Uncategorized

स्त्रियांना विनोदी लेखन करताना मर्यादा येतात : मंगला गोडबोले
Uncategorized

स्त्रियांना  विनोदी लेखन करताना  मर्यादा येतात  :  मंगला  गोडबोले 

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार प्रदान पुणे : आजवर पुरुषांचा दृष्टिकोन त्यांच्या विनोदी लेखनात येत होता, स्त्रियांचा दृष्टिकोन मी माझ्या लेखनातून मांडला. तरीही बाई म्हणून स्त्रियांना  विनोदी लेखन करताना  मर्यादा येतात असे  मत ज्येष्ठ लेखिका मंगल गोडबोले यांनी व्यक्त  केले.   ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ या वर्षीचा उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा कै. रा. द. पुसाळकर पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना आणि उत्कृष्ट रहस्य कथा लेखनासाठीचा कै. इंदुमती पुसाळकर पुरस्कार लेखिका रमा गोळवलकर यांना माजी संमेलनाध्यक्ष भारत सासणे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी  त्या  बोलत होत्या. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्य्क्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमात प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, भारती पांडे, परीक्षक वर्षा गजेंद्रगडकर, कार्यवाह माधव राजगुरू उपस्थित होते   गोडबोले म्हणाल्या, विनोद निर्मितीसाठी दृष्टिकोन आणि भाषिक सौष्ठवाची गरज असते. आजचा काळ विनोदी लेखनासाठी अनुकूल आहे कारण समाजात दांभिकता आहे. पण भाषिक दौर्बल्य आहे. विनोदी लेखन करणे ही सोपी गोष्ट नाही.   सासणे  म्हणाले, जगभर विनोदी लेखनाला आणि रहस्य कथांना प्रतिष्ठा आहे. मराठी साहित्यात ती नाही.   प्रा. जोशी म्हणाले, उपहासापेक्षा परिहासाला प्राधान्य देणारा विनोद सर्वश्रेष्ठ आहे. विनोद दुर्मिळ असतो तो अट्टाहासाने घडवला तर अतिपरिचयात अवज्ञा होण्याची शक्यता असते. तसेच आज घडताना दिसते. विनोदबुद्धी क्षीण होणे आणि हास्य लोपणे हे समाजाच्या सांस्कृतिक अधोगतीचे लक्षण आहे. आजच्या समाजात चांगला विनोद पचविण्याची ताकद नाही. अजूनही मराठी साहित्यविश्व् अव्वल दर्जाच्या विनोदी कादंबरीच्या प्रतीक्षेत आहे. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. माधव राजगुरू यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सासणे, सौदागर यांचा जाहीर सत्कार
Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने सासणे, सौदागर यांचा जाहीर सत्कार                 

पुणे : ‘उसवण’ या कादंबरीसाठी साहित्य अकादमीचा युवा साहित्य पुरस्कार जाहीर झालेले लेखक देविदास सौदागर आणि ‘समशेर व भूतबंगला’ या कादंबरीसाठी बालसाहित्याचा पुरस्कार जाहीर झालेले ज्येष्ठ लेखक भारत सासणे यांचा जाहीर सत्कार महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात येणार आहे. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात येणार आहे. शुक्रवार २१ जून २०२४ रोजी सायंकाळी सहा वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात हा कार्यक्रम होणार आहे असे परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी कळविले आहे.

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार
Uncategorized

मंगला गोडबोले, रमा गोळवलकर यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेचा पुसाळकर साहित्य पुरस्कार

पुणे : ज्येष्ठ लेखिका भारती पांडे यांनी महाराष्ट्र साहित्य परिषदेला दिलेल्या देणगीतून यावर्षीपासून त्यांचे पिताश्री कै. रा. द. पुसाळकर आणि मातोश्री इंदुमती पुसाळकर यांच्या स्मरणार्थ साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत. या वर्षीचा उत्कृष्ट विनोदी लेखनासाठीचा कै. रा. द. पुसाळकर पुरस्कार ज्येष्ठ लेखिका मंगला गोडबोले यांना आणि उत्कृष्ट रहस्य कथा लेखनासाठीचा कै. इंदुमती पुसाळकर पुरस्कार लेखिका रमा गोळवलकर यांना जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मान पत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार, दि. २५ जून २०२४ रोजी सायं. ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे पूर्वाध्यक्ष भारत सासणे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.

सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखण्याचे सामर्थ्य लेखणीमध्येच – माधव कौशिक
Uncategorized

सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखण्याचे सामर्थ्य लेखणीमध्येच – माधव कौशिक

*मसापच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान* पुणे – लेखणी स्वतंत्र असेल तेव्हाच ती सत्तेवर आणि सत्ताधाऱ्यांवर अंकुश राखू शकते. कारण साहित्यिक हा सामान्य माणसांचा प्रवक्ता असतो. वाढत्या संवेदनहिनतेचे निराकरण करण्याचे सामर्थ्य साहित्यिकाच्या लेखणीतच आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक व साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी केले.  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्ताने विशेष ग्रंथकार आणि वार्षिक ग्रंथ पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कौशिक बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवत डाॅ. रावसाहेब कसबे होते. या वेळी व्यासपीठावर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.  माधव कौशिक या वेळी म्हणाले, समाजामध्ये संवेदनशीलता वाढावी, माणसामध्ये गुणात्मक परिवर्तन व्हावे हाच साहित्यिकाच्या लेखनाचा उद्देश असतो. लेखनात करुणेचा विस्तार होतो तेव्हाच साहित्याची निर्मिती होते. आजच्या काळात कट्टरता, अनुदारता वाढते आहे. पूर्वीसारखे आपण उदारमतवादी राहिलेलो नाही. त्यामुळे या घटत्या संवेदनहिनतेचे निराकरण करण्याची क्षमता फक्त चांगल्या साहित्यिकांमध्येच आहे. लेखन ही एक दैवी शक्ती आहे. ती निसर्गतः प्राप्त होते. त्याचा जेव्हा लेखकांना विसर पडतो तेव्हा समाजाचा ऱ्हास सुरू होतो.  अध्यक्षस्थानावरून बोलताना रावसाहेब कसबे म्हणाले, जोवर लेखकाला स्वतःची भूमिका नाही तोवर तो परजीवी असतो. त्यामुळे लेखकांनी जगण्यासंबंधी एक भूमिका घेऊन लिहायला शिकले पाहिजे. तेव्हाच ते लेखन प्रभावी ठरू शकते. हीच भूमिका आज सगळ्या लेखकांनी आपल्या मनाशी जागवायला हवी.  प्रा. मिलिंद जोशी यांनी प्रास्ताविक केले. ते म्हणाले, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कामाचा विस्तार ग्रामीण भागात तळागाळापर्यंत घेऊन जाण्याचा प्रयत्न केला आहे. साहित्य परिषदेचा कायापालट करण्यापासून ते सन्मानाने अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद बहाल करण्यापर्यंतचे अनेक नवे बदल घडवून सकारात्मक दिशेने वाटचाल सुरू आहे.  या निमित्ताने विविध देणगीदारांचा व उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. ऋचा बोंद्रे पवार यांनी स्वागतगीत सादर केले. सूत्रसंचालन अंजली कुलकर्णी यांनी केले. सुनिताराजे पवार यांनी आभार मानले.  चौकट  *सेल्फी पाॅइंटवर साहित्यिकांची गर्दी*  विविध ग्रंथपुरस्कारांचे मानकरी ठरलेले मान्यवर साहित्यिक महाराष्ट्रभरातून आलेले होते. त्यांच्यासाठी यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने खास सेल्फी पाॅइंट तयार केलेला होता. आपल्या साहित्यकृतीसह स्वतःचा फोटो काढण्यात साहित्यिक तिथे रंगून गेलेले दिसत होते.

वाचकांचे उदंड प्रेम नोबेल पुरस्कारापेक्षा मोठे – मीना प्रभू मसापच्या वर्धापनादिनानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार प्रदान
Uncategorized

वाचकांचे उदंड प्रेम नोबेल पुरस्कारापेक्षा मोठे – मीना प्रभू मसापच्या वर्धापनादिनानिमित्ताने जीवनगौरव पुरस्कार प्रदान 

