Uncategorized

साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. सुधाकर भोसले यांना प्रदान
Uncategorized

साहित्य परिषदेचा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार प्रा. सुधाकर भोसले यांना प्रदान

पुणे : अभ्यास करणारी माणसे संस्थात्मक काम करत नाहीत पण डॉ जोगळेकर यांनी संस्थात्मक काम मनोभावे केले असे मत महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देण्यात येणारा डॉ. गं. ना. जोगळेकर स्मृती पुरस्कार ज्येष्ठ लेखक प्रा सुधाकर भोसले यांना मोरे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, पराग जोगळेकर, उज्वला जोगळेकर यावेळी उपस्थित होते. प्रा भोसले म्हणाले, मी साहित्याचा भक्त आहे, सेवानिवृत्त झाल्यानंतरही मी साहित्याची सेवा करत आहे. अभिरुची सध्या हीन दर्जाची होत चालली आहे. डॉ जोगळेकर यांनी उपयोजित आणि व्यावहारिक मराठीसाठी केलेले काम मोलाचे आहे.  प्रा. जोशी म्हणाले, मध्यमवर्गीयांची आत्ममग्नता चिंताजनक आहे. त्यामुळे संस्थात्मक कार्याची हानी होत आहे. राजकारणाचे प्रतिबिंब जीवनाच्या सर्व क्षेत्रात दिसत असते. निष्ठावान कार्यकर्ता ते पैसे घेऊन राबणारा सेवक असे मोठे स्थित्यंतर राजकारणात काळाच्या ओघात घडले. ज्या महाराष्ट्राला महात्मा गांधीनी कार्यकर्त्याचे मोहोळ असे म्हटले होते, तिथे आज ‘कुठे गेले कार्यकर्ते’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. पैसा हेच सर्वस्व झाल्यामुळे वेळ आणि पैसा यांची सांगड घालत जगणे हीच जीवनपद्धती झाली आहे. त्यामुळे निस्पृह आणि निरपेक्ष वृत्तीने काम करणारे तसेच संस्थात्मक कामासाठी वेळ देणारे कार्यकर्ते दिवसेंदिवस दुर्मिळ होत आहेत.  सुनिताराजे पवार यांनी प्रास्ताविक केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले. मृणालिनी कानिटकर-जोशी यांनी सूत्रसंचालन केले.

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व अंकांचे होणार डिजिटायझेशन
Uncategorized

महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व  अंकांचे होणार डिजिटायझेशन,

राज्य मराठी विकास संस्थेचा पुढाकार  पुणे दि. ०८ : महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था असा नावलौकिक असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या महाराष्ट्र साहित्य पत्रिका या वाड;मयीन नियतकालिकाच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन करण्यात येणार असून हा अनमोल ठेवा आता साहित्य रसिकांसाठी महाजालावर उपलब्ध होणार आहे यासाठी राज्य मराठी विकास संस्थेने पुढाकार घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.          प्रा. जोशी म्हणाले, ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ हे परिषदेचे वाडमयीन नियतकालिक संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा जपणारे आहे.  १९१३ मध्ये पत्रिकेचा पहिला अंक ‘विविधज्ञानविस्तार’ ची पुरवणी म्हणून प्रकाशित झाला. १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरू झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप मुख्यतः साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. यातील लेखन वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. परिषदेने  गेल्या १०० वर्षातील निवडक लेखांचे संकलन असलेला आणि डॉ.नीलिमा गुंडी यांनी संपादित केलेला अक्षरधन हा एक हजार पृष्ठांचा ग्रंथ नुकताच प्रकाशित केला आहे. आता महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या सर्व अंकांचे डिजिटायझेशन होणार असल्यामुळे सर्व अंक वाचक, अभ्यासक आणि संशोधक यांच्यासाठी उपलब्ध होणार आहेत. राज्य मराठी विकास संस्थेचे संचालक डॉ शामकांत देवरे म्हणाले, राज्य मराठी विकास संस्था ही महाराष्ट्र शासनाद्वारे मराठीच्या विविधांगी विकासासाठी स्थापन करण्यात आलेली संस्था असून महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक धोरण २०१० अनुसार संस्थेद्वारे दुर्मिळ ग्रंथांचे आणि नियतकालिकांचे संगणकीकरण करून ते महाजालावरून उपलब्ध करून देण्याचा प्रकल्प राबविण्यात येत असतो. आजवर अनेक ग्रंथांच्या तसेच  नियतकालिकांच्या उपलब्ध झालेल्या अंकांचे संगणकीकरण करण्यात आले असून ते संस्थेच्या संकेत स्थळावरुन सर्वांना अभ्यासासाठी नि: शुल्क उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. महाराष्ट्र साहित्य  पत्रिकेचे वाड;मयीन  महत्त्व लक्षात घेऊन महाराष्ट्र साहित्य परिषदेला या संदर्भात राज्य मराठी विकास संस्थेकडून प्रस्ताव देण्यात आला होता. परिषदेने त्यास मान्यता दिली असून हा प्रकल्प लवकरच पूर्ण करण्यात येईल.

