Uncategorized

Uncategorized

मसापचे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर

चोपडा आणि  पलूस शाखेचा सन्मान २७ मे रोजी १२० व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण पुणे दि. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या १२० व्या वर्धापन दिनानिमित्त देण्यात येणारे उत्कृष्ट शाखा आणि कार्यकर्ता पुरस्कार जाहीर झाले आहेत. राजा फडणीस पुरस्कृत उत्कृष्ट शाखा फिरता करंडक मराठी भाषा आणि साहित्यविषयक विविध उपक्रम राबविणाऱ्या मसापच्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा शाखेला देण्यात येणार आहे. राजन लाखे पुरस्कृत बाबुराव लाखे स्मृतिप्रीत्यर्थ वैशिष्ट्यपूर्ण शाखा पुरस्कार गेली अनेक वर्षे सतत उपक्रमशील राहून ग्रामीण भागात साहित्य चळवळ गतिमान करणाऱ्या मसापच्या सांगली जिल्ह्यातील पलूस शाखेला जाहीर झाला आहे. रत्नाकर कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ कार्यकारी मंडळात आणि शाखेत उत्तम काम करणार्‍या कार्यकर्त्यास पुरस्कार देण्यात येतात. यावर्षीचे कार्यकर्ता पुरस्कार जयंत येलूलकर (अहिल्यानगर) यांना व श्रीकृष्ण पुरंदरे (तळेगाव-दाभाडे) यांना जाहीर झाले आहेत. रोख रक्कम आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. २७ मे रोजी १२०  व्या वर्धापनदिन समारंभात सकाळी १०.३० वा. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात होणार्‍या कार्यक्रमात परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्‍वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्‍वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्‍वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे, विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत.  

Uncategorized

महाराष्ट्र साहित्य परिषदेची ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिके जाहीर

अमोल पालेकर, खलील मोमीन, दत्तप्रसाद दाभोळकर, मंगला सामंत मसापच्या वार्षिक ग्रंथ पारितोषिकांचे मानकरी २६ मे रोजी १२० व्या वर्धापनदिन समारंभात डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते ग्रंथ आणि ग्रंथकार पारितोषिके प्रदान केली जाणार पुणे : अमोल पालेकर, खलील मोमीन, दत्तप्रसाद दाभोळकर, मंगला सामंत, अभिराम भडकमकर, मोनिका गजेंद्रगडकर, भानू काळे, दिलीप फलटणकर, श्रीराम कुंटे, मुग्धा गोडबोले, माधव जाधव, नितीन हांडे, सदानंद कदम, मेघना भुस्कुटे, भीमराव वाघचौरे, डॉ. सविता नायक-मोहिते, शैला मुकुंद, विवेक गाडगीळ, डॉ. लता अकलूजकर, विद्या डेंगळे, मोहन काळे, मंजिरी हेटे, प्रसाद महाडकर, संजीवनी खेर, कृष्णाजी कोकाटे, नीलकंठ कदम, डॉ. रेवा दुभाषी, डॉ. संजय कप्तान, डॉ. कुशल पाखले, डॉ. संजय तुंगार, सुधीर साबळे, मंदार गद्रे, विद्या पोळ-जगताप, संजय दुधाणे, महेंद्र कुरघोडे, विजया ब्राह्मणकर, श्रीधर दीक्षित या लेखकांच्या ग्रंथांना महाराष्ट्र साहित्य परिषदेची वार्षिक ग्रंथ पारितोषिके जाहीर झाली आहेत. अजीम नवाज राही, प्रशांत असनारे, हेमकिरण पत्की, चं. प्र. देशपांडे, डॉ. अशोक चौसाळकर, शिवराज गोर्ले, डॉ. सुनीलकुमार लवटे, हेरंब कुलकर्णी,  श्री. द. महाजन,  रमणलाल शहा, डॉ. अरुणचंद्र पाठक, मधुवंती पेठे, व. बा. बोधे, अनघा केसकर, श्रीपाद ब्रह्मे, सु.ल. खुटवड,  महेश कराडकर, विनया देसाई, उमेश घेवरीकर, उषा मेहता हे विशेष ग्रंथकार पारितोषिकांचे मानकरी आहेत. रोख रक्कम आणि सन्मानपत्र असे या पारितोषिकांचे स्वरूप आहे. ग्रंथ आणि विशेष ग्रंथकार पारितोषिके २६ मे रोजी सकाळी १०.३० वा. एस. एम. जोशी सभागृहात प्रसिद्ध लेखिका डॉ. सविता सिंह यांच्या हस्ते आणि परिषदेचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या अध्यक्षतेखाली प्रदान करण्यात येणार आहेत;  अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली. 

Uncategorized

लक्ष्मण गायकवाड यांना ‘मसाप जीवनगौरव’

