे न जाता उलट्या दिशेने सुरू आहे, याविषयी खंत व्यक्त करून लक्ष्मण गायकवाड म्हणाले, जाती, पाती, धर्म कालबाह्य होऊन समाज आज ना उद्या बदलेल या आशेवर आम्ही जगत आहोत. आज देशाला बुद्धाच्या विचारांची गरज आहे. भेदभाव, धर्म, पंथ नाहीसे होऊन नवनिर्मितीच्या प्रतिक्षेत आम्ही आहोत. आमचे साहित्य करमणुकीसाठी नव्हे तर तुम्हाला आजच्या सामाजिक परिस्थितीचे भान देण्यासाठी निर्माण करत आहोत. ‌‘नाही रे‌’ असलो तरी ‌‘आहे रे‌’ला आमच्या यातना समजाव्यात आणि परिघाबाहेर ठेवलेल्या आम्हाला परिघाच्या आत घ्यावे, यासाठी साहित्याची निर्मिती करीत आहोत. गीताली वि. मं. म्हणाल्या, विद्रोहातून विद्वेषनिर्मिती होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने कार्यरत आहोत. सत्ता माणसाला भ्रष्ट करते आणि त्यातून चांगला माणूस तयार होत नाही. हा चांगला माणूस घडविण्यासाठी स्त्रीवादाचे महत्त्व आहे. आमची स्त्रीवादाची चळवळ पुरुषप्रधान विरोधी नाही तर पितृसत्ताक पुरुषप्रधान व्यवस्थेविरुद्ध आहे. स्वातंत्र्य, समता, मैत्रभाव आणि सामाजिक न्याय या चार तत्त्वांवर पुरुषपणाच्या संकल्पनेतून बाहेर पडत परिवर्तन घडले पाहिजे. स्त्री साहित्यिकांचे साहित्य समाजापर्यंत आणण्यासाठी संशोधनाच्या माध्यमातून केलेल्या कार्याची दखल घेऊन मिळालेल्या पुरस्काराबद्दल समाधानी आहे असे डॉ. मंदा खांडगे यांनी सांगितले. जयंत येलुलकर, श्रीकृष्ण पुरंदरे यांनी मनोगत व्यक्त केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना डॉ. रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्य परिषद ही समाजजीवनात झिरपलेली चळवळ आहे. समाजात स्थैर्याशिवाय संस्कृती निर्माण होत नाही. भटके विमुक्त आणि स्त्रिया यांच्याविषयी कार्य करणाऱ्या साहित्यिकांना गौरविण्यात आले, ही समाधानाची बाब असून साहित्य परिषदेचे कार्य तळागाळापर्यंत पोहोचत असल्याबद्दल आनंदी आहे. स्वागतपर प्रास्ताविकात प्रा. मिलिंद जोशी यांनी परिषदेच्या कार्याचा आढावा घेतला. पुरस्कार आणि पुरस्कारप्राप्त मान्यवरांची माहिती सुनिताराजे पवार यांनी करून दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले तर आभार विनोद कुलकर्णी यांनी मानले.

Uncategorized

‘मसाप’ च्या विशेष पुरस्काराचे २७ फेब्रुवारी रोजी वितरण  

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने मराठी भाषा गौरव दिनानिमित्त देण्यात येणाऱ्या विशेष पुरस्कारांचे वितरण २७ फेब्रुवारी २०२५ रोजी करण्यात येणार आहे. २०२४ सालातील ऐतिहासिक पुस्तकासाठी दिला जाणारा द. वा. पोतदार पुरस्कार विजय आपटे लिखित ‘हिंदुत्व, मार्क्सवाद आणि भारत’ या पुस्तकाला, समीक्षेसाठी दिला जाणारा रा. श्री. जोग पुरस्कार डॉ. मीनाक्षी पाटील लिखित ‘उत्तर आधुनिकता आणि मराठी कविता’ या पुस्तकाला, चिं. वि. जोशी पुरस्कार सारिका कुलकर्णी लिखित ‘बे दुणे पाच’ या लेखसंग्रहाला, विद्याधर पुंडलिक पुरस्कार मृणालिनी चितळे लिखित ‘निलू निरंजना’ या पुस्तकाला, सामाजिक, सांस्कृतिक आणि वैचारिक लेखनासाठीचा शं.ना.जोशी पुरस्कार अर्चना जगदीश यांच्या ‘देवराई’, या पुस्तकाला,  ललित लेखनासाठीचा निर्मला मोने पुरस्कार डॉ. मेधा कुमठेकर लिखित ‘मनातलं कागदावर’ या पुस्तकाला, नवोदित कवीच्या पहिल्या कविता संग्रहाला दिला जाणारा सुहासिनी इर्लेकर पुरस्कार संकेत म्हात्रे लिखित ‘तिथे भेटू या मित्रा’ या काव्यसंग्रहाला तर कवी यशवंत पुरस्कार राजेंद्र शहा लिखित ‘एकांतस्वर’ या कवितासंग्रहाला देण्यात येणार आहे. तसेच या वर्षीपासून सुरु झालेला कुंदा देशपांडे पुरस्कार वऱ्हाडी भाषेत लेखन करणाऱ्या लेखकास दिला जाणार आहे हा पुरस्कार या वर्षी ज्येष्ठ लेखिका डॉ. प्रतिमा इंगोले यांना देण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ फेब्रुवारी २०२५ रोजी, सायं. ६ वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात प्रसिध्द लेखिका डॉ. विनया खडपेकर यांच्या हस्ते हे पुरस्कार लेखकांना प्रदान करण्यात येणार आहेत.