कवितेतून नव्या स्त्री जाणिवांचा जागरमहाराष्ट्र साहित्य परिषदेत रंगले योगिनी जोगळेकर स्मृतिदिनानिमित्त कवयित्रींचे संमेलन
Uncategorized

कवितेतून नव्या स्त्री जाणिवांचा जागर महाराष्ट्र साहित्य परिषदेत रंगले योगिनी जोगळेकर स्मृतिदिनानिमित्त कवयित्रींचे संमेलन

पुणे : लेखिका, कवयित्री आणि गायिका योगिनी जोगळेकर यांच्या स्मृती दिनानिमित्त महाराष्ट्र साहित्य परिषदेत कवयित्री संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. कसदार कवितांतून कवयित्रीनी नव्या स्त्री जाणिवांचा जागर केला. कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, वि. दा. पिंगळे यावेळी  उपस्थित  होते. या कविसंमेलनात ज्योत्स्ना चांदगुडे, मृणालिनी कानिटकर-जोशी, वैशाली पतंगे, आश्लेषा महाजन, निरुपमा महाजन, मीना शिंदे, प्रज्ञा महाजन, योगिनी जोशी, चिन्मयी चिटणीस, सविता इंगळे, आरती देवगावकर, रुपाली अवचरे, अस्मिता चांदणे, आरुषी दाते, बालिका बिटले, नूतन शेटे, अंजली ढमाळ, वैशाली माळी, वासंती वैद्य या कवयित्रींनी त्यांच्या कविता सादर केल्या. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ कवयित्री अंजली कुलकर्णी होत्या. प्रास्ताविक मसापच्या प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यांनी केले तर जोस्ना चांदगुडे यांनी सूत्र संचालन केले.

समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अविनाश सप्रे
Uncategorized

समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा. अविनाश सप्रे

पुणे दि.०६: महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे, आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित  एक दिवसीय समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ समीक्षक प्रा. अविनाश सप्रे यांची निवड करण्यात आली आहे. हे संमेलन बुधवार २१ ऑगस्ट रोजी सकाळी दहा ते दुपारी चार यावेळेत आबासाहेब गरवारे  महाविद्यालयाच्या  दृकश्राव्य सभागृहात होणार आहे,अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.  प्रा. जोशी म्हणाले, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात साहित्याविषयी व विशेषत: समीक्षेविषयी गांभीर्याने चर्चा होत नाही, अशी अनेक नामवंत साहित्यिकांची व समीक्षकांची भावना होती. तिचा आदर करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने २०११ सालापासून संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला .आजवर झालेल्या या समीक्षा संमेलनाचे अध्यक्षपद प्रा. रा. ग .जाधव, प्रा के.रं.शिरवाडकर, प्रा.वसंत आबाजी डहाके, सुधीर रसाळ, डॉ हरिश्चंद्र थोरात, डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, डॉ. दिलीप धोंडगे , डॉ.रेखा इनामदार साने,  डॉ रमेश वरखेडे  यांनी भूषविले आहे  या संमेलनात उद्घाटनाच्या सत्रात समीक्षा संमेलनाचे अध्यक्ष प्रा. अविनाश सप्रे यांचे अध्यक्षीय भाषण  होणार आहे. ‘समीक्षेच्या परिभाषेची समीक्षा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. रूपाली शिंदे, डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. सुजाता शेणई  सहभागी होणार आहेत. ज्येष्ठ समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद होणार आहे. ‘समाज माध्यमांवरील कला समीक्षा’ या विषयावर परिसंवाद होणार असून त्यात गणेश मतकरी, डॉ. वर्षा तोडमल, प्रसाद शिरगावकर, हिना खान सहभागी होणार आहेत. संमेलनाचा समारोप डॉ. विनय हर्डीकर यांच्या व्याख्यानाने होणार असून नव्या समीक्षेकडे हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. असेही प्रा. जोशी यांनी सांगितले.