डॉ. गीताली वि. मं. यांना ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ जाहीर २७ मे रोजी १२० व्या वर्धापनदिन समारंभात पुरस्कारांचे वितरण पुणे : महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने देण्यात येणारा ज्येष्ठ भाषा अभ्यासक आणि लेखिका डॉ. अंजली सोमण पुरस्कृत ‘मसाप जीवनगौरव’ पुरस्कार प्रसिद्ध लेखक ‘उचल्या’कार लक्ष्मण गायकवाड यांना जाहीर झाला आहे. २५,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. मसापचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ डॉ. गीताली वि. मं. यांना जाहीर झाला असून ११,०००/- रु. आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे. हे पुरस्कार मसापच्या २७ मे रोजी होणाऱ्या १२० व्या वर्धापनदिन समारंभात परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात मसापचे अध्यक्ष डॉ. रावसाहेब कसबे यांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहेत. परिषदेच्या विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवाजीराव कदम, कार्यकारी विश्वस्त डॉ. पी. डी. पाटील, विश्वस्त यशवंतराव गडाख, उपाध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे, राजीव बर्वे आणि विद्याधर अनास्कर यावेळी उपस्थित राहणार आहेत. अशी माहिती महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांनी दिली.   प्रा. जोशी म्हणाले, “उचल्या” ह्या त्यांच्या आत्मकथनाने लक्ष्मण गायकवाड  यांना वेगळी ओळख मिळवून दिली १९८८ सालचा साहित्य अकादमी पुरस्कार ‘उचल्या’ या त्यांच्या आत्मकथनाला मिळाला.  त्यांनी आजवर आपल्या लेखनातून परिघाबाहेरील  उपेक्षितांच्या व्यथा वेदना मांडून त्यांचा आवाज बुलंद केला आहे. त्यांच्या या योगदानाबद्दल त्यांना मसाप जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करताना परिषदेला समाधान वाटत आहे. डॉ. गीताली वि. मं. यांनी स्त्री मुक्तिच्या चळवळीत मोलाचे योगदान आजवर दिले आहे. स्त्रीवादी चळवळीला ५० वर्ष पूर्ण होत असताना डॉ. गीताली वि. मं. यांच्या कार्याचा ‘डॉ. भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार’ देऊन गौरव करताना परिषदेला आनंद होत आहे.

Uncategorized

जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन

दुर्मिळ ग्रंथांच्या  डिजिटायझेशनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात : प्रा.मिलिंद जोशी पुणे : जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्र साहित्य परिषदेत दुर्मिळ ग्रंथांचे प्रदर्शन परिषदेच्या वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालयात आयोजित करण्यात आले होते. अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कार्यवाह प्रमोद आडकर, ग्रंथसेवक मृणालिनी भट, वर्षा डाळिंबकर, शोभना कुलकर्णी, ज्योस्ना नांदगिरीकर यावेळी उपस्थित होते. प्रा. जोशी म्हणाले, साहित्य परिषदेचे वा. गो. आपटे संदर्भ ग्रंथालय नेहमीच अभ्यासक, संशोधक आणि विद्यार्थी यांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू राहिलेले आहे. कार्यकारी मंडळाने दुबईतील प्रसिद्ध उद्योगपती विनोद जाधव यांच्या सहकार्याने ग्रंथालयाचे नूतनीकरण केले. तसेच कल्याणराव जाधव अभ्यासिका सुरु केली. चार वर्षांपूर्वी ग्रंथ दत्तक योजना राबवून साहित्य परिषदेने दोनशे दुर्मिळ ग्रंथांचे डिजिटायझेशन केले. कार्यकारी मंडळातील सदस्यांनी तसेच साहित्य रसिकांनी ग्रंथ दत्तक घेऊन ही योजना यशस्वी करण्यासाठी सहकार्य केले. भांडारकर प्राच्यविद्या संशोधन केंद्राने त्यासाठी तंत्रज्ञानाचे सहकार्य केले होते. आता दुर्मिळ ग्रंथांच्या डिजिटायझेशनच्या दुसऱ्या टप्प्याला सुरुवात करत असून ते पुणे नगर वाचन मंदिराच्या सहकार्याने केले जाणार आहे.”