पुणे – आजवरच्या लेखनाला वाचकांचे जे उदंड प्रेम लाभले ते एखाद्या नोबेल पुरस्कारापेक्षाही मोठे आहे, अशी भावना प्रख्यात लेखिका डाॅ. मीना प्रभू यांनी व्यक्त केली.  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापनदिनानिमित्त आयोजित विशेष सोहळ्यामध्ये डाॅ. मीना प्रभू यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने गौरवण्यात आले. त्या वेळी त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत डाॅ. रावसाहेब कसबे होते. या प्रसंगी व्यासपीठावर डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डाॅ. पी. डी. पाटील, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे भोसले, उपाध्यक्ष राजीव बर्वे, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.  या सोहळ्यात डाॅ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्काराने फ्रान्सिस वाघमारे यांना सन्मानित करण्यात आले. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा म्हणून फिरता करंडक मसापच्या शाहुपुरी शाखेला प्रदान करण्यात आला. बाबूराव लाखे वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार मसापच्या इस्लामपूरच्या शाखेला देऊन गौरवण्यात आले. प्रकाश देशपांडे आणि माधुरी वैद्य यांना मसाप कार्यकर्ता पुरस्काराने गौरवण्यात आले.  मीना प्रभू म्हणाल्या, प्रवासवर्णन हा साहित्यप्रकार नाहीच असे सांगणारे अनेक लोक होते. मला आज मिळालेल्या जीवनगौरव पुरस्काराने हे लेखन साहित्यप्रकारात येते हे सिद्ध झाले आहे याचा खूप आनंद आहे. गेली तीस वर्षे सातत्याने अभ्यासपूर्ण लेखन करण्याचा प्रयत्न केला आहे. या जीवनप्रवासात या अनुभवांनीच मला समृद्ध केले आहे, असे सांगून त्यांनी आपल्या परदेशप्रवासातील काही थक्क करणारे अनुभव उपस्थितांना सांगितले.  फ्रान्सिस वाघमारे म्हणाले, सामान्य माणसाचे दुःख जाणून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या आदिवासी मुलांसाठी प्रयत्न केले तेव्हा त्यांच्यातील एक साधा मुलगा आज अमेरिकेतील दुतावासात काम करतो आहे. आदिवासी मुलींकडेही लक्ष देऊन त्यांच्यासाठी प्रयत्न करायला हवे. त्यांच्यासाठी या पुढील काळातही मी कार्यरत राहणार आहे. मला मिळालेला पुरस्कार ही माझ्यावरील जबाबदारी आहे असे मी समजतो.  प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, वेगळ्या वाटा चोखाळणाऱ्या लेखकांनीच मराठी साहित्याच्या समृद्धीत भर घातली. प्रथम पुलंनी कसदार प्रवास वर्णनातून मराठी वाचकांना जगाचे दर्शन घडविले तेच काम मीना प्रभू यांनी पुढील काळात आपल्या समर्थ लेखणीतून केले. त्यामुळे मराठी वाचकांच्या जाणिवांचा प्रदेश विस्तारला. त्यांच्या प्रवास वर्णनाने केवळ त्या त्या देशाचे भौगोलिक दर्शन घडविले नाही तर सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय दर्शनही घडविले. लोकप्रिय लेखकांकडे दुर्लक्ष करण्याची मानसिकता कोत्या मनोप्रवृत्तीची निदर्शक आहे. मीना प्रभू यांचा सन्मान केल्याने एका दुर्लक्षित साहित्य प्रकाराचा सन्मान झाला आहे याचा महाराष्ट्र साहित्य परिषदेला आनंद आहे. डाॅ. रावसाहेब कसबे म्हणाले, साहित्यात राजकारण येऊ लागले की जे खरे साहित्यिक गुणवंत असतात त्यांचे काम बाजूला पडते आणि राजकारण करून साहित्यिक गट बनवतात त्यांच्यात आपसातच पारितोषिके दिली जातात. ते टाळले जावे म्हणून साहित्यिक राजकारणापासून दूर राहून मसापमधील सगळीच ध्येयवादी मंडळी काम करतात हे पाहून आनंद वाटतो. मीना प्रभू यांना मिळालेला पुरस्कार हे त्याचेच द्योतक आहे. आपल्या प्रवास वर्णनातून जगण्याचा एक जिवंत अनुभव मीना प्रभू यांनी वाचकांना दिला आहे. माणसाच्या जाणीवा विकसित करणे हे साहित्याचे खरे प्रयोजन असते ते काम त्यांच्या लेखनाने केलेले आहे.  अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. पुरस्कार विजेत्यांची ओळख सुनिता राजे पवार यांनी करून दिली. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.  चौकट *पुरस्काराची रक्कम अंधांसाठी प्रदान*  डाॅ. मीना प्रभू यांनी आजवर ज्या ज्या पुस्तकांचे लेखन केले ती सर्व प्रवासवर्णनाची पुस्तके लोकप्रिय झाली. त्यांना या पुस्तकाची जी रक्कम राॅयल्टी म्हणून मिळत गेली ती त्यांनी स्वतःकडे न घेता त्यांनी अंध मुलांच्या विकासासाठी देत आल्या आहेत. आतादेखील महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने जीवनगौरव पुरस्कार मिळताना त्यांना जी आर्थिक रक्कम पुरस्काराच्या रुपाने मिळाली ती त्यांनी पुणे ब्लाईंड असोसिएशनचे विनोद देसाई यांच्याकडे जाहीर समारंभातच सुपूर्त केली. त्यांच्या या दानशूर वृत्तीला उपस्थितांनी मनापासून दाद दिली.