साहित्य परिषदेत तरुणाईच्या कवितेच्या सरी बरसल्या
Uncategorized

साहित्य परिषदेत तरुणाईच्या कवितेच्या सरी बरसल्या

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे युवा कवी कवयित्रींचा समावेश असलेले “मी, पाऊस तो/ती” हे कवी संमेलन नुकतेच परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात संपन्न झाले. सर्व विद्याशाखांचे विद्यार्थी आणि विविध कार्यक्षेत्रात काम करणारे तरुण यांनी त्यांच्या कविता ऐकवून सभागृह तरुण केले. बाहेर पाऊस कोसळत असताना साहित्य परिषदेत तरुणाईच्या कवितेच्या सरी बरसल्या. प्रतिक्षा ढोकळे, गौरी चित्ते, स्नेहा बोडके, शाश्वती वझे, जागृती भामरे, प्रभाकर व्यवहारे, प्रसाद कुंभार, आयुष सुरडकर, तेजस कुलकर्णी, श्रेया जाधव, विशाल माने, ⁠प्रथमेश बोराडे, ऋतुराज देशपांडे, ⁠अथर्व अदमाने, साक्षी थोरात, आकांक्षा पटवर्धन, सायली बंडबे, भक्ती लालसरे, श्रेया जगदाळे, प्रतिक्षा जोशी, प्रसन्नकुमार धुमाळ, श्रेयश फापाळे, अमोल रसाळ या कवींनी कवीसंमेलनात सहभाग घेतला. यावेळी महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, कार्यवाह वि दा पिंगळे उपस्थित होते. मसापचे पुणे शहर प्रतिनिधी, लेखक, कवी डॉ. आशुतोष जावडेकर यांनी या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन केलं. वेगवेगळे भाव मांडणाऱ्या कविता या संमेलनात कवींनी सादर केल्या. “शेवटी मी राहिलो काय, तू राहिली काय, इतकेच काय पावसाळा देखील आता वेगळा झालाय तुझा आणि माझा” ही श्रेयस फापाळे याची कविता असो किंवा “पुन्हा एकदा अनुभव दे प्रेमाचं ते सत्र, पुन्हा मला लिहू दे अश्रूंनी प्रेमपत्र!” असे सांगणारी आयुष सुरडकर याची कविता असो श्रोत्यांनी त्याला भरभरून दाद दिली. “कधी घनगर्द, कधी मल्हार, कधी तुळस.. थेंब थेंब होतो मुरारी!” असं म्हणणारी आकांक्षा पटवर्धन हिची कविता किंवा “मुलींनो, स्वप्नातला किंग कुमार नक्की असावा, ज्यात तुमचा बाप तुम्हाला दिसावा!” अशी थेट मांडणी करणारी आजच्या काळाची साक्षी थोरात हिची कविता सर्वांना भावली. मार्गदर्शन करताना प्रा जोशी म्हणाले, केवळ प्रतिभा आणि शब्द सामर्थ्य आहे म्हणून उत्तम कविता लिहिता येत नाही. कवीला शब्दांच्या पाठीशी प्रतिभेचे, अनुभवाचे आणि साधनेचे संचित उभे करावे लागते. तरुणाईने महाविद्यालयीन जीवन संपल्यानंतर जगण्याच्या लढाईत कवितेचे बोट सुटणार नाही याची काळजी घ्यावी. कार्यक्रमाच्या शेवटी सगळ्यांच्या आग्रहास्तव डॉ. आशुतोष जावडेकर यांनी त्यांचे वीण हे गाणे सादर केले आणि कार्यक्रम संपला तरीही कवी आणि त्यांच्या कविता सभागृहात रेंगाळत राहिल्या.