Uncategorized

मराठी साहित्यसंमेलने अधिकाधिक लोकाभिमुख व्हावी

माजी संमेलनाध्यक्षांनी व्यक्त केली अपेक्षा, अ. भा. मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन  पुणे – आगामी काळातील अखिल भारतीय साहित्य संमेलने ही अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे असून त्यासाठी अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाने पुढाकार घ्यावा, असे आवाहन अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या माजी संमेलनाध्यक्षांनी आज केली. निमित्त होते, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या कार्यालयाच्या उद्घाटनाचे. या निमित्ताने माजी संमेलनाध्यक्ष राजेंद्र बनहट्टी, डाॅ. सदानंद मोरे, डाॅ. अरुणा ढेरे, लक्ष्मीकांत देशमुख, भारत सासणे या संमेलनाध्यक्षांच्या उपस्थितीत हे उद्घाटन झाले. या वेळी व्यासपीठावर महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार व कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी उपस्थित होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेमध्ये पुढील तीन वर्षांसाठी हे महामंडळाचे कार्यालय आता कार्यरत असणार आहे..  या वेळी राजेंद्र बनहट्टी म्हणाले, १९८८ ते १९९२ या काळात पुण्यामध्ये महामंडळाचे कार्यालय होते तेव्हा मी अध्यक्ष होतो. त्यावेळी मराठी वाङ्मयाच्या अभिवृद्धीसाठी अक्षर वाङ्मय योजना आणण्याचा आमचा प्रयत्न होता. त्यामध्ये १०० उत्कृष्ट पुस्तके अवघ्या एक हजार रुपयांत द्यायची योजना होती. मात्र ती योजना धूळ खात पडली. आता महामंडळाने अशीच एक नवी योजना नूतनीकरण करून आणावी आणि वाचकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा  डाॅ. सदानंद मोरे म्हणाले, साहित्य संमेलनाच्या रुपाने साहित्याचा उत्सव जरुर व्हावा परंतु काही ठोससुद्धा व्हावे अशी अपेक्षा आहे. सध्याच्या काळामध्ये भाषेवर आक्रमण करणारे एक नवे आव्हान कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात एआयच्या रुपाने आलेले आहे. सगळ्याच भाषांना या एआयचा सामना करावा लागणार आहे. कारण हे तंत्रज्ञान जगण्याला व्यापून टाकणार आहे. त्यामुळे त्याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.  लक्ष्मीकांत देशमुख म्हणाले, साहित्य संमेलने लोकाभिमुख होण्याच्या दृष्टीने प्रयत्न होणे गरजेचे आहे. इंग्रजी लिट फेस्टिव्हलला युवकांचा जो प्रतिसाद मिळतो तो इतका का असतो याचा अभ्यास आपणही करणे गरजेचे आहे. त्यानुसार संमेलनात बदल करणे गरजेचे आहे. परिसंवाद केंद्रित संमेलनाकडून ती पुस्तककेंद्रित आणि लेखककेंद्रित होणे गरजेचे आहे. वाचकांचा विचार करून उपक्रमांची आखणी होणे गरजेचे आहे. मराठी साहित्य आणि संस्कृतीला नवे वळण कसे देता येईल हे पाहायला हवे.  भारत सासणे म्हणाले, नोबेल, बुकर पुरस्कार मिळवणाऱ्या नामांकीत व्यक्ती, लेखक साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर येणे गरजेचे आहे. त्यातून वैश्विक विचार आपल्याला समजतील. संमेलने अधिक उंचीवर जाण्यासाठी अधिक प्रयत्न होणे गरजेचे आहे. बालसाहित्य हा विषय दुर्लक्षित राहत असल्याने संमेलनात त्याला महत्त्वाचे स्थान देणे गरजेचे आहे.  या वेळी माजी संमलेनाध्यक्ष श्रीपाल सबनीस हे प्रकृतीअस्वास्थ्यामुळे येऊ न शकल्याने त्यांनी लिहून शुभेच्छा पाठवल्या. प्रास्ताविक सुनिताराजे पवार यांनी केले. विनोद कुलकर्णी यांनी आभार मानले.  चौकट  संमेलन सर्वसमावेशक करणार – प्रा. मिलिंद जोशी  अध्यक्षीय समारोप करताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, महामंडळाच्या कार्यालयाचे उद्घाटन अन्य कोणाच्याही हस्ते करता आले असते परंतु सर्व संमेलनाध्यक्ष हे साहित्यविश्वाचे ब्रँड एम्बेसिडर आहेत म्हणून त्यांच्या हस्ते आज उदघाटन करण्यात आले आहे. साचा मोडल्याशिवाय नवे काही करता येणार नाही. हे एकदम होणार नसले तरी किमान दारे, खिडक्या किलकिले करण्याचे काम पुढील तीन वर्षांत नक्की केले जाईल. साहित्य संमेलनामध्ये दिसणारे तेच तेच चेहरे टाळून नवे चेहरे आणण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न केले जातील. परिसंवादांचे स्वरुप बदलून त्यांना चर्चासत्रांचे स्वरुप दिले जाईल. बालसाहित्यालाही संमेलनात स्थान दिले जाईल. ते सर्वसमावेशक कसे होईल असा प्रयत्न केला जाईल. संमेलन वाचककेंद्री व्हावे असा प्रयत्न केला जाईल आणि ग्रंथप्रदर्शनांतील तक्रारीही दूर केल्या जातील. संवादाचे पूल जोडण्याचे काम नक्की केले जाईल, अशी ग्वाही दिली.