मसापचे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर
Uncategorized

मसापचे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण पुणे दि. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ११९ व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक बा. सी. मर्ढेकरांच्या घराचे नूतनीकरण, अभिजात दर्जासाठीची चळवळ उभारणाऱ्या आणि गेली अनेक वर्षे मराठी भाषा पंधरवडा साजरा करणाऱ्या मसापच्या सातारा जिल्ह्यातील शाहूपुरी शाखेला, राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतीप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार गेली ३५ वर्षे सतत उपक्रमशील राहून ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करणाऱ्या मसापच्या सांगली जिल्ह्यातील इस्लामपूर शाखेला देण्यात येणार आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणार्‍या कार्यकर्त्यास देण्यात येणारे कार्यकर्ता पुरस्कार कोकणात साहित्य परिषदेच्या शाखांचा विस्तार करून वैशिष्ट्यपूर्ण वाड्मयीन उपक्रम घेणारे  प्रकाश देशपांडे (चिपळूण) यांना व पुण्यातील वारजे-कोथरूड शाखेच्या माध्यमातून विविध साहित्यिक कार्यक्रमांचे आयोजन करणाऱ्या माधुरी वैद्य (पुणे) यांना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ मे रोजी ११९  व्या वर्धापनदिन समारंभात सकाळी १०.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्‍वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.

सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा मश्रींनी पुढे चालवली : डॉ. सदानंद मोरे म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दीचा सांगता समारंभ संपन्न
Uncategorized

सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा  मश्रींनी  पुढे चालवली : डॉ. सदानंद मोरे म. श्री. दीक्षित यांच्याजन्मशताब्दीचा सांगता समारंभ संपन्न

पुणे :  केवळ स्वतःचा विचार न करता मश्री कायम समाजाचा विचार करत राहिले. त्यांनी आयुष्यभर चांगुलपणाची आणि चांगले काम करणाऱ्या माणसांची पाठराखण केली. सेवाभावी वृत्ती जपत सार्वजनिक काकांची परंपरा मश्रीनी पुढे चालवली असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. निष्ठावंत साहित्यसेवक आणि पुणे शहराचा चालता बोलता इतिहास म्हणून ज्ञात असलेले म. श्री. दीक्षित यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या सांगते निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद आणि उत्कर्ष प्रकाशनाने एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात मश्रींच्या जन्मशताब्दी वर्षांच्या निमित्ताने परिषदेतर्फे म. श्री. दीक्षित यांचे सुपुत्र आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ राजा दीक्षित यांनी परिषदेला दिलेल्या देणगीतून पहिला म. श्री. दीक्षित स्नेहबंध पुरस्कार परिषदेच्या कै. वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात ४४ वर्षाहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ग्रंथसेविका विमल अहिरे आणि परिषदेच्या कार्यालयात २७ वर्षांहून अधिक काळ कार्यरत असलेल्या ज्योस्ना नांदगिरीकर यांना मोरे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. तसेच ‘साहित्यिक काका: म. श्री. दीक्षित ‘या डॉ मेधा सिधये आणि रवींद्र ठिपसे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा.मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुळकर्णी, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अध्यक्ष प्रा डॉ राजा दीक्षित, उत्कर्ष प्रकाशनाचे सु. वा. जोशीयावेळी उपस्थित होते. दीक्षित म्हणाले, वडिलांच्या ‘सार्वजनिक काका’ पणामुळे आमचे कॊटुंबिक जीवन विलक्षण पोळलेले असले, तरी त्या चटक्यांनी  आम्हाला  वेगळी समृद्धीही दिली. काकांच्या फाटक्या खिशाच्या जाकिटातून मिळालेला सांस्कृतिक ठेवा लाखमोलाचा आहे. अर्थात, त्याला आईच्या अबोल त्यागाचे अस्तर आहे.   प्रा.जोशी म्हणाले, पैसा, पद, प्रतिष्ठा मिळावी यासाठी अनेक माणसे संस्थांवर काम करण्यासाठी उत्सुक असतात, मश्रींना या पैकी कशाचीच अपेक्षा नव्हती. निखळ साहित्य सेवा यातच त्यांना परमानंद मिळत होता. मश्रींनी वैयक्तिक जीवनात गरीबी अनुभवली पण त्यांनी आपल्या कामातून संस्थांना श्रीमंत आणि समृद्ध केले. अशी माणसे महाराष्ट्रात होती म्हणून तर संस्थांचे जाळे मजबूत होत गेले. निरपेक्ष बुद्धीने काम करणाऱ्या मश्रींनी साहित्य सेवेसाठी आणि संस्थात्‍मक कार्यासाठी आपल्या आयुष्याचे मोल दिले. मश्री हे साहित्य परिषदेचे वैभव होते. सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. विनोद कुळकर्णी यांनी आभार मानले. अंजली कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले

Uncategorized

मसापची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर २६ मे रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेची विशेष ग्रंथकार पारितोषिके जाहीर झाली आहेत. रमेश चव्हाण (विसाव्या शतकातील मराठा समाज), दीपक घारे (कला-समाज-संस्कृती), विक्रम भागवत (झोका), देवा झिंजाड (एक भाकर तीन चुली), समीर गायकवाड (झांबळ), स्नेहा अवसरीकर (बारीक-बारीक आवाज वाढत चाललेत), करुणा गोखले (ऐसपैस गप्पा नीलमताईंशी), डॉ. केशव सखाराम देशमुख (भाषा आणि संस्कृती), पंकज भोसले (हिट्स ऑफ नाइन्टी टू), डॉ. गजानन सीताराम शेपाळ (रंगसभा), नेहा भांडारकर (मीमांसा आणि (प्रे) श्रेयसचा वेध), पी. विठ्ठल (संभ्रमाची गोष्ट), रजिया सुलताना (रजनी ते रजिया), उज्ज्वला बर्वे (माझा ब्रँड आजादी), डॉ. प्रमोद पाठक (पुरातत्त्वावर वेदमुद्रा), डॉ. श्रीधर पवार (ब्लॅक पॅन्थर), डॉ. विनायक गंधे (साहित्य : अभिजात आणि लोकप्रिय), संजय आर्वीकर (आत्म-प्रकाश), रविमुकुल संपादक (मराठी भावसंगीत कोश-खंड १ व २), डॉ. वंदना रवींद्र घांगुर्डे (मराठी संगीत रंगभूमी), रमेश ओझा, श्याम पाखरे (नोआखाली-माणुसकीचा अविरत लढा), विजय धोंडीराम जाधव (शिवार), स्वानंद बेदरकर(संपादक) (शब्द कल्पिताचे न पाठवलेली पत्रे), दीपाली दातार (पैस प्रतिभेचा), दिलीप नाईक निंबाळकर (अंत्राळी), गौरी रत्नपारखी (रूम नं. ६), प्रसाद तारे (छत्रपती शिवाजी महाराज : व्यक्तिमत्त्वाचे भावदर्शन), सावित्री जगदाळे (उजळपरी-गद्य), डॉ. सुरेश सावंत (एलियन आला स्वप्नात-पद्य), रविबाला काकतकर (आत्मसामर्थ्य – मंत्र प्रतिसादांचा), विनायक कुलकर्णी (अर्थमेळ), अपूर्वा प्रदीप जोशी (आर्थिक गुन्हेगारीचे अंतरंग हर्षद ते हिंडनबर्ग), अनिता पाध्ये (प्यार जिंदगी है !), डॉ. अविनाश भोंडवे (स्वास्थ्य संवाद), डॉ. जयदेव पंचवाघ (न्यूरोसर्जरीच्या पाऊलखुणा), क्रांती हरेश पैठणकर(प्रबंध) (निवडक सामाजिक कार्यकर्त्या स्त्रियांची आत्मकथने : एक अभ्यास), डॉ. शांताराम गायकवाड (वासराचे व्यावसायिक संगोपन) या मान्यवर लेखकांच्या ग्रंथांना ही पारितोषिके जाहीर झाली आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकाचे स्वरूप आहे. ही  पारितोषिके २६ मे रोजी सकाळी ११.०० वा. एस. एम. जोशी सभागृहात ज्येष्ठ साहित्यिक आणि साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत.  अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या कार्यक्रमाला परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर उपस्थित राहणार आहेत.