साहित्य पंढरीत विठू नामाचा गजर
Uncategorized

साहित्य पंढरीत विठू नामाचा गजर

विदुषी मंजिरी आलेगावकर यांच्या गायनाने रसिक मंत्रमुग्ध पुणे : गणपत विघ्नहरन गजानन ” ही गणेश स्तुतीची बंदिश, शांता शेळके यांचं ‘दाता तू गणपती गजानन’ ही रचना, संत गोरा कुंभार  यांचा “निर्गुणाचा संग धरीला जो आवडी” हा अभंग, ” माझे जीवपण फिटावे केशवा ” ही सद्गुरु शिरीष दादा कवडे यांची रचना, “सुनता है गुरु ग्यानी”,  “उड जायेगा हंस अकेला” या संत कबीरांच्या रचना, “जोहार मायबाप जोहार” हे संत कान्होपात्रा या संगीत नाटकातील नाट्यपद, “सर्वात्मका सर्वेश्वरा” हे “ययाती देवयानी” या नाटकातील नाट्यपद अशा एकाहून एक सरस रचना सादर करत विदुषी मंजिरी आलेगावकर यांनी रसिक श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. निमित्त होते  महाराष्ट्राची साहित्यपंढरी असा नावलौकिक  असलेल्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने आषाढी एकादशी निमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे. परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात अभंग आणि निर्गुणी भजन आलेगावकर यांनी सादर केले. त्यांना तबल्यावर अजित किंबहुने आणि हार्मोनियमवर अमोल मोरे साथ केली. प्राची जोगळेकर, स्वराली आलेगावकर, कीर्ती कुमठेकर आणि डॉ मृणाल वर्णेकर या कार्यक्रमात सहभागी झाले होते. डॉ वर्षा तोडमल यांनी रसाळ निरुपण केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार यावेळी उपस्थित होते. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे : प्रा. मिलिंद जोशी यावेळी बोलताना प्रा. जोशी म्हणाले, संत साहित्यात केवळ अध्यात्म, परमार्थ आणि निवृत्तीचाच विचार नाही. त्यात प्रखर प्रवृत्तीवाद आहे. वारी हे महाराष्ट्राचे सांस्कृतिक वैभव आहे. वारीत सहभागी होताना ‘मी’ विसरावा लागतो. वारी हे एकात्म आणि समूहभावनेचे उत्तम उदाहरण आहे.’ ‘मी’ चे आम्हीत रुपांतर करून वारी माणसांमध्ये समूहभावना निर्माण करते. माणसाला व्यापक आणि प्रसरणशील बनविते. मानव ही जात आणि मानवता हाच धर्म हा विचार घेऊन एकात्म भावनेने वारकरी वारीत सहभागी झालेले असतात. स्त्री-पुरुष, गरीब-श्रीमंत, लहान-मोठा, सुशिक्षित-अशिक्षित असा कोणताही भेद वारीत नसतो. वारी हा पाहण्याचा किंवा ऐकण्याचा विषय नाही. अनुभूतीच्या पातळीवर वारीचे जे दर्शन घडते ते माणसांना आदर्श जीवनाचे व्यवस्थापन कसे करावे याचे मार्गदर्शन करते. 

महाराष्ट्र साहित्य परिषदेत सगुण निर्गुण हा विशेष कार्यक्रम
Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेत सगुण निर्गुण हा विशेष कार्यक्रम

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेत आषाढी एकादशीनिमित्त पूर्वसंधेला ‘सगुण निर्गुण’ या सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. अभंग आणि निर्गुणी भजनाचा हा कार्यक्रम  विदुषी मंजिरी आलेगावकर  सादर करणार असून त्यांना अजित किंबहुने आणि अमोल मोरे साथ करणार आहेत. प्राची जोगळेकर, स्वराली आलेगावकर, कीर्ती कुमठेकर आणि डॉ मृणाल वर्णेकर या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. डॉ वर्षा तोडमल निरुपण करणार आहेत. हा कार्यक्रम मंगळवार १६ जुलै रोजी सायंकाळी ६वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे.

मसापची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर २६ मे रोजी साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांच्या हस्ते वितरण
Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे तरुणाईसाठी खास कविसंमेलन

पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने तरुणाईसाठी खास कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मी, पाऊस, तो/ती असा या कविसंमेलनाचा विषय आहे. संमेलनात  सहभागी होण्यासाठी इच्छुक असणाऱ्या  १६ ते २५ वयोगटातील कवींनी आपल्या जास्तीत जास्त दोन कविता masaparishad@gmail.com या इमेलवर पाठवाव्यात. इ मेलमध्ये “मी, पाऊस, तो/ती” असा उल्लेख करावा आणि इमेलमध्ये आपला मोबाईल क्रमांक द्यावा. कविता वाचनासाठी कवीने स्वतः उपस्थित असणे अनिवार्य असून कविता पाठवण्याची अंतिम तारीख २१ जुलै आहे. पन्नास उत्तम कवितांची  निवड तज्ज्ञ समिती मार्फत केली जाईल. या कविसंमेलनाचे सूत्रसंचालन डॉ. आशुतोष जावडेकर आणि समृद्धी पांडे करणार आहेत. हे कविसंमेलन रविवार २८ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार आहे. पावसाच्या सरी, मैत्रीचा वारा आणि प्रेमाच्या कविता अनुभवण्यासाठी  तरुणांनी या कविसंमेलनात सहभागी व्हावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी केले आहे.