Uncategorized

दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल : शिवेंद्रराजे भोसले

डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ पुस्तकाचे प्रकाशन99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा : शिवेंद्रराजे भोसले पुणे : मराठी भाषेची ओळख कधीच पुसली जाणार नाही. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून देणे हा एकच ध्यास घेवून महाराष्ट्र साहित्य परिषदेसह सर्वांनी प्रयत्न केले. दिल्लीतील आंदोलन तसेच सतत पाठपुरावा करून या इच्छेला मूर्त स्वरूप मिळाले आहे. दिल्लीत अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन यशस्वी केले याचे कौतुक आहे. महाराष्ट्र आता मागे वळून पाहणार नाही. दिल्ली आता दूर नाही. दिल्लीच्या तख्तावर महाराष्ट्राची पकड घट्ट झालेली पहायला मिळेल, असा विश्वास महाराष्ट्राचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी व्यक्त केला. 99वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरविण्याचा मान साताऱ्यास मिळावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली. सरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या मसापच्या कार्यकर्त्यांचा सत्कार मंत्री भोसले यांच्या हस्ते आज (दि. 17) करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी दिल्ली येथे शिवेंद्रराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले होते. या निमित्त त्यांचा सन्मान प्रा. मिलिंद जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. तर कार्यकर्त्यांचा सत्कार शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते करण्यात आला. सरहद, पुणेचे अध्यक्ष संजय नहार, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी, ज्येष्ठ पत्रकार श्रीराम पवार, सरहद, पुणेचे संचालक डॉ. शैलेश पगारिया, शैलेश वाडेकर व्यासपीठावर होते. राजकारण्यांना नेहमीच पत्रकार आणि साहित्यिकांची भीती असते असे सुरुवातीस सांगून शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, माझा साहित्याचा अभ्यास नाही परंतु, आवड नक्कीच आहे. साताऱ्यात साहित्यिक आणि कलाकार यावेत यासाठी मी नेहमीच प्रयत्नशील असतो. साहित्य क्षेत्रात साताऱ्यातील मसाप शाखेच्या माध्यमातून विविध उपक्रम घेतले जात आहेत. सतत कार्यशील असणाऱ्या सातारकरांचा परिषदेवर ठसा उमटला आहे. सत्काराचा संदर्भ देऊन भोसले पुढे म्हणाले, एखाद्या मंत्र्याचे आंदोलक म्हणून स्वागत व सत्कार इतिहासात पहिल्यांदाच झाला असेल. दिल्ली येथील महाराष्ट्र सदनात मराठी भाषिकांना खुला प्रवेश मिळण्यासाठी तसेच स्पर्धा परिक्षा देणाऱ्या मराठी विद्यार्थ्यांच्या वसतीगृहाची सोय करण्याचा प्रयत्न सुरू असल्याचे ते म्हणाले.–चौकट : मी महाराष्ट्र साहित्य परिषदेचा आजीव सभासद आहे. परिषदेच्या अनेक उपक्रमात मी सहभागी असतो. परिषदेचे काम प्रा. मिलिंद जोशी, सुनिताराजे पवार, विनोद कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखाली उत्तम सुरू असून आम्ही साहित्य परिषदेच्या बरोबर आहोत. – शिवेंद्रसिंहराजे भोसले—देशाला विचार-दिशा देणारे राज्य ही ओळख जपली जावी : प्रा. मिलिंद जोशी अध्यपदावरून बोलताना प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, उदारमतवाद आणि वैचारिक मोकळेपणा हे महाराष्ट्राची परंपरा आहे. दिल्लीतील साहित्य संमेलनात वैचारिक मोकळेपणाचे दर्शन घडले. विविध विचारधारांची आणि मतांची माणसे व्यासपीठावर होती; तरीही आपल्या विचारांशी ठाम राहतानाही त्यांच्यातील सौहार्द पाहायला मिळाले. याचीच आजच्या काळात गरज आहे. ते पुढे म्हणाले, साहित्य संमेलनाचे अध्यक्ष महाराष्ट्राचे वैचारिक नेतृत्व करतात अशी लोकभावना आहे. ती दृढ करण्याचे काम संमेलनाध्यक्षा डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या बाणेदार अध्यक्षीय भाषणातून केले. मराठी माणसांची मानसिकता हेच त्याच्या समोरचे मोठे आव्हान आहे. संकुचित मनोवृत्ती आणि कोतेपणा हा प्रगतीतला सगळ्यात मोठा अडसर आहे. महाराष्ट्राच्या हितासाठी पक्ष, विचारधारा आणि राजकारण दूर ठेवून महत्त्वाच्या प्रश्नांसाठी एकत्र येण्याची मानसिकता आणि राजकीय इच्छाशक्ती निर्माण झाली तरच महाराष्ट्राचे भले होईल. देशाला विचार आणि दिशा देणारे राज्य अशी महाराष्ट्राची ओळख आहे, ती जपली पाहिजे, असे आवाहन प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. साताऱ्याला साहित्य संमेलनाचा मान मिळावा अशी गेल्या दहा वर्षांपासून मागणी आहे. या मागणीचा साकल्याने विचार केला जाईल, असे प्रा. जोशी म्हणाले. दिल्ली येथील साहित्य संमेलनाविषयी जेव्हा जेव्हा बोलले जाईल त्या त्या वेळी डॉ. भवाळकर, शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांच्यासह संमेलनाचे संयोजक संजय नहार यांचेही नाव आवर्जून घेतले जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.—प्रास्ताविकात संजय नहार म्हणाले, दिल्ली म्हणजे पानीपत, दिल्लीचे तख्त मिळवता येणार नाही असा न्यूनगंड मराठीजनांमध्ये निर्माण झाला होता. दिल्लीत मराठी माणसे एकत्र येत नाहीत हा समजही दिल्ली येथे झालेल्या 98व्या साहित्य संमेलनाच्या माध्यमातून दूर झाला. मराठी माणूस एकत्र येण्यासाठी दिल्लीतील महाराष्ट्र सदन दिल्लीतील मराठी जनांसाठी खुले करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्राची दिल्लीतील पत वाढविण्यासाठी पुन्हा एकदा भोसले यांच्याबरोबर शिंदे आले तर हे शक्य होईल. तसेच पवार-शिंदे-भोसले एकत्र आल्याशिवाय महाराष्ट्राचे नाव दिल्लीत गुंजणार नाही. पुस्तकाविषयी बोलताना श्रीराम पवार म्हणाले, या पुस्तकाच्या माध्यमातून महाराष्ट्र धर्म काय आहे, तो काय सांगतो आणि भारताला तो काय देऊ इच्छितो याविषयी डॉ. तारा भवाळकर, शरद पवार, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे विचार प्रकट झाले आहेत. राज्याची अस्मिता मातृभाषेशी जोडली जाते, राज्यकर्ते म्हणून भाषिक अस्मितेची भावना समजून घ्यावी, संमेलनाच्या मांडवात राजकारणी यावेत का, संमेलनाचा पोत राजकारण्यांमुळे बिघडतो का तसेच उत्तर आणि दक्षिणेचा संयोग असलेली महाराष्ट्राची समन्वयवादी संस्कृती, लोकसाहित्याचे मूल्य अशा विविध विषयांवर गंभीर चिंतन, मंथन, संचित या पुस्तकाद्वारे समाजापुढे येत आहे, हे नुसतेच दस्तावेजीकरण नव्हे तर या पुस्तकातून ठाम विचार पुढे येत आहेत. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांचा विनोद कुलकर्णी यांनी परिचय करून दिला. महाराष्ट्राच्या इतिहासाची उजळणी होताना छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य वगळून पुढे जाता येणार नाही, असे ते म्हणाले. फोटो ओळ : ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तक प्रकाशन प्रसंगी उपस्थित (डावीकडून) शैलेश वाडेकर, श्रीराम पवार, प्रा. मिलिंद जोशी, शिवेंद्रराजे भोसले, संजय नहार, विनोद कुलकर्णी, सुनिताराजे पवार, शैलेश पगारिया. फोटो ओळ : सत्कार सोहळ्यात उपस्थित (डावीकडून) शैलेश वाडेकर, श्रीराम पवार, प्रा. मिलिंद जोशी, शिवेंद्रराजे भोसले, संजय नहार, सुनिताराजे पवार, शैलेश पगारिया. प्रति,मा. संपादकसरहद, पुणे आयोजित 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा डॉ. तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष शरद पवार आणि उद्घाटक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भाषणावर आधारित ‌‘मु. पो. तालकटोरा‌’ या पुस्तकाचे प्रकाशन तसेच मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळविण्यासाठी दिल्ली येथे आंदोलन करणाऱ्या मसापच्या कार्यकर्त्यांचा आज सन्मान करण्यात आला. या वृत्तास छायाचित्रासह प्रसिद्धी द्यावी ही विनंती.संजय नहार,अध्यक्ष, सरहद, पुणेप्रसिद्धी माध्यम समन्वयक : पाध्ये मीडिया सर्व्हिसेस, मो. 9922907801

Uncategorized

मसापच्या कोषाध्यक्ष पदी विनोद कुलकर्णी यांची निवड

महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कोषाध्यक्षपदी परिषदेचे सातारा जिल्हा प्रतिनिधि विनोद कुलकर्णी यांची निवड करण्यात आली आहे .  