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेने उभारला नाटककार प्रा. वसंत कानेटकरांचा अर्धपुतळा

रहिमतपूर या जन्मगावी २ फेब्रुवारीला रविवारी होणार अनावरण ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांच्यासह विविध मान्यवरांची उपस्थिती  पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ग्रामीण भागातील शाखा अतिशय दमदार कामगिरी करत आहेत. अशीच कामगिरी मसापचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील साताऱ्यातील शाहुपुरी शाखेने केली आहे. कुलकर्णी यांच्या पुढाकाराने आणि शाहुपुरी शाखेच्या प्रयत्नातून रहिमतपूर येथे  प्रसिध्द नाटककार, लेखक, पद्मश्री प्रा. वसंत कानेटकर यांच्या जन्मगावी त्यांचा अर्धपुतळा उभारुन यथोचित स्मारक साकारण्यात आले आहे. चौंडेश्वरी शिक्षण संस्था, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालय, मसाप रहिमतपूर शाखा,आणि शाहुपुरी शाखा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी  सकाळी ११ वाजता  राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते आणि  आ. मनोजदादा घोरपडे, आंतरराष्ट्रीय पर्यावरण तज्ज्ञ डॉ.राजेंद्र शेंडे, अरुण माने, अरुण कानेटकर, मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी, शिरीष चिटणीस, रवींद्र बेडकिहाळ, धैर्यशील कदम, संपतराव माने, वासुदेव माने,  चित्रलेखा माने-कदम, सचिन बेलागडे यांच्या उपस्थितीत. रहिमतपूर येथे प्रा. वसंत कानेटकर यांच्या पुतळ्याचे अनावरण करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.  प्रा. जोशी म्हणाले वसंत कानेटकर यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर येथे झाला.रविकिरण मंडळाच्या संस्थापक सदस्यापैकी एक असलेले  कवी गिरीश हे त्यांचे वडील. शिक्षण घेत असताना प्रा.कानेटकरांना वि.स.खांडेकर आणि कन्नड साहित्यिक,  विलिंग्डन महाविद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य वि.कृ.गोकाक या दोन ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या साहित्यिकांचे मार्गदर्शन लाभले. गडकरी, फडके, खांडेकर, आपटे, केतकर या लेखकांच्या साहित्याचा आणि पाश्चात्य जगातील इब्सेन, शॉ आणि शेक्सपियर या नाटककरांचा  प्रा.कानेटकरांवर खोलवर प्रभाव पडला. त्यांच्या घर, पंख आणि पोरका या कादंब-या गाजल्या  नाटककार म्हणून त्यांना विशेष प्रसिध्दी लाभली. वेड्याचं घर उन्हात  हे त्यांचे पहिले नाटक त्यानंतर एकूण ४२  नाटके त्यांनी लिहिली. प्रेमा  तुझा रंग कसा ?, रायगडाला जेव्हा जाग येते, मत्स्यगंधा, अश्रूंची झाले फुले, लेकुरे उदंड झाली, मला काही सांगायचय आणि हिमालयाची सावली ही विशेष उल्लेखनीय नाटके होत. मराठीतील ऐतिहासिक-पौराणिक नाटकांच्या क्षीण झालेल्या परंपरेचे पुनरुज्जीवन करुन  प्रा.कानेटकरांनी त्यांना नवे स्वरुप दिले. काही महिन्यांपूर्वीच परिषदेच्या शाहुपुरी शाखेने कविवर्य बा.सी.मर्ढेकर यांच्या घराचे स्मारकात रुपांतर आणि त्याचे लोकार्पण केले आहे. आता  रहिमतपूर येथे प्रा.कानेटकरांच्या पुतळ्याचे अनावरण होत आहे. येणाऱ्या काळात सातारा जिल्हयातील नामवंत साहित्यिकांचे स्मारक करण्याचा प्रयत्न मसाप,पुणे शाहुपुरी शाखेचा राहणार आहे. शाहुपुरी शाखेने आपल्या वैविध्यपूर्ण कार्याने महाराष्ट्रात नावलौकिक मिळवला असून या शाखेमुळे मसाप, पुणेच्या कार्यात ही ऐतिहासिक अशी नोंद झाली आहे. मसापच्या अशा उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शाखांचा आणि त्यांच्या कार्यकर्त्यांचा अभिमान वाटतो चौंडेश्वरी शिक्षण संस्थेचे अरुण माने हे शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत असले तरी ज्यांच्या जागेत संस्थेची उभारणी झाली त्या  प्रा.वसंत कानेटकराबद्दल त्यांना नेहमीच आदर राहिला आहे. प्रा.कानेटकर यांनी त्यांचा  वाडा शाळेला दिला. याठिकाणी सध्या कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे.  प्रा. कानेटकरांचे वडील कवी गिरीश व स्वत: कानेटकर हे शिक्षक होते. प्रा. कानेटकर यांची आपल्या जागेमध्ये शाळा व्हावी अशी इच्छा होती म्हणून त्यांनी ही जागा संस्थेला दिली. हा वाडा संस्थेला देण्यासाठी  कानेटकर यांचे पुतणे प्रा. अरुण कानेटकर यांचे मोलाचे सहकार्य मिळाले.  या जागेत कवी गिरीश यांचे स्मारक संग्रहालय, कानेटकरांच्या आई उमाताई कानेटकर यांच्या नावाने सार्वजनिक वाचनालय आहे. ही जागा तेरा गुंठे असून आता या जागेत कवी गिरीश शैक्षणिक व सांस्कृतिक केंद्र आहे. अर्धपुतळ्याचे अनावरण रविवार दि. २ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन मसाप, शाहुपुरी शाखेचे पदाधिकारी, चौंडेश्वरी शिक्षण संस्था, मसाप रहिमतपूर शाखा, उमाताई कानेटकर सार्वजनिक वाचनालयाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Uncategorized