Uncategorized

डॉ. मीना प्रभू यांना ‘मसाप जीवनगौरव’ फ्रान्सिस वाघमारे यांना’डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर२७ मे रोजी ११९ व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखिका डॉ. मीना प्रभू यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ फ्रान्सिस वाघमारे (नाशिक) यांना जाहीर झाला असून ११,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या ११९ व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. प्रा. जोशी म्हणाले, “मराठी साहित्यातील प्रवास वर्णनाचे दालन डॉ. मीना प्रभू यांनी आपल्या कसदार लेखनातून समृद्ध केले आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला आनंद होत आहे. फ्रान्सिस वाघमारे यांनी ख्रिस्ती साहित्य परिषदेच्या माध्यमातून साहित्य चळवळ गतिमान करत धार्मिक सुसंवाद, सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्यकर्ता म्हणून योगदान दिले आहे.  त्यांच्या कार्याचा गौरव करताना परिषदेला समाधान वाटत आहे.

Uncategorized

 महाराष्ट्र साहित्य परिषदेचा कृष्णमुकुंद पुरस्कार केशव चैतन्य कुंटे यांना जाहीर

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. मंगळवार, ७ मे २०२४ रोजी सायं. ६.०० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. – पं. सत्यशील देशपांडे, महाराष्ट्र साहित्य परिषदेत कृष्णामुकुंद पुरस्काराचे वितरण पुणेः-  धर्म आणि संगीत या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. प्रत्येक धर्मातील प्रार्थनांना संगीताचा पाया आहे, असे मत  ख्यातनाम शास्त्रीय गायक पं. सत्यशील देशपांडे यांनी व्यक्त केले.  महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार दिला जातो. २०२३ सालातील संशोधनात्मक ग्रंथासाठीचा पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या पॉप्युलर प्रकाशनाने प्रकाशित केलेल्या ग्रंथाला देशपांडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. त्यावेळी ते  बोलत होते. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.   महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर कार्यक्रमाचे अध्यक्ष महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, लेखिका डॉ. नलिनी गुजराथी, उद्योजक मोहन गुजराथी, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार आणि कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते.  देशपांडे म्हणाले की, संगीताच्या समग्रतेतील एक षष्टांश भाग या पुस्तकात आलेला आहे. केशवचैतन्य कुंटे  हे एक कृतिशील कलाकार असून त्यांचे सांगितीक विचार ते सप्रयोग सादर करीत असतात. यावेळी बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले की, प्रत्येक धर्माचे संगीत वेगळे असले तरी संगीताला कोणताही धर्म नसतो. कोणत्याही संगीतातून मिळणारा आनंद कैवल्यात्मक असतो.  धर्म, जात, प्रांत, भाषा यांच्या पलिकडे जाऊन कला माणूस जोडण्याचे काम करीत असते. गायक आणि संगीतकाराचे नाव, आडनाव आणि धर्म पाहून त्याच्याविषयी टिपण्णी केली जाते. एखाद्याने आपल्या मुलाचे नाव काय ठेवायचे हे ही आता समाजच ठरवू  लागला आहे.या विकृत मानसिकतेला बळ मिळणे समाज हिताचे नाही. ‘विविधतेत एकता’ हे या देशाचे वैशिष्टय आहे. ते टिकवून ठेवणे ही सर्वांची जबाबदारी आहे. स्वमतांधता, पंथाभिमान आणि अनर्थकारी धर्मवेड या गोष्टी देशासाठी हानिकारक आहेत. एकांगी संशोधन उपयोगाचे नाही.  यावेळी डॉ. नीलिमा गुंडी यांनी परीक्षकांचे मनोगत व्यक्त केले. डॉ. नलिनी गुजराथी यांनी पुरस्कार देण्यामागील भूमिका विशद केली. केशवचैतन्य कुंटे यांनी पुरस्काराला उत्तर दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी  केले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.  छायाचित्र ओळ :-  महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे प्रतिवर्षी प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी दिलेल्या देणगीतून संशोधनात्मक ग्रंथाला दिला जाणारा कै. कृष्णमुकुंद स्मृती पुरस्कार केशवचैतन्य कुंटे यांना यांच्या ‘भारतीय धर्मसंगीत’ या ग्रंथासाठी प्रदान करताना पं. सत्यशील देशपांडे. यावेळी (डावीकडून) मोहन गुजराथी, विनोद कुलकर्णी, कुंटे, देशपांडे, प्रा. मिलिंद जोशी डॉ. नलिनी गुजराथी आणि सुनिताराजे पवार.

Scroll to Top