Uncategorized

दिल्लीत संमेलन; मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

फोटो ओळ : दिल्ली येथे होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ दीपप्रज्वलन करून करताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, समवेत संजय नहार, विनोद कुलकर्णी, डॉ. नीलम गोऱ्हे, प्रा. मिलिंज जोशी, सुनीताराजे पवार दिल्लीत संमेलन; मराठी भाषिकांसाठी अभिमानास्पद बाब : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जेएनयूतील मराठी भाषा अध्यासन आणि मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू सरहद आयोजित 98व्या मराठी साहित्य संमेलनाचा मुख्यमंत्र्याच्या उपस्थितीत कार्यारंभ  पुणे : दिल्लीत होत असलेले अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हा महाराष्ट्रातील जनतेच्या अभिमानाचा विषय आहे. मराठी भाषेचा उत्सव सुमारे 70 वर्षांनंतर दिल्लीत होत आहे. ही महाराष्ट्राच्या जनतेसह मराठी भाषिकांसाठी गौरवाची बाब आहे. दिल्लीत आयोजित केलेल्या संमेलनाचे शिवधनुष्य पेलण्यास नहार व त्यांचे सहकारी यशस्वी होतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. दिल्लीतील जेएनयू येथे कुसुमाग्रज यांच्या नावे मराठी भाषेचे अध्यासन व्हावे यासाठी तसेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सर्वतोपरी सहकार्य करू अशी ग्वाहीही त्यांनी दिली. सरहद, पुणे आयोजित अखिल भारतीय साहित्य महामंडळाच्या दिल्ली येथे होत असलेल्या 98व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा कार्यारंभ शनिवारी (दि. 17) मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते झाला. त्या वेळी ते बोलत होते. सरहद, पुणेचे संस्थापक संजय नहार, साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, साहित्य महामंडळाच्या अध्यक्षा प्रा. उषा तांबे, विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, साहित्य परिषदेच्या प्रमुख कार्यवाह सुनीताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी मंचावर होते. त्याचप्रमाणे साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे, लक्ष्मीकांत देशमुख, प्रा. सदानंद मोरे, डॉ. श्रीपाल सबनीस यांची तसेच प्रा. राजा दीक्षित आणि साहित्य परिषदेषच्या पदाधिकाऱ्यांची विशेष उपस्थिती होती. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या माधवराव पटवर्धन सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री शिंदे व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून संमेलनाचा कार्यारंभ झाला.   शिंदे पुढे म्हणाले, साहित्य परिषदेच्या ऐतिहासिक वास्तूत येण्याची संधी मिळाली हे मी माझे भाग्य समजतो. वास्तू लहान असली तरी या वास्तूची कीर्ती मोठी आहे, असे सांगून ते पुढे म्हणाले, विद्येच्या माहेरघरातून सत्तेच्या राजधानीत संमेलनाच्या निमित्ताने मायमराठीचा डंका वाजणार आहे. संमेलन ऐतिहासिक होईल, यात शंका नाही. मराठी भाषेचा सोहळा राष्ट्रीय पातळीवर जात आहे, ही अभिमानाची गोष्ट आहे. दिल्लीत होत असलेल्या संमेलनाच्या निमित्ताने मराठी साहित्य जगासमोर येईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. शिंदे पुढे म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी पाठपुरावा सुरू आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा ही सर्वांचीच भावना आणि तळमळ आहे.  मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सरकारच्या सुरू असलेल्या प्रयत्नाचे माहिती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी याप्रसंगी बोलताना दिली. संजय नहार म्हणाले, मराठी माणसाचा आवाज दिल्लीतून सर्वदूर घुमला पाहिजे यासाठी दिल्लीत संमेलन व्हावे, अशी मराठीजनांची इच्छा आहे. जेएनयू येथे मराठी भाषेचे अध्यासन व्हावे यासाठी तत्कालिन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी एक कोटींची देणगी जाहीर केली होती. अध्यासनाठी निधी मिळाल्यास अध्यासन सुरू करण्यास मदत होईल, अशी विनंती नहार यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. प्रा. मिलिंद जोशी म्हणाले, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी लोकचळवळ उभी केली आहे. राजकीय व्यक्तींच्या भेटी घेतल्या, धरणे आंदोलन केले. लाडक्या बहिणीप्रमाणे लाडक्या मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा अशी विनंती आहे. यासाठी पुढाकार घ्यावा, पंतप्रधान यांना भेटून अभिजात दर्जा मिळण्यासाठी प्रोत्साहन कसे मिळेल यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. प्रा. उषा तांबे यांनी संमेलनाची स्थळ निवड प्रक्रिया कशी असते याविषयी माहिती दिली. मान्यवरांचे स्वागत संजय नहार, प्रा. मिलिंद जोशी यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शैलेश वाडेकर यांनी केले तर आभार सुनीताराजे पवार यांनी मानले.