संत कवयित्रींनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला : डॉ. मुकुंद दातार महाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. चिडगोपकर यांना प्रदान
Uncategorized

संत कवयित्रींनी स्त्रीमुक्तीचा पाया रचला : डॉ. मुकुंद दातारमहाराष्ट्र साहित्य परिषदेचा प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. चिडगोपकर यांना प्रदान

पुणे :  –  ज्या काळात  स्त्रियांवर खूप बंधने होती त्याकाळात संत कवयित्रींनी सामाजिक बंधने सैल केली. संत कवयित्रींच्या कवितेत त्यांचा अंत:स्वर प्रकटला आहे. त्यांनी स्त्री मुक्तीचा पाया रचला. असे मत गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ. मुकुंद दातार यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्यावतीने डॉ. म.वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य सोनोपंत दांडेकर पुरस्कार डॉ. अलका चिडगोपकर यांना ‘मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा’ या ग्रंथासाठी डॉ. दातार यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष  प्रा. मिलिंद जोशी, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, आनंदिनी क्षीरसागर उपस्थित होते. डॉ. दातार म्हणाले – वारीत कोणीही नवस करत नाही. कसलीही अपेक्षा न करता आईच्या ओढीने जावे तसे वारकरी पंढरीला जातात. तिथे साधेपणा जपला जातो. हाथरास मध्ये शेकडो लोक मृत्युमुखी पडतात. अशा कार्पोरेट अध्यात्माला विरोध करायला हवा. डॉ. चिडगोपकर म्हणाल्या, संत कवयित्रीनी आपले स्त्रीसुलभ भाव अध्यात्म साधनेच्या आड येऊ दिलेले नसले तरी त्यांना त्यांच्या स्त्रीपणाची व त्यासह येणाऱ्या सामाजिक बंधनांचीही  असलेली जाणीव त्यांच्या काव्यरचनेत दिसते. अध्यात्मापलीकडील जीवनाकडे पाठ फिरविल्याने मध्यमयुगीन कवितेलाच मर्यादा पडलेल्या आहेत. संत कवयित्रींच्या कवितेतही त्या मर्यादा प्रतिबिंबित होणे अटळ आहे. प्रा. जोशी म्हणाले, संत कवयित्रींनी त्यांच्या रचनातून मानवी जीवनमूल्यांचे व लोक संस्कृतीचे दर्शन घडविले. अनिष्ट रुढी परंपरांवर प्रहार केले.  व्यक्ती आणि समाज, बाह्यरंग आणि अंतरंग, प्रपंच आणि परमार्थ यांचा एकत्रित विचार संत कवयित्रींच्या रचनामध्ये दिसतो. अठरापगड जातीत विभागलेला समाज संतांनी   विठ्ठल नावाच्या ध्वजाखाली एकत्र आणला. अध्यात्माचे लोकशाहीकरण करत स्त्री पुरुष, उच्च नीच, गरीब श्रीमंत हा भेद नष्ट केला. राष्ट्रीय एकात्मतेच्या पुढे जाऊन वैश्विक एकात्मतेची कल्पना मांडली. सुनिताराजे पवार यांनी प्रस्ताविक केले.

डॉ अलका चिडगोपकर यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार
Uncategorized

डॉ अलका चिडगोपकर यांना प्राचार्य सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार

पुणे: महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने दरवर्षी डॉ म. वि. गोखले पुरस्कृत प्राचार्य शं. वा. तथा सोनोपंत दांडेकर स्मृती पुरस्कार दिला जातो. यावर्षी हा पुरस्कार डॉ अलका चिडगोपकर यांच्या ‘मध्ययुगीन मराठी संत कवयित्रींची काव्यधारा’ या ग्रंथाला जाहीर झाला आहे. रोख रक्कम आणि सम्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. ९ जुलै  रोजी सायंकाळी ६ वाजता महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणाऱ्या कार्यक्रमात गीता धर्म मंडळाचे अध्यक्ष डॉ मुकुंद दातार यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी यांनी दिली.

Scroll to Top