जगण्यातले अंधारे आणि कुरूप कोपरे दळवींनी लेखनासाठी शोधले

वंदना बोकील कुलकर्णी यांचे मत, महाराष्ट्र साहित्य परिषदेत का.र. मित्र व्याख्यानमाला  पुणे : माणसाच्या जगण्यातले अंधारे आणि कुरूप कोपरे दळवींनी आपल्या लेखनासाठी शोधले असे मत ज्येष्ठ लेखिका वंदना बोकील कुलकर्णी यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आयोजित ‘मासिक मनोरंजन’ कार का.र. मित्र व्याख्यानमालेचे जन्मशताब्दी विशेष तिसरे पुष्प गुंफताना ते बोलत होते. ‘चतुरस्र प्रतिभेचा लेखक: जयवंत दळवी ’  हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी अध्यक्षस्थानी होते. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह शिरीष चिटणीस यावेळी उपस्थित होते. बोकील  म्हणाल्या दळवींनी मानवी जगण्यातले कारुण्य,  निराशा,  वेदना यांची रूपे दाखवली.  दुसरीकडे ठणठणपाळ या नावाने अतिशय खुसखुशीत,  निर्विष विनोदी लेखन केले.  भल्या भल्या,  प्रस्थापित लेखकांची मनसोक्त खिल्ली उडवली आणि तरीही ते अजातशत्रू राहिले. स्वतःचे अंतर्गत जीवन शिंपल्यातील  प्राण्यासारखे जपले. दळवी म्हणून कोणी ओळखू नये, असे वावरले. लेखक म्हणून आणि माणूस म्हणूनही दळवींच्या योगदानाची बूज राखायला हवी.   अध्यक्षीय समारोप करताना प्रा. जोशी म्हणाले, कामवासनेसारख्या विषयाला केंद्रस्थानी ठेऊन लिहिलेल्या दळवींच्या नाटकातील पुरुष संवेदन अतिशय टोकदार आहे. लैंगिकता आणि नैतिकता यांच्यातील संघर्षांचे मार्मिक चित्रण त्यात आहे. एका प्रश्नाचे उत्तर शोधण्यासाठी निवडलेली नवी वाट माणसांच्या जीवनात अनेक नवे प्रश्न निर्माण करत असते अशी प्रश्नांच्या चक्रव्युहात सापडलेली माणसे दळवींच्या साहित्यात जागोजागी भेटतात. त्यांच्या  साहित्याचे गारुड आजही कायम आहे.  सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले.  शिरीष चिटणीस यांनी सूत्रसंचालन केले.

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार विनय नारकर यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२४ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार विनय नारकर यांच्या ‘वस्त्रगाथा’ या राजहंस प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार, २१ मे २०२५ रोजी सायं. ६.०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात प्रसिद्ध चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

Uncategorized

डॉ. मंदा खांडगे यांना ‘मसाप स्नेहबंध’ पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ लेखिका आणि साहित्यप्रेमी भगिनी मंडळाच्या कार्यकारी विश्वस्त डॉ. मंदा खांडगे यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा ‘मसाप स्नेहबंध’ पुरस्कार जाहीर झाला आहे. प्रा. राजा दीक्षित यांनी दिलेल्या देणगीतून साहित्यसेवक म. श्री. दीक्षित यांच्या स्मरणार्थ गेल्या वर्षीपासून हा पुरस्कार देण्यात येतो. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ मे रोजी १२०  व्या वर्धापनदिन समारंभात सकाळी १०.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. परिषदेच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्‍वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

Scroll to Top