अक्षरधन:शतकाचा अनमोल दस्तावेज - प्रा. मिलिंद जोशी
Uncategorized

अक्षरधन:शतकाचा  अनमोल दस्तावेज 

– प्रा. मिलिंद जोशी  महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ या वाङ्मयीन नियतकालिकाच्या विसाव्या शतकातील  अंकांमधील निवडक लेखांच्या एक हजार पृष्ठांच्या ‘अक्षरधन’ या ग्रंथाचे प्रकाशन आज मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने (२७ फेब्रुवारी) ज्येष्ठ समीक्षक  डॉ. मिलिंद मालशे यांच्या हस्ते होत आहे त्या निमित्ताने…  महाराष्ट्र साहित्य परिषद, पुणे ही महाराष्ट्रातील आद्य साहित्यसंस्था आहे. गेली ११८ वर्षे ही संस्था मराठी भाषा, साहित्य, समीक्षा आणि संस्कृती यांच्या जतन आणि संवर्धनासाठी कार्यरत आहे. अनेक थोर सारस्वतांनी वाङ्मयसेवकांची भूमिका बजावत आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ देऊन ही संस्था नावारूपाला आणली. लो.टिळकांच्या प्रेरणेने १९०६ साली स्थापन झालेल्या परिषदेची घटना १९१२ साली अस्तित्वात आली. ९ मार्च १९१३ रोजी मुंबईत झालेल्या कार्यकारी मंडळाच्या बैठकीत ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिका’ असे एक मासिक काढावे असा ठराव झाला. त्यानुसार ऑगस्ट १९१३ चा ‘महाराष्ट्र साहित्य पत्रिके’चा बारा पृष्ठांचा अंक ‘विविध ज्ञान विस्ताराची पुरवणी’ म्हणून प्रकाशित झाला.  ‘सांप्रत महाराष्ट्र भाषेचा परिपोष निरनिराळ्या तऱ्हेने होत आहे. तरी खास साहित्य या विषयाकडे जावे तितके लक्ष गेलेले दिसत नाही… साहित्याकरिता वाहिलेले असे एखादे पत्र निघण्याचा आता काळ आला आहे व त्याची आवश्यकता भासू लागली आहे. असे पहिल्या अंकाच्या संपादकीयात वि. मो. महाजनी यांनी नमूद केले होते.  १९२८ पासून पत्रिका ‘त्रैमासिक’ या स्वरूपात स्वतंत्रपणे सुरु झाली. सुरुवातीला पत्रिकेचे स्वरूप साहित्यिक तत्त्वचर्चा, भाषा व संशोधन यांना स्थान देणारे होते. त्यात कालानुरूप बदल होत गेले. पत्रिकेतील लेखन खरे तर वाङ्मयीन संस्कृतीसाठी भरीव योगदान देणारे आहे. मात्र यातील निवडक लेखांचे  खंड आजवर प्रकाशित न झाल्याने हे कार्य दुर्लक्षित राहिले होते. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या विद्यमान कार्यकारी मंडळाने परिषदेच्या संशोधन विभाग प्रमुख डॉ. अरुणा  ढेरे यांच्या मार्गदर्शनाखाली हा प्रकल्प हाती घेतला. व्यासंगी समीक्षक आणि कवयित्री डॉ नीलिमा गुंडी यांनी हा ग्रंथ अभ्यासपूर्वक सिद्ध करताना उत्तम संपादन केले. या प्रकल्पासाठी परिषदेच्या हितचिंतक प्रसिद्ध लेखिका डॉ. नलिनी गुजराथी आणि उद्योजक मोहन गुजराथी यांनी अर्थसाहाय्य केले त्यामुळे एक हजार पृष्ठांचा बृह्दग्रंथ सर्वांसाठी उपलब्ध झाला आहे. एक अव्वल दर्जाचा संदर्भग्रंथ म्हणून याचा उपयोग होईलच, शिवाय आजच्या आणि उद्याच्याही भाषाविषयक धोरणासाठी यातून मार्गदर्शन मिळेल. या ग्रंथाची व्याप्ती आणि खोली लक्षात घेता मराठी वाङ्मय व्यवहार याचे स्वागतच करेल. परिषदेच्या अंतर्गत नूतनीकरणाबरोबरच हा महत्त्वपूर्ण संशोधन प्रकल्प पूर्ण झाला याचे समाधान कार्यकारी  मंडळाला आहे.  राजकीय, सामाजिक, आर्थिक, धार्मिक, सांस्कृतिक, वैचारिक स्थित्यंतरांच्या दृष्टीने विसावे शतक महत्त्वाचे आहे. म्हणून विसाव्या शतकातील निवडक लेखांचा विचार ‘अक्षरधन’ या ग्रंथासाठी केला. १९१३ ते २००१ या कालखंडातील लेखांची निवड डॉ. नीलिमा गुंडी यांनी केली. महाराष्ट्र साहित्य पत्रिकेचे संपादकपद या काळात वि. मो. महाजनी, ना. गो. चापेकर, द. वा. पोतदार, माधवराव पटवर्धन, मो. ज्ञा. शहाणे, के. नारायण काळे, रा. श्री. जोग, श्री. म. माटे, य. दि. पेंढरकर, रा. शं. वाळिंबे, वि. भि. कोलते, वा. रा. ढवळे, दि. के. बेडेकर, श्री. के. क्षीरसागर, स. गं. मालशे, भालचंद्र फडके, हे. वि. इनामदार, आनंद यादव, भीमराव कुलकर्णी, वसंत जोशी, शंकर सारडा, वि. स. वाळिंबे, ह. ल. निपुणगे या मान्यवरांनी भूषविले आणि पत्रिकेच्या प्रतिष्ठेत भर घातली. म. सा. पत्रिकेने संस्थेच्या उदार आणि सर्वसमावेशक विचारसरणीचा वारसा कायम जपला.  या ग्रंथाच्या प्रस्तावनेत डॉ. नीलिमा गुंडी यांनी पत्रिकेच्या संपादकांचे धोरण, पत्रिकेचे वैशिष्ट्यपूर्ण विशेषांक, पत्रिकेतील लेखनाचे सर्वसाधारण स्वरूप, विविध सदरे, वाचकांचा प्रतिसाद तसेच पत्रिकेतील कालोचित बदल यांचा परामर्श घेतला आहे. या ग्रंथात सात विभागात ८१ लेख   समाविष्ट आहेत. प्रत्येक विभागालाही स्वतंत्र प्रस्तावना आहे. भाषा, व्याकरण, छंद:शास्त्र, व्यक्तिवेधपर लेख, साहित्यविश्वातील विविध चळवळी, प्रवाह यांची चर्चा, वाद, महत्त्वाच्या पुस्तकांची प्रदीर्घ परीक्षणे, मुलाखती, संशोधने, इतकेच नव्हे  तर  परभाषेतील महत्त्वाच्या कलाकृतींची दखल घेणारे लेख असे विविधांगी लेखन यात समाविष्ट आहे. देशभाषांचा उच्च अभ्यासक्रमात समावेश हा रा. भि. जोशी यांचा लेख, अखिल भारतीय पार्श्वभूमी आणि भारतीय भाषांशी संबंध हा श्री. ना. बनहट्टी यांचा लेख, साहित्यातील आग्रह आणि दुराग्रह हा वि. वा. शिरवाडकरांचा लेख, स्वातंत्र्योत्तर मराठी साहित्यातील चळवळीचे मूलस्रोत हा चंद्रकांत बांदिवडेकरांचा लेख, साहित्यातील देशीयता हा भालचंद्र नेमाडे यांचा लेख, ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार आणि मराठी साहित्य हा डॉ. गं. ना. जोगळेकरांचा लेख, राजवाड्यांच्या भाषा शास्त्रविषयक कार्याचा आढावा घेणारा शं. गो. तुळपुळेंचा लेख, स्त्रियांची भाषा हा सरोजिनी बाबरांचा लेख, जोतिराव फुले यांच्यावरचा गं. बा. सरदारांचा लेख, पाली वाङ्मयातील तेरा भिक्षुणी रत्ने हा धर्मानंद कोसंबींचा लेख, कवितांवरचा मं. वि. राजाध्यक्षांचा लेख, ‘स्वामी’ कादंबरीची दि. के. बेडेकरांनी केलेली समीक्षा, चार नाटककार: चार शक्ती हा ना. सी. फडके यांचा लेख, मराठी कथेतील कलात्मकतेचा विचार पुनर्विचार आणि तिचे भवितव्य हा कमल देसाईंचा लेख, गो. म. कुलकर्णींनी घेतलेली दया पवारांची मुलाखत, दिलीप चित्रेंच्या संवेदनांचे रा. ग. जाधवांनी उलगडलेले विविध पदर, तेंडुलकरांच्या नाटकांनी उठविलेल्या वादळांविषयीचा चंद्रशेखर बर्वेंचा लेख, ‘झाडाझडती’ च्या निमित्ताने मर्ढेकरांच्या ‘पाणी’ विषयीचा डॉ. सदा कऱ्हाडेंचा लेख, माझे लेखन कलेतील प्रयोग हा पुलंचा लेख, बी. रघुनाथांच्या कादंबरीविषयीचा वसंत आबाजी डहाकेंचा लेख, ‘टोकदार सावलीचे वर्तमान’ हा रंगनाथ पठारेंचा लेख, परभाषा व साहित्यविश्वाचे वेध घेणारे ना. ग. जोशी, श्री. के. क्षीरसागर, पु. ल. देशपांडे, म. द. हातकणंगलेकर, द. श्री. बापट यांचे लेख या ग्रंथाची श्रीमंती वाढविणारे आहेत. मराठी साहित्यातील वैचारिक ग्रंथाचे दालन समृद्ध करणारा हा ग्रंथ आहे.  जानेवारी १९३४ च्या महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या अंकात द. वा. पोतदारांनी ‘रद्दीतील रत्ने’ हा लेख लिहिला त्या लेखात ते म्हणतात ‘एका अर्थी जशी जुनी वस्त्रे आपण टाकतो, तशीच ही पत्रे, मासिके पुस्तकेसुद्धा आपल्या विचार व्यापाराची वस्त्रेच होत… जुनी, जीर्ण, फाटकी अतएव निरुपयोगी वस्त्रे टाकावी हे ठीक, परंतु पागोटे फाटले म्हणून टाकले तरी कडेचा जर सहजच ‘दीर्घायुषी’ असतो; तो फेकून देणे लाभाचे नाही… मग त्याच हिशेबाने जुन्या वर्तमानपत्री किंवा मासिकी किंवा पुस्तकी लिखाणातील जो सत्वांश आपल्या प्रगतीला कारण होत असतो. तेव्हढा जगवायलाच हवा. ‘अक्षरधन’ हा ग्रंथ सिद्ध करताना द. वा. पोतदारांचाच हा विचार महाराष्ट्र साहित्य परिषदेने समोर ठेवला आहे. जुन्यातले नवे आणि नव्यातले अगदी नवे स्वीकारत आजवर परिषदेने वाटचाल केली आहे यापुढेही तशीच होत राहिल. (लेखक महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत)

समीक्षा वाचककेंद्री व्हावी : प्रा. अविनाश सप्रे
Uncategorized

समीक्षा वाचककेंद्री व्हावी : प्रा. अविनाश सप्रे

महाराष्ट्र साहित्य परिषद आणि आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनात प्रतिपादन पुणे : मराठीमध्ये लेखकाला केंद्रवर्ती ठेवून चरित्रात्मक समीक्षा, साहित्यकृतीची समीक्षा-भाषा व शैलीची समीक्षा होत आली आहे, पण वाचकाला केंद्रस्थानी ठेवून केलेली वाचककेंद्री समीक्षा झालेली नाही, ती व्हायला हवी असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा अविनाश सप्रे यांनी व्यक्त केले. महाराष्ट्र साहित्य परिषद आणि महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीच्या आबासाहेब गरवारे महाविद्यालयाचा मराठी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित समीक्षा संमेलनाच्या अध्यक्षपदावरून ते बोलत होते.महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रा मिलिंद जोशी, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या सचिव डॉ मीनाक्षी पाटील, प्राचार्य विलास उगले, प्रमुख कार्यवाह सुनिताराजे पवार, कोषाध्यक्ष विनोद कुळकर्णी,  मराठी विभाग प्रमुख डॉ. वर्षा तोडमल, बाबासाहेब शिंदे, राजीव बर्वे उपस्थित होते. प्रा. सप्रे म्हणाले, समीक्षा हा एक गांभीर्यपूर्वक करण्याचा महत्त्वाचा ज्ञानव्यवहार आहे आणि समीक्षक हा वाङ्मयीन संस्कृतीचा जागल्या आहे. आस्वादक समीक्षा हा समीक्षकप्रिय प्रकार असून त्याचे स्वरुप खूपसे भोंगळ आहे, कारण अशी समीक्षा सैद्धांतिकतेच्या स्विकारातून, संस्कारातून निर्माण झालेली नसते. मराठी समीक्षेवर रोमँटीसिझम, आधुनिकता, आधुनिकतावाद आणि उत्तर-आधुनिकतावाद या पाश्चात्त्य वादसंकल्पनांचा प्रभाव आहे. त्यातून प्रसृत झालेली प्रमाणके आहेत, त्यांचे स्वरुप समीक्षकांनी नेमकेपणाने समजून घेऊन त्यांचे उपयोजन केले पाहिजे.  प्रा. जोशी म्हणाले, समीक्षेचे अध:पतन म्हणजे साहित्य व्यवहाराचे अध:पतन. उत्तम कलाकृतींचे सर्जन आणि दुय्यम कलाकृतींचे हनन हा समीक्षकांचा खरा धर्म आहे. त्याचे पालन आज होताना दिसत नाही. सध्या पुस्तक गाजवणे या रोगाने साहित्य विश्वाला ग्रासले असून बेन्टेक्सला सुवर्णपद बहाल करण्याचा हा प्रकार आहे. त्यामुळे वाचकांची फसवणूक होत आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या उत्सवी वातावरणात साहित्याविषयी व विशेषत: समीक्षेविषयी गांभीर्याने चर्चा होत नाही, अशी अनेक नामवंत साहित्यिकांची व समीक्षकांची भावना होती. तिचा आदर करून महाराष्ट्र साहित्य परिषदेने २०११ सालापासून संमेलनाचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला.  डॉ मीनाक्षी पाटील, प्राचार्य उगले यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. सुनिताराजे पवार यांनी प्रास्तविक केले. डॉ. वर्षा तोडमल यांनी आभार मानले. उद्घाटन सत्रानंतर ‘समीक्षेच्या परिभाषेची समीक्षा’ या विषयावरील परिसंवादात डॉ. रूपाली शिंदे, डॉ. आशुतोष जावडेकर, डॉ. सुजाता शेणई  सहभागी झाले होते. ज्येष्ठ समीक्षक डॉ. नीलिमा गुंडी यांच्या अध्यक्षतेखाली हा परिसंवाद झाला. ‘समाज माध्यमांवरील कला समीक्षा’ या विषयावरील परिसंवादात गणेश मतकरी, डॉ. वर्षा तोडमल, प्रसाद शिरगावकर, हिना खान सहभागी झाले होते. संमेलनाचा समारोप डॉ. विनय हर्डीकर यांच्या ‘नव्या समीक्षेकडे’ या विषयावरील व्याख्यानाने झाला. चोकट : प्रा. अविनाश सप्रे म्हणाले, ·        साहित्यामध्ये नवनवीन प्रवृत्ती, प्रवाह आणि प्रेरणा निर्माण होत असतात, त्यांचा अन्वयार्थ लावणारी, आकलन घडवणारी नवी समीक्षाही निर्माण होणे आवश्यक असते. नवी परिभाषा अस्तित्वात येणे गरजेचे असते. त्यासाठी समीक्षेत साचलेपण येऊन चालत नाही. ·        मराठी समीक्षेमध्ये व्यवस्थेपेक्षा गोंधळ जास्त आहे, समजापेक्षा गैरसमज जास्त आहेत आणि ते निर्माण व्हायला लेखक, वाचक आणि समीक्षक आपापल्या परीने जबाबदार आहेत. ·        समीक्षेसंबंधी  अकारण बोलतो लिहितो तेव्हा आपण भाषिक साहित्य विचारात घेतो पण त्याच बरोबर संगीत, चित्रपट, चित्रकला, नृत्यकला इ. ललितकलांचीही योग्य समीक्षा होणे महत्त्वाचे असते. या बाबीकडे आपल्या समीक्षेने दुर्लक्ष केलेले दिसते. त्यामुळे या कलांच्या बाबतीत आपण अडाणी  आहोत. ·        या कलांवरची समीक्षा वा लेखन वरवरचे असते. आपली समीक्षा अधिक आकलन समृद्ध करण्यासाठी विविध ज्ञानशाखेतून पुढे आलेल्या संकल्पनांचा उपयोग होऊ शकतो. म्हणून समीक्षकांनी आंतर विद्याशाखीय पद्धतीचा वापर करायला हवा.  ·        मराठी समीक्षा विश्वामध्ये भालचंद्र नेमाडे यांनी मांडलेल्या देशीवाद या वादसंकल्पनेची मोठ्या प्रमाणावर चर्चा गेली काही वर्षे जोरात होत आहे. नेमाडेंनी या भूमिकेतून काही समीक्षा प्रमाणके पुरस्कारलेली आहेत. ती लक्षात घ्यायला हवीत. ·        मराठीमध्ये सध्या अनुवाद मोठ्या प्रमाणावर होत आहेत. पण त्यातील सकस निकसता ठरवणारी समीक्षा मात्र होत नाही. भाषांतर विद्या ही एक ज्ञानशाखा आहे. त्याची सैद्धांतिक मांडणी मराठीत व्हायला हवी तसेच बाल साहित्य ही अलक्षीत आहे. या प्रकाराच्या साहित्याची प्रमाणके समीक्षेने प्रस्थापित करायला हवीत. 

Scroll